आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जामिनावर सुटताच आरोपी कासार याच्याकडून पुन्हा लाखोंची फसवणूक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- उच्च न्यायालयाकडून जामीन मिळताच सराईत गुन्हेगार विश्वजित रमेश कासार (वाळकी) याने पुन्हा गुन्हेगारीकडे मोर्चा वळवला. नेवासे तालुक्यातील जळके येथील एका शेतकऱ्याच्या नावावर त्याने चक्क बुलेट, अॅक्टिव्हा व सुझुकी अॅक्सेस गाड्या खरेदी करून सुमारे तीन लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला. 


दरोडा, फसवणूक व जबरी चोरीसाठी कुप्रसिध्द असलेला कासारच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या होत्या. वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत तब्बल १५ गुन्हे दाखल असलेल्या कासारला जिल्हा न्यायालयाने शिक्षा ठोठावली. परंतु कासारने उच्च न्यायालयात दाद मागत जामीन मिळवला. यापुढे कोणताही गुन्हा करणार नाही, या अटीवर उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. मात्र, सराईत गुन्हेगार असलेल्या कासारने न्यायालयाची दिशाभूल केली. बाहेर येताच त्याने पुन्हा गुन्हेगारी सुरू केली. 


जळके येथील शेतकरी सागर रामेश्वर लोखंडे यांना त्याने लाखो रुपयांचा चुना लावला. बजाज फायनान्सचा अधिकारी असून कर्ज मंजूर करून देतो, असे सांगत कासार याने लोखंडे यांचा विश्वास संपादन केला. कर्ज प्रकरणासाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे त्याने लाेखंडे यांच्याकडून घेतली. सर्व कागदपत्रे मोबाइलमध्ये स्कॅन केली. आधारकार्ड मोबाइलला लिंक करण्यासाठी आलेला ओटीपी क्रमांक सांगा, कर्जप्रकरणाच्या मंजुरीसाठी तो महत्त्वाचा आहे, असे सांगत कासार याने लोखंडे यांच्या नावाने माळीवाडा येथील कॅनरा बँकेत खाते उघडले. बँकेच्या कागदपत्रावर तोतया व्यक्तीचा फोटो लावून कासारने संबंधित खात्याचे धनादेश वापरून बुलेट, होंडा अॅक्टिव्हा व सुझुकी अॅक्सेस गाड्या खरेदी केल्या. विशेष म्हणजे सर्व गाड्यांवर श्रीराम व एल अॅण्ड टी कंपन्यांकडून फायनान्स घेतला. ही फसवणूक १ ते ३० जुलैदरम्यान झाली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच लाेखंडे यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. 


नागरिकांनी सावध राहावे 
कासारचा शोध सुरू आहे. लवकरच त्याला अटक होईल. सहायक पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी त्याला अटक केली होती, परंतु तो जामिनावर सुटला. आता मात्र त्याच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी अशा व्यक्तींपासून सावध राहणे गरजेचे आहे.'' शिवाजी नागवे, पोलिस उपनिरीक्षक, काेतवाली ठाणे. 


स्वत:च घेतली बनावट सैन्य भरती 
कासार याने अनेक तरुणांची देखील फसवणूक केलेली आहे. २०१३ मध्ये त्याने स्वत:च बनावट सैन्य भरती घेतली. तरुणांना कर्नल बनवण्याचे स्वप्न दाखवत त्यांना ट्रेनिंगही दिले. त्यानंतर बनावट रेल्वे भरती काढतही त्याने तरुणांची फसवणूक केली. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी कासारच्या विरुद्ध गुन्हाही दाखल केलेला आहे. आता जामिनावर सुटलेला हा कासार पुन्हा एकदा पोलिसांच्या रडारवर आहे. 


साथीदारांची मदत 
कासार सराईत गुन्हेगार असून साथीदारांच्या मदतीने गुन्हा करण्याची त्याची पध्दत आहे. लोखंडे फसवणूक प्रकरणात अल्ताफ शेख (कारेगाव) व सूरज गंगाधर देशमुख (नगर) यांनी कासारला मदत केली. त्याने आतापर्यंत गंभीर स्वरूपाचे १५ गुन्हे केले आहेत. 

बातम्या आणखी आहेत...