आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भालगाव फाट्याजवळ ट्रकची काळी पिवळीस धडक, १ ठार तर ९ जखमी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फुलंब्री - सिल्लोड रस्त्यावरील भालगाव फाट्याच्या परिसरात भरधाव ट्रकने औरंगाबादकडे जाणाऱ्या एका काळीपिवळी वाहनास समोरासमोर धडक दिली. या अपघात काळीपिवळी वाहनातील एक महिला जागीच ठार झाली असून वाहनातील इतर नऊ जण जखमी झाल्याची घटना गुरुवारी (ता.३०) रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास घडली. अनिता पुंजाराम सागर (३५, रा.डावरवाडी) असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. या अपघाताची वडोदबाजार पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. 


याबाबत अधिक माहिती अशी की, फुलंब्रीकडून सिल्लोडच्या दिशेने जाणारा ट्रक क्रमांक एम.एच.१८ बी.जी.३७२५ ने सिल्लोडकडून फुलंब्रीच्या दिशेने प्रवासी घेऊन येणाऱ्या काळीपिवळी वाहनास फुलंब्री-सिल्लोड रस्त्यावरील भालगाव फाट्यावर समोरासमोर जोराची धडक दिली. या धडकेत काळीपिवळी वाहन उलटले. त्यामुळे या वाहनातून प्रवास करणाऱ्या अनिता पुंजाराम सागर या गंभीर जखमी झाल्या. तर अस्मिता नामदेव पवार  (१३, रा. औरंगाबाद), भाग्यश्री पुंडलिक सागर  (१८, रा. शिंदेफळ), अमन नाजीम खान पठाण (१९,रा.सिल्लोड), सीमा शांतीराम (४०,रा.कोटनांद्रा), शकील बशीर शेख (५४,रा.सिल्लोड), ज्योती अशोक राजहंस (५४,रा.सिल्लोड), अशोक गजानन राजहंस (५७,रा.सिल्लोड) यासह आणखी दोन जण जखमी झाले आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांच्या मदतीने महात्मा फुले क्रीडा रुग्णवाहिकेद्वारे चालक विजय देवमाळी यानी गंभीर जखमी असलेल्या अनिता पुंजाराम सागर यांच्यासह अन्य सर्व जखमींना फुलंब्री ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी अनिता सागर यांना तपासून मृत घोषित केले. तर उर्वरीत जखमींवर प्राथमिक उपचार करून औरंगाबाद येथील शासकीय घाटी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले. सदरील अपघाताची वडोदबाजार पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अपघातग्रस्त वाहने पोलिस ठाण्यात जमा करण्यात आली आहेत.