आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मासिक पाळी सुरू झाली की शाळाबंदी, मैत्रिणींच्या प्रयत्नांनी पुन्हा शिकण्याची संधी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शाळेतील काही मुलींचे पालक करायचे बालविवाह, पालकसभा-पथनाट्याद्वारे गैरसमज दूर केले
  • वर्गशिक्षिकेची मिळाली साथ...पथनाट्यातून केली जनजागृती

रवींद्र डोंगरे 

ग्रामीण भागातल्या मुस्लिम समुदायातील मुलींना मासिक पाळी सुरू झाली की, त्यांचे बालवयातच लग्न लावून देण्याची परंपरा अजूनही कायम आहे. फुलंब्री तालुक्यातील धामणगावातील सहावी-सातवीतील चार मुलींच्या पालकांनीही त्यांचे पुढील शिक्षण याच कारणामु‌ळे बंद केले होते. हे ऐकून त्यांच्या वर्गमैत्रिणींना खूप वाइट वाटले. त्यांनी शिक्षिकेसोबत चर्चा केली आणि त्या मुलींना पुन्हा शाळेत आणण्याचा चंग बांधला. पालकांना शाळेत बोलावले. डॉक्टरांकडून त्यांचे गैरसमज दूर केले. तसेच गावामध्ये पथनाट्य सादर करून मुलींना शिकवण्याचा संदेश दिला. अशा प्रकारे पालकांचे मतपरिवर्तन झाले आणि त्या चार मुली आता नियमित शाळेत येतात, खेळतात, बागडतात, वेगवेगळ्या उपक्रमांत सहभागी होतात. वाघिणीचे दूध पिण्यास पुन्हा त्या सज्ज झाल्या. महत्त्वाचे म्हणजे हा फक्त चार मुलींचा प्रश्न नसून सामाजिक विषय आहे. यामुळे भविष्यात अनेक मुलींना फायदा होईल. धामणगाव हे फुलंब्री तालुक्यातील मुस्लिमबहुल गाव. या गावची लोकसंख्या जास्त असल्याने इथे जिल्हा परिषदेच्या दोन शाळा आहेत. वरच्या शाळेत पहिली ते आठवीपर्यंत मराठी आणि एक उर्दूचा वर्ग आहे. खालच्या शाळेत पहिली ते आठवीपर्यंत मराठी आणि उर्दू अशा दोन्ही माध्यमांचे स्वतंत्र शिक्षण दिले जाते. उर्दू माध्यमाच्या शाळेत मुस्लिम समुदायातील मुली शिकतात. मात्र, त्यांना मासिक पाळी सुरू झाली की त्यांचे पालक ‘आता त्या मोठ्या झाल्या...’ असे म्हणत शाळेत पाठवणे बंद करतात.  
कालांतराने त्यांचे कमी वयातच लग्न लावून दिले जाते. याच गावामधील तीन अल्पवयीन मुलींचे बालवयात लग्न झाल्यामुळे मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. विशेष म्हणजे त्यापैकी एक मुलगी याच शाळेतील होती. आमच्या मैत्रिणींनी शाळेत येणे बंद केले, आता काय करायचे हा प्रश्न सहावी ते आठवीतील मुलींना कायम भेडसावत होता. त्यावर काहीतरी उपाय शोधला पाहिजे, असे त्यांना सतत वाटत असे. त्यांच्या वर्गमैत्रिणी आता खूूप खुश आहेत. ‘इन्शाअल्लाह हम ऐसे ही पढते रहे और आगे बढते रहे... ’ असे त्या हिमतीने म्हणतात. आणि म्हणाल्या, स्कूल चले हम...
 
शाळेतील मुलींच्या पालकांच्या सभा, पथनाट्य आदी उपक्रम राबवल्यानंतर कुठे त्या चार मुलींचे पालक आपल्या मुलींना पुन्हा शाळेत पाठवण्यास तयार झाले. या वेळी त्यांच्या वर्गमैत्रिणींचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. कारण त्या चौघी खूप हुशार आहेत. त्या शिकल्या नाही तर त्यांच्या टॅलेंटचा काय फायदा, असा विचार त्या कायम करत असत. जून २०१९ पासून शाळा बंद केलेल्या चार मुली आला ‘स्कूल चले हम...’ म्हणत दररोज शाळेत येतात. जुलै आणि ऑगस्ट २०१९ असे दोन महिने मुलींनीच मुलींसाठी राबवलेल्या उपक्रमाचे हे फलित आहे.वर्गशिक्षिकेची मिळाली साथ...


शिरीन कारभारी, शाह सायमा मासूम, शेख सायमा गफूर, शाहिस्ता जिलानी, शेख सलमा कादर, अमरीन सलीम, समरीन मंजूर, अंजुम नवाब, सुमय्या सादिक, सानिया फकिरा या सर्वजणी आपल्या वर्गमैत्रिणी शाळेत येत नसल्याने खूप अस्वस्थ होत्या. त्यांनी वर्गशिक्षिका सादिया शेख अल्ताफ यांच्याकडेही आपली खदखद बोलून दाखवली. या शिक्षिकेलाही हा विषय खूप गंभीर असल्याची जाणीव झाली, त्या चार हुशार मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात पुन्हा आणण्यासाठी या वर्गमैत्रिणींना बळ दिले आणि सुरू झाला प्रोजेक्ट ‘डिझाइन फॉर चेंज’. पथनाट्यातून केली जनजागृती


तीन वेळा शाळेत पालकांच्या मार्गदर्शन सभा होऊनही त्यांचे मतपरिवर्तन होत नव्हते. तथापि, शाळेतल्या मुलींनी यापूर्वी निवडणूक काळात पथनाट्य सादर केले होते. त्यांना हा अनुभव कामी आला व त्यांनी या विषयावर पथनाट्य तयार केले. गावात वेगवेग‌ळ्या ठिकाणी पथनाट्ये सादर करून ‘मासिक पाळी आली म्हणून घाबरून जाण्याचे कारण नाही. तुमच्या मुलींना जास्तीत जास्त शिकवा...’ असा संदेश दिला. विशेष म्हणजे हे पथनाट्य मराठी व उर्दू दोन्ही माध्यमातील मुलींनी दोन्ही भाषेत सादर केले आणि लोकांच्या मनातील शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न केला. 


> आमच्या येथे उर्दू माध्यमाची शाळा आठवीपर्यंतच आहे. नववी-दहावीसाठी फुलंब्रीला जावे लागते. त्यामुळे माझ्या वर्गातील किमान १० मुलींना मी पुढील शिक्षणाचा हक्क मिळवून देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या मुलींना फुलंब्रीला जाण्या-येण्यासाठी रिक्षादेखील लावून देईन.
सादिया शेख अल्ताफ, वर्गशिक्षिका
> ज्यांची शाळा बंद झाली होती त्या सर्व माझ्या मैत्रिणी. त्या हुशार आहेतच, पण अवांतर उपक्रमातही सक्रिय राहतात. त्यांना पुन्हा शाळेत आणल्यामुळे खूप आनंद झाला. आता आम्ही एकत्र बसतो आणि शिक्षण घेतो. 
- शिरीन कारभारी
 
> सातवी आणि आठवीतील चौघीजणी खूप हुशार आहेत, परंतु त्यांची शाळा पालकांनी बंद केल्याचे आम्हाला खूप वाईट वाटले. आता त्या परत आल्याने आम्ही खुश आहोत. त्यांना नववी आणि दहावीचे शिक्षण घेण्यासाठीही आम्ही आता पुढाकार घेणार आहोत. 
- शाह सायमा मासूमबातम्या आणखी आहेत...