आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भवताल - वऱ्हाड : एक शपथ गाजलेली...

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

सचिन काटे

चांदूर बाजारच्या महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींना ‘प्रेम व प्रेमविवाह करणार नाही’ अशा आशयाची शपथ देण्यात आली. त्यावर गदारोळ झाला. प्राचार्यासह दोन प्राध्यापक निलंबित झाले. मात्र, मुलींना काय शिकवावे, त्यांच्या मनावर काय बिंबवावे यावर व्यापक विचार होणे आवश्यक आहे.

प्रेम हा तसा हळवा आणि अथांग विषय आहे. अलीकडे प्रेमाच्या नावाने केलेल्या नको त्या गोष्टी समोर येत आहेत. एकतर्फी प्रेमाच्या नावाने तर जिच्यावर जीव ओवाळून टाकावा तिचाच क्रूरपणे जीव घेण्यापर्यंत कथित प्रेमवीरांची मजल वाढली आहे. अलीकडे हैदराबाद, हिंगणघाट, धामणगावसारख्या ठिकाणी विकृत मनोवृत्ती दर्शवणाऱ्या घटना समोर आल्या आणि समाजमन सुन्न झाले. एखादी घटना घडली की, सगळेच या विषयावर भरभरून बोलतात. प्रसंगी रस्त्यावर उतरतात. अशा घटना घडू नयेत यासाठी काय व्हावे, चूक कोणाची, काय झाले असते तर असे घडले नसते, यावर विचारमंथन होते. अनेक उपाय सुचवले जातात आणि काही दिवसांतच हा विषय मागे पडतो. 

हिंगणघाट येथे झालेले जळीतकांड आणि धामणगाव येथे झालेली मुलीची हत्या गाजत असताना ‘व्हॅलेंटाइन डे’ च्या आदल्या दिवशी विदर्भ यूथ वेलफेअर सोसायटी संचालित महिला कला, वाणिज्य महाविद्यालय चांदूर बाजार यांचे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर टेंभुर्णी येथे सुरू होते. त्यात एका व्याख्यानात विद्यार्थिनींना ‘प्रेम व प्रेमविवाह करणार नाही’ अशा आशयाची शपथ दिली गेली. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि राज्यभर हा विषय गाजला. शपथ प्रकरणावर टीका झाली. शपथच द्यायची असेल तर ती आधी मुलांना द्या, मुलींना सक्षम बनवा, समाजाचा दृष्टिकोन बदला, मुलांना समाजात जबाबदारीने वागण्याचे शिक्षण द्या, अशा विविध सूचना करण्यात आल्या. 

विद्यार्थिनींना शपथ घ्यायला लावल्याच्या घटनेने गदारोळ झाल्यानंतर शपथ का दिली, त्यामागची भावना काय होती, यासंदर्भात संबंधितांनी भूमिका स्पष्ट केली. ती सामाजिकदृष्ट्या किती खरी होती हा वादाचा विषय असू शकतो. महाविद्यालयाने या प्रकरणात चौकशी समिती नेमली आणि प्राचार्यांसह दोन प्राध्यापकांना निलंबित केले. ‘अशा प्रकारची शपथ कोणी देऊ शकत नाही. या प्रकारामुळे संस्थेची मोठी बदनामी झाली. संस्थेला यासंदर्भात पूर्वकल्पना दिलेली नव्हती,’ असे महाविद्यालयाचे म्हणणे आहे. शपथ घेतलेल्या विद्यार्थिनींनी या कारवाईला विरोध करत आंदोलन उभारले आहेे. ‘शपथ आम्ही स्वत:हून घेतली, आमच्यावर ती कोणी लादलेली नाही,’ असे त्यांचे म्हणणे आहे. संबंधित व्यक्तींवरील कारवाई हा एक वेगळा विषय आहे, पण मुलींना काय शिकवावे, त्यांच्या मनावर काय बिंबवावे यावर एक व्यापक विचार होणे आवश्यक आहे. समाजात आपले स्थान काय आहे, आपले हक्क कोणते, एखादी विपरीत परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी काय करावे, चुकून एखादी परिस्थिती उद््भवलीच तर काय करावे, दाद कोठे मागावी, अशा गोष्टी मुलींना शिकवणे तसेच मुलांनाही समाजात जबाबदारीने वागण्याची शिकवण देण्याची वेळ आली आहे. शपथ प्रकरणावरच्या चर्चेपेक्षा या मुद्द्यांवर चर्चा झाली तर ती थोडीतरी उपयुक्त ठरेल.                                        

बातम्या आणखी आहेत...