आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा आरक्षणासाठी एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न; महामार्ग ३ तास राेखला, बाजारपेठेत कडकडीत बंद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी शहरातील बाजारपेठ कडकडीत बंद होती. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास सुरेश मराठे यांनी अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. तर मराठा क्रांती मोर्चातर्फे गिरणा पुलाजवळ तीन तास ठिय्या मारून महामार्ग राेखण्यात अाल्याने वाहतूक ठप्प झाली. या वेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आरक्षण मिळेपर्यंत हा लढा तेवत ठेवण्याच्या शपथेनंतर राष्ट्रगीताने दुपारी ४ वाजता आंदोलनाचा समारोप करण्यात आला. 


महाराष्ट्र बंदमुळे गोलाणी मार्केट, फुले मार्केट व दाणा बाजारातील प्रतिष्ठाने व्यापाऱ्यांनी स्वत:हून बंद ठेवली होती. काही दुकाने सुरू होते. या वेळी मराठा समाजाचे तरुण 'जय भवानी, जय शिवाजी', 'एक मराठा लाख मराठा' अशा घोषणा देत शिवतीर्थ मैदानाजवळ एकवटले. त्यांनी गोलाणी मार्केटमधील सुरू असलेली काही दुकाने बंद करायला लावली. तरुण बाजारपेठेत फिरत असल्याने फुले मार्केटमधील दुकाने बंद झाली. नी जुन्या बसस्थानकाजवळ रस्त्यावर ठिय्या मारला. तेथून घोषणाबाजी करीत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आले. 


आक्रमक युवकांपुढे सर्वच हतबल
सर्वजण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी किशाेर राजेनिंबाळकर यांना मागण्यांचे निवेदन दिले. त्यानंतर पोलिस उपअधीक्षक सचिन सांगळे यांनी रास्ता रोको न करण्याचे आवाहन केले. नेत्यांनीही समजावण्याचा प्रयत्न केला; मात्र, आक्रमक असलेल्या युवकांनी जोरदार घोषणाबाजी करीत दुपारी १ वाजेच्या सुमारास आकाशवाणी चौकात ठिय्या मारला. त्यानंतर ठरल्याप्रमाणे आंदोलक युवक गिरणा पुलाकडे जाण्यासाठी निघाले. तेव्हाही पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. युवक अधिकच आक्रमक झाले. 


पोलिस सतर्क
युवक अधिकच आक्रमक झाल्यामुळे पोलिस सतर्क झाले. दंगा काबू पथक, अग्निशमन दलाचे वाहन, राज्य राखीव दल तसेच पोलिस कर्मचारी गिरणा पुलाकडे रवाना झाले. बहुतांश पोलिस आंदोलकांसोबत चालत होते. आंदोलनादरम्यान अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी गिरणा पुलाच्या अलीकडेच दोन ठिकाणी बॅरिकेड्स लावून आंदोलकांना रोखले. आंदोलकांनी बॅरिकेड्स लोटून पुलाकडे जाण्याचा प्रयत्न केला. या वेळी पोलिस उपअधीक्षक सांगळे व प्रतिभा शिंदे यांच्यात तू-तू-मैं-मैं झाली. आंदोलकांनी पोलिसांच्या विरोधात घोषणाबाजी करायला सुरुवात केली. शेवटी पुलावर काही दुर्घटना घडल्यास आंदोलक जबाबदारी घेतील काय? असा सवाल सांगळे यांनी उपस्थित केला. त्यानंतर पुलाच्या अलीकडेच दुपारी २ वाजता आंदोलकांनी महामार्गावर ठिय्या मारला. 


रात्री १२ वाजेपर्यंत सतर्कतेच्या सूचना 
आंदोलनाचा दुपारी ४ वाजता समारोप झाला असला तरी बंदोबस्तासाठी असलेल्या सर्व पोलिसांना रात्री १२ वाजेपर्यंत सतर्क राहण्याच्या सूचना एसपी दत्तात्रय शिंदे यांनी दिल्या हाेत्या. 


महामार्गावरील वाहतूक वळवली 
गिरणा पुलाजवळ आंदोलन होण्यापूर्वीच पोलिसांनी महामार्गावरील वाहतूक शहराबाहेरून वळवली. आंदोलनादरम्यान एक युवक साइडपट्टीवरून दुचाकीसह खाली पडला होता. सर्व मान्यवरांची भाषणे झाल्यानंतर पोलिस उपअधीक्षक सांगळे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करीत आंदोलन शांततेने पार पाडल्याबद्दल सर्व आंदोलकांचे पोलिस दलातर्फे आभार मानले. तीन तास ठिय्या आंदोलन करून रास्ता रोखल्यानंतर प्रतिभा शिंदे यांनी सर्व आंदोलकांना आरक्षण मिळेपर्यंत हा लढा तेवत ठेवण्याची शपथ दिली. 


लहान मुलांची पंचाईत 
महामार्ग रोखला गेल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहने अडवण्यात आलेली होती. त्यामुळे प्रवाशांना डोक्यावर बॅगा घेऊन लहान मुलांसह पायपीट करीत बांभोरी व शहराकडे जावे लागले. पुलाखालून प्रवासी पायी जात होते. तर याच वेळी आंदोलकांनी रुग्णवाहिकांना जाण्यासाठी रस्ता मोकळा करून दिला. 


तहसीलदारांना अडवले 
गिरणा पुलाजवळी ठिय्या आंदोलन संपल्यानंतर जळगावकडे परतत असलेल्या तहसीलदार अमोल निकम यांचे शासकीय वाहन आंदोलकांनी अडवले होते. बराच वेळ हे वाहन थांबून हाेते. नेमेके त्याचवेळी मोठ्याप्रमाणात आंदोलक पायी, दुचाकीवर व कारने परतत असल्याने महामार्गावर वाहतुकीची काहीवेळ कोंडी झाली होती. 


पाेलिसांनी वेळीच पेट्राेलची बाटली हिसकावल्याने माेठा अनर्थ टळला 
मराठा क्रांती मोर्चातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू होते. या वेळी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास तेथे उपस्थित असलेले सुरेश मराठे (रा. टागोरनगर) यांनी बाटलीत आणलेले पेट्रोल अंगावर ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. या वेळी पोलिस व मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी वेळीच त्यांच्या हातातील पेट्रोलची बाटली हिसकावून घेतली व त्यांना आत्मघात करण्यापासून परावृत्त केले. 


मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी 
आंदाेलनस्थळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, संभाजी ब्रिगेडचे संजीव सोनवणे, प्रतिभा शिंदे, अॅड.सचिन पाटील, छावा संघटनेचे भीमराव मराठे, संजय पवार, प्रमोद पाटील, रमेश पाटील यांनी मार्गदर्शन केले. याात आरक्षण मिळेपर्यंत लढा तीव्र करण्याचे आवाहन केले. आतापर्यंत आरक्षणासाठी आम्ही रक्त सांडले, आता आरक्षणाच्या आड येणाऱ्यांचे रक्त सांडण्याचा निर्वाणीचा इशाराही देण्यात आला. 

 

ख्वाजामियांॅ चौकात वसतिगृहासाठी जागा; जिल्हाधिकाऱ्यांची शिष्टमंडळाला माहिती 
मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी ख्वाजामियांॅ चौकातील जागा देण्यात आली आहे. सातबारा उताऱ्यावर याबाबत नाव लावण्यात येईल, अशी माहिती गुरुवारी जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर यांनी मराठा क्रांती माेर्चाच्या प्रतिनिधींना दिली. 

बातम्या आणखी आहेत...