आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी-कानडी भाषा भगिनीभाव सादरीकरणाने 'सवाई' संस्मरणीय, सवाई दिवस चौथा गायकांनी जपला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे : युवा गायक ओंकारनाथ हवालदार यांचे दमदार गायन आणि शाकीर खान आणि तेजस उपाध्ये यांचे सतार - व्हायोलिन सहवादनातून सवाई गंधर्व संगीत महोत्सवाचे चौथ्या दिवसाचे पहिले सत्र रंगतदार झाले. ओंकार यांनी राग मुलतानीमध्ये पारंपरिक बंदिश सुव्यवस्थितपणे मांडल्यावर, 'कंगन मुंदरिया मोरी' या द्रुत बंदिशीतून तानांमधील चापल्य दाखवले. त्यांच्या गायकीत तानांचे विविध पॅटर्न नेमकेपणाने आहेत. माझे माहेर पंढरी या अभंगाचे त्यांनी द्वैभाषिक गायन सादर करून भाषाभगिनीभाव जपला. त्यांच्या या आगळ्या सादरीकरणाला रसिकांची मोठी दाद मिळाली. त्यानंतर कानडी भक्तिरचना सादर करून त्यांनी आपल्या रंगलेल्या गायनाची सांगता केली.

त्यानंतर युवा वादक शाकीर खान आणि तेजस उपाध्ये ही वादकांची जोडी स्वरमंचावर आली. त्यांच्या साथीला तबल्यावर विजय घाटे होते. किरवाणी रागाचे आलाप दोन्ही वादकांनी पेश करत वातावरणनिर्मिती केली. सहवादन करताना त्यांनी आपसातील ताळमेळ छान साधला होता. त्यामुळे दोन्ही वाद्यांच्या वेगळ्या नादांची अनुभूती श्रोत्यांना मिळाली. शेवटी मिश्र खमाजमधील उस्ताद रईसखाँ यांची एक धून सादर करून त्यांनी वादनाला विराम दिला.


स्वामी कृपाकरानंद यांनी राग पटदीपची निवड केली होती. 'शिव सूरज' असे बोल असणारी बंदिश एकतालात निबद्ध होती. त्यानंतर देस रागात द्रुत एकतालात घोर घोर गरजे घन ही रचना त्यांनी थोडक्यात सादर केली. स्वामी विवेकानंद यांची 'डिमी डिमी डिमी डमरू बाजे' ही रचना त्यांनी शुद्ध कल्याण रागात सादर केली. अखेरीस 'अबीर गुलाल उधळीत रंग' अभंग गायिला.

डौलदार पदन्यास

ओडिसी नृत्यांगना रीला होता यांनी शक्तीचे विभिन्न आविष्कार प्रकट करणारी नवदुर्गा स्तुती सादर केली. आकर्षक नेत्रपल्लवी, डोलदार पदन्यास, उत्तम अभिनयामुळे त्यांचे नृृत्य सादरीकरण रसिकांना प्रभावित करणारे ठरले.

डॉ. अश्विनी भिडेंना वत्सलाबाई जोशी पुरस्कार प्रदान

सवाईच्या चौथ्या सत्रात जयपूर घराण्याच्या ख्यातनाम गायिका डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे यांना आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे वत्सलाबाई भीमसेन जोशी यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा पुरस्कार मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचा विनम्रतेने स्वीकार करत अश्विनीताई म्हणाल्या,'या महोत्सवाच्या रूपाने भीमसेनजींनी आणि वत्सलाबाईंनी स्वरस्मृतींची जिवंत स्मारकेच उभी केली आहेत. ती परंपरा जपण्याची, पुढे नेण्याची जबाबदारी पुन्हा अधोरेखित होत आहे,'.
 

बातम्या आणखी आहेत...