आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएंटरटेन्मेंट डेस्क : ईश्वराने दिलीप साहेबांना असा गुण दिला आहे, असे व्यक्तिमत्त्व घडवले आहे की, त्यांचा प्रत्येक वाढदिवस खास वाटतो. वाढदिवसच काय, माझ्यासाठी तर त्यांच्यासोबतचा प्रत्येक दिवस खूप विशेष असतो. ते सोबत असतात तेव्हा कधीच कंटाळवाणे वाटत नाही.
अगदी सुरुवातीपासून दिलीप साहेबांना चाहते लाभले आहेत. त्यांच्या प्रेमापोटी वेडे झालेल्या लोकांचे किस्सेदेखील मला आठवतात. आमच्या लग्नाच्या वेळी खूप गोंधळ सुरू होता. कलकत्ता येथे आम्ही शूटिंगसाठी गेलो होतो. तिथे गर्दीमुळे पॅकअप करून घरी यावे लागले होते. २ ऑक्टोबर १९६६ रोजी आमचा साखरपुडा घोषित झाला होता. तेव्हा ज्या गाडीत आम्ही बसलो होतो ती गाडी चाहत्यांनी आपल्या हातांनी वर उचलली होती. नंतर पोलिसांनी आम्हाला कसेतरी गाडीतून बाहेर काढले आणि स्वयंपाकघराच्या दिशेने वर हॉटेलपर्यंत घेऊन गेले. आम्हाला आयुष्यात कधीच एकटेपणा जाणवला नाही.
त्यांचे खूप चाहते आहेतच, पण त्यांच्यावर प्रेम करणारे फिल्म इंडस्ट्रीतही भरपूर लोक आहेत. त्यांच्या ८९ व्या वाढदिवशी संपूर्ण चित्रपटसृष्टी एका छताखाली आली होती. अमिताभपासून ते धर्मेंद्र, शाहरुखपासून आमिर, सलमान, राजेश खन्ना, प्रियंका चोप्रा, कॅटरिना कैफ, राणी मुखर्जीपासून ते इंडस्ट्रीतील दिग्गज हजर होते. त्यापूर्वी त्यांचा ८८वा वाढदिवसही मोठ्या थाटात साजरा झाला होता. ९०वा वाढदिवसही चांगला झाला होता. तेव्हा आम्ही गार्डन पार्टी दिली होती. थोडक्यात सांगायचे झाल्यास त्या सर्व वाढदिवसाला त्यांची तब्येत चांगली होती. त्यामुळे त्यांनीही खूप एन्जॉय केला होता.
विदेशातही दिलीप साहेबांचे भरपूर चाहते आहेत. तेव्हाच्या काळापासून ते आजपर्यंतचे चाहते आजही केक, ग्रीटिंग कार्ड पाठवत असतात. प्रेमळ शब्दांचे पत्रदेखील पाठवतात. या सर्व आठवणी मी आजही साठवून ठेवल्या आहेत. त्यांची बाहेर शूटिंग असेल आणि सेटवरच त्यांचा वाढदिवस साजरा होत असेल, अशा सर्व आठवणी आमच्या कार्यालयात जपून ठेवलेल्या आहेत. 'राम और श्याम'वेळी आम्ही कोल्हापुरातील पन्हाळगडावर शूटिंग करत होतो. आम्ही ज्या बंगल्यात थांबलो होतो तिथे सुंदर केक कापण्यात आला. तिथे मुमताज, प्राण साहेबही हजर होते. दिग्दर्शक आणि संपूर्ण टीम हजर होती. अशा प्रकारे आम्ही अनेक वाढदिवस साजरे केले. बऱ्याचदा तर काही देशांच्या प्रमुखांनीही त्यांच्या वाढदिवसाला हजेरी लावली, भेटवस्तू पाठवल्या. ईश्वराने दिलीप साहेबांना एवढा सन्मान दिला की, संदेश आपल्या देशातून तर येतातच, पण मॉरिशस, फ्रान्स आदी देशांतूनही येत राहतात.
आम्हा दोघांमध्ये कधीच वादविवाद होत नाहीत. सुरुवातीला आम्ही खूप तरुण होतो तेव्हा व्हायचे. तीदेखील खूप जुनी गोष्ट झाली आहे, आठवतही नाही. माघारी कुणासही वाइट म्हणू नये, ही गोष्ट मी त्यांच्याकडून शिकले. मी त्यांना नेहमी एखाद्याचा उल्लेख करत अमूक व्यक्ती तुमच्याबद्दल वाइट बोलली, असे म्हणायचे. मात्र, त्यांनी कधीच माझ्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही. ते नेहमी म्हणायचे, 'तू तक्रार तर करत आहेस, पण अमूक व्यक्ती इतर कामे चांगली करत असल्याचे तुला दिसत नाही का?' त्यावर माझे उत्तर असायचे, 'दिलीप साहेब तुम्ही तर मला चिडवत आहात.' सांगायचे तात्पर्य हे आहे की, दिलीप साहेब कधीच कुणाबद्दल वाइट बोलले नाही आणि वाइट विचारही कधी केला नाही. ते नेहमी म्हणायचे, मनुष्याने ईश्वराला घाबरले पाहिजे. हे मी त्यांच्याकडूनच शिकले आहे.
ते सुरुवातीपासूनच भौतिक गोष्टींपासून दूर राहिले. पत्नी म्हणून लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्येही मी त्यांना चांगल्यात चांगले भेट कार्ड आणि विशेष भेटवस्तु देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचे परिणाम काही दिवसांतच समोर येत असत. गळ्यामध्ये साखळी घातली तेव्हा कळाले की, ती त्यांनी दुसऱ्याच व्यक्तीला दिली आहे. नवीन लग्न झाले तेव्हा अनेक प्रयत्नानंतरही मी दिलेल्या भेटवस्तू काही दिवसानंतर ते दुसऱ्यांना देत असत. त्यांच्या या सवयीमुळे मला खूप त्रास व्हायचा, परंतु भौतिक गोष्टींवर प्रेम करू नये, हे त्यांनी मला समजावून सांगितले. ते मला नेहमी म्हणायचे, 'सायरा, तू माझी खूप काळजी घेतेस. तुझ्या याच गोष्टीवर माझे सर्वात जास्त प्रेम आहे.'
स्वत:साठी त्यांनी कधीच भेटवस्तू स्वीकारल्या नाहीत, पण माझ्या वाढदिवशी मोहक फुले आणि ग्रीटिंग कार्ड््स दिले आहेत. कधी दुकानात जाऊन साडी, सलवार कमीजपासून ते माझ्या गरजेच्या सर्व वस्तू ते आणत राहिले.
सायराजींनी दिलीप साहेबांच्या सध्याच्या तब्येतीबाबतही सांगितले...
सध्या कसे आहेत
त्यांची दिनचर्या आजही नेहमीप्रमाणेच आहे. रात्री ते कधीही सलग पूर्ण झोप घेत नव्हते. आजही तेच करतात. सकाळी थोडे जागून फ्रेश होत पुन्हा झोपतात.
कसा असेल आजचा जल्लोष
दिलीप साहेबांची तब्येत नाजूक आहे. त्यांना आधी न्यूमोनियाही झालेला आहे. त्यामुळे पार्टी करण्यास डॉक्टरांनी मनाई केली आहे. कारण चाहते, मित्र, नातेवाइक आदी भरपूर लोक येतात. त्यामुळे जास्त न बोलण्यास दिलीप साहेबांना सांगण्यात आले आहे. त्यामुळे या वेळी फक्त जवळचे नातेवाइक आणि केवळ चार ते पाच मित्रच एकत्र येत आहेत. या वेळी फक्त २० ते २५ पाहुण्यांसोबतच त्यांचा वाढदिवस साजरा केला जाईल. आम्ही गच्चीवर बसणार आहोत. गेट टुगेदर आणि फॅमिली डिनर सोबत करणार आहोत.
त्यांना काय आवडते
साखळी वगैरे ते घालतच नाहीत. ते केवळ एक घड्याळ घालतात. त्यांना चांगले कपडे घालण्याचा छंद आहे. ते पांढरे कपडे आणि त्याच रंगाची पादत्राणे घालत असतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.