आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक किलो दु:ख

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोण्या एका राज्यात श्रीमंत लोक गावात राहत होते. त्यांचा प्रमुख व्यवसाय शेती असल्याकारणाने त्यांस  शेतकरी म्हणून संबोधत असत. अन् अतिशय गरीब लोक शहरात राहत होते. त्यांचे पोट नोकरीवर आधारित असल्याने त्यांस नोकरदार संबोधत. नोकरदार लोकांना एवढ्या महागाईच्या काळात पगार तो अवघा एकदीड लाख रुपये.  नाही म्हणायला आर्थिक विषमतेमुळे शेतकऱ्यांविषयी कमालीची असूया होती. त्यांनाही मनोमन वाटायचं की आपणही एक दिवस यांच्यासारखं शेतकरी होऊ. 
 
अरे हे कुणाचं पडलंय इथे एक किलो लालभडक दु:खं? 
कोणंय याचा वाली? 
नुस्तच पहात काय बसलात, उचला ते! 
त्याचे टरफलं टरफलं उडून राहिलेत वाऱ्यावर! 
अरे याने डोळ्याला पाणी आणलंय 
असं कोणतं जहाल विषारी कडूझर फळ आहे हे?
कोण म्हणालं कांदा..?
जे शहाण्यासुरत्या दुनियेला रडायला लावतंय
अश्रूंचे पाट वाहून राहिलेत पाट.. 
दिसत का नाही?
अरे सारं जग वाहून जाईल त्यात 
उचला ते...
 
 
कोण्या एका राज्यात फार फार वर्षांपूर्वी की काय माहीत नाही;  मात्र अठरापगड जातीची प्रजा बिलकुल राहत नव्हती. इथे आदिम काळापासून दोनच जाती अस्तित्वात होत्या. श्रीमंत आणि गरीब. श्रीमंत लोक गावात राहत होते. त्यांचा प्रमुख व्यवसाय शेती असल्या कारणाने त्यांस  शेतकरी म्हणून संबोधत असत. अन् अतिशय गरीब लोक शहरात राहत होते. त्यांचे पोट नोकरीवर आधारित असल्याने त्यांस नोकरदार संबोधत. नोकरदार लोकांची गरिबी एवढी होती की, तब्बल तीस दिवस काम केल्यानंतर मोठ्या मुश्किलीने एकतिसाव्या दिवशी त्यांना पैशाचं तोंड पाहावयास मिळत असे. अत्यंत हलाखीचे दिवस ते जगत होते. एवढ्या महागाईच्या काळात पगार तो अवघा एकदीड लाख रुपये. महागाईच्या मानाने अतिशय तुटपुंजा. तरी विशेष किरकिर न करता ते आपलं घर चालवत होते. नाही म्हणायला आर्थिक विषमतेमुळे शेतकऱ्यांविषयी कमालीची असूया होती. त्यांनाही मनोमन वाटायचं की आपणही एक दिवस यांच्यासारखं शेतकरी होऊ. 
 
 
हे जे शेतकरी लोक होते, तर त्यांच्या घरांना दरवाजे नव्हते. अन् त्यांच्या तिजोऱ्यांना लॉक नव्हते. म्हणजे खरं तर त्यांच्याकडे पैसाच एवढा होता की तिजोरी त्यास अतिशय कमी पडू शकते. म्हणूनच की काय त्यांचे पैसे कुठेही पडलेले असायचे. म्हणजे शेतात. शेताच्या बांधावर सुद्धा पैसे. म्हणजे जिकडे तिकडे पैसेच पैसे. ही बिलकुल अतिशयोक्ती नाही की हे लोक चूल पेटवायला कागद नाही तर पैसे वापरायचे. यांची पोरं तर पैशांची विमानं करून उडवायची अन् होड्या करून पाण्यात सोडायचा खेळ खेळायची..! शिवाय ह्यांना शेतीत मशागत करायची गरज पडायची नाही. पीक आपोआप उगवून यायचं. तयार माल आपोआप स्वत:च्या पायांनी बाजारपेठेपर्यंत चालत जायचा अन् स्वत:ला विकून, पैशाचा मोबदला सुद्धा आपोआप या शेतकऱ्यांच्या तिजोरीत पोचता व्हायचा. शिवाय यांच्या पोरांना शाळा शिकायची गरज नसायची. ते जन्मताच डिग्री घेऊन यायचे. शिवाय त्यांची आई आजारी पडायची नाही, न बाप! त्यामुळे पैसा वापरलाच जात नव्हता. म्हणूनच हे लोक घर बांधायचं असल्यास विटाबिटा वापरायचे नाही. पैशांच्या थप्प्या वापरायचे. थोडक्यात, टिश्यूपेपरचा वापर करावा तसा ते पैशांचा वापर करत होते. अंगणातल्या पैशांची झाडलोट करण्यासाठी खुद्द कुबेर मजूर म्हणून कामास ठेवला होता.
 
 
त्यामुळेच गरीब बिचाऱ्या नोकरदारांचा संताप संताप व्हायचा. त्यातच एकदिवस खबर येऊन पोहचली की, कांद्याचे भाव चार हजार रुपये क्विंटलच्या वर पोचले. बस! त्यांच्यावर अस्मान कोसळले. तोंडचे पाणी पळाले. कारण कांद्याशिवाय ते दुसरे काहीच खात नव्हते. कांदे सोडून दुसरा काही भाजीपाला असतो, हे त्यांस ठाऊकच नव्हते. संपूर्ण राज्य चिंतेत बुडालं. कित्येकांनी अंथरूण धरलं. रडू लागले. विव्हळू लागले. चाळीस रुपये किलो कांद्याचं दु:ख त्यांच्या मानगुटीवर बसलं. मोठा शोकसागरच वेगवेगळ्या अपार्टमेंटमधून उसळला. एवढ्याशा कांद्याने त्यांची दुर्दशा करून टाकली. कांद्याच्या चिंतेनं ते उभे वाळून गेले. विपन्नावस्था प्राप्त झाली. 
 
 
जगाने शेतकऱ्यांच्या आत्महत्या आजपर्यंत पाहिल्या होत्या. पण इथे तर नोकरदाराच्या आत्महत्या सुरु झाल्या. साऱ्या जगाच्या न्यूज चॅनलवर ब्रेकिंग निव्ज सारखी झळकू लागली. शेअर बाजारावरही कोण परिणाम झाले. भाव क्षणात गडगडले. परिणामी साऱ्या जगानेच ह्या एक किलो दु:खाचा धसका घेतला. 
जगात बातमी झाल्यामुळे. ज्या राज्यात कांद्याने हा, हाहाकार माजवला होता, त्या राज्यातील चॅनलवाले जागे झाले. अन् गरीब लोकांच्या मदतीला धावून गेले. समोरचं दृश्य पाहून चॅनलवाल्यांच्या काळजाच्या चिंध्या झाल्या. त्यांनीही जबरदस्त हुंदके दाटून आले. तरीही स्वत:ला कसेबसे सावरत ते बाईट घेऊ लागले.
 
 
“तुम्हाला काय वाटतं हे कशामुळे झालं!”
“हे शेतकऱ्यांनी केलेलं कटकारस्थान आहे, त्याने मुदाम कांदा लपवून आम्हा गरिबांना वेठीस धरलं असेल!”
“हा. हे त्याचंच काम आहे!”
“आम्हा गरिबांच्या मुळावरच तो उठलेला आहे.”
कांदा देशभर झाला. लोकसभेत कांदा. विधानसभेत कांदा. राज्यसभेत कांदा. फेसबुक व्हाट‌्सअॅपवरही कांदाच. त्या राज्यापुढे आता बाकीचे कुठलेच प्रश्न उरले नव्हते. अतिशय बिकट दिवस त्यांच्या दारापर्यंत येऊन ठेपले होते. यातूनही कुणाला तरी ईश्वर आठवला. तो ईश्वर नावाचा माणूस तो होता की ईश्वर? याची शहानिशा न करता लोकांनी आपली व्यथा त्याच्या कानावर घातली. म्हणजे खरं त्यांनी त्या ईश्वरास धारेवर धरलं. 
“ईश्वरा, तू आमच्यावर अन्याय केलाय!”
“आम्ही हजार बाराशे स्क्वेअर फूट जागेत राहतो अन तू  शेतकऱ्याला पाचपन्नास  एकर जमीन दिलीस!”
“हा अन्याय आहे.”
“आम्हाला हवा विकत, पाणी विकत, त्यास मात्र सारं काही फुकट!”
“यास अन्याय नाही तर काय म्हणणार?”
“त्याच्या जमिनीत लावलेल्या झाडांना तू बदाबदा पैसे देतोस!”
“अरे पैशांची झाडं उगवून आणतोस अन कवडी टॅक्स त्यास भरावा लागत नाही!”
“आम्ही मरमरून महिनाकाठी लाखभर कमावतो, त्यावर तू टॅक्स बसवतोस!”
“ही भयाण विषणता तू निर्माण केली आहेस!”
“तो फक्त रिकाम्याहाती माथा टेकवतो तुझ्यासमोर, आमच्या फंडिंगमधून तुझं मंदिर उभं राहतं, तरी तुला त्याचाच पुळका, दरी, डोंगरं, नद्या तू त्याच्या नावावर करून दिल्यास!”
“हे योग्य नाहीये ईश्वरा!”
“आम्हा गरिबांची दया नाही येत का तुला?”
“का एवढा निष्ठुर वागून राहिलास?”
“कष्ट तू फक्त आमच्याच पदरात टाकले आहे का?”
“तो आयत्या सुखाला चटावून मुजोर झाला आहे!”
“म्हणूनच कांद्याच्या रूपात तो आम्हास वेठीस धरतो आहे!”
सगळ्यांच सगळं गाऱ्हाणं ऐकून घेतल्यावर ईश्वर  म्हणाला, 
“म्हणजे हे फक्त कांद्याचं दुखणं आहे तर!”
“फक्त म्हणजे काय ईश्वरा, कांदा जीवन आवश्यक आहे. तो जर कमी भावात आम्हास मिळाला नाही तर आमचं मरण ओढवेल. अरे कित्येक मेलेसुध्दा कांद्याशिवाय! तरी का तुझं काळीज द्रवत नाही! आम्हा गरिबांची तुला दया कशी येत नाही ईश्वरा?”
यावर ईश्वर हसला. लोकांना मग आणखीनच राग आला.
“अरे आमच्या दु:खावर तू खूशाल हसतो आहेस?”
“माझ्या वत्सांनो, मला कळलं तुमचं दु:ख. हे एक किलोचं दु:ख आहे. मात्र हे तुमचं आहे की त्याचं? हे मी ठरवतो आहे. ते जेव्हा ठरेल; तेव्हा मी न्याय करेल!”  असं म्हणत तो अंतर्धान पावला नाही. त्याने तिथेच एका मोठ्या दगडावर आपलं बूड टेकवलं अन् समाधीअवस्थेत निघून गेला. तो  खरोखरच ईश्वर होता की ईश्वर नावाचा माणूस होता, हे काही मला कळलं नाही. मात्र तो न्याय करेल. असं तरी त्याच्या बोलण्यावरून जाणवत होतं. थोडक्यात, एक किलो दु:खाचा तिढा सुटेल; याची खात्री मला तरी वाटत होती. एकाएकी ईश्वर ओरडून म्हणाला, 
“गरीब तो की तुम्ही?”
लोकांना ऐकायलाच गेलं नाही काही. म्हणून ईश्वराने परत एकदा दरडावून विचारलं. ह्या  खेपेला मात्र लोकांना ऐकू गेलं. ईश्वराबरोबर खोटं कसं बोलायचं...
-तिढा सुटला होता..
कथेत ईश्वर घ्यायच्या आधीच मला वाटलं होतं 
की ईश्वर काहीतरी जबर घोळ घालेल. त्याने तो घातलाच,
आता मला ही गोष्ट  शेतकऱ्याला गरीब 
अन् नोकदारास श्रीमंत संबोधून 
पुन्हा नव्यानं लिहावी लागेल..!

लेखकाचा संपर्क : ८८३००३८३६३