आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनैतिक संबंधाच्या संशयावरून खून, पोलिसांनी एका आरोपीला अटक केले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे आरोपीचा शोध

नांदेड- शनिवारी तुषार श्रीरंग पवार (१९) या तरुणाचा खून प्रकरणाचा छडा लावण्यात भाग्यनगर पोलिसांना यश आले. या प्रकरणी सोमवारी रात्री पोलिसांनी एका आरोपीला अटक केली.


तुषार पवार हा मूळचा इस्लापूर येथील रहिवासी असून तो शिक्षणासाठी आई-वडिलांसह श्रीनगर येथे एका अपार्टमेंटमध्ये राहत होता. शनिवारी तो दुपारी ट्यूशनसाठी जातो असे सांगून घरातून बाहेर पडला. तो घरी परत आला नाही. त्याच्या आईने ही बाब त्याच्या वडिलांना सांगितल्यानंतर वडील श्रीरंग पिराजी पवार यांनी तातडीने त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचा ठावठिकाणा लागला नाही. त्यामुळे रात्री भाग्यनगर पोलिस ठाण्यात मुलगा हरवल्याची तक्रार दिली. त्यानंतर पोलिस निरीक्षक अनिरुद्ध काकडे यांनी तुषार याच्या मोबाइल काॅल डिटेलची माहिती घेतली. शहरातील काही भागातल्या सीसीटीव्ही फुटेजची माहिती घेतली. त्यावेळी इस्लापूर येथीलच दिलीप बळीराम मिटकर एका मित्रासोबत दुचाकीवर (एमएच ०५ बीके ३८४३) हा एका पोत्यात काहीतरी घेऊन जात असल्याचे दिसून आले. तुषार याच्या मोबाइलवर जे शेवटचे काॅल डिटेल सापडले तेही दिलीप मिटकर याचेच असल्याचे तपासात उघड झाले. त्यावरुन पोलिसांनी दिलीप मिटकर याला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीवरून तुषारचा खून करुन त्याचा मृतदेह पोत्यात घालून काकांडी परिसरातील एका शेतात टाकल्याची कबुली त्याने दिली. दिलीपचा नुकताच विवाह झाला होता. त्याच्या नवविवाहित पत्नीचे व तुषारचे अनैतिक संबंध असल्याचा संशय दिलीप मिटकर याला होता. त्या संशयातूनच त्याने तुषारचा खून केल्याची कबुली पोलिसांना दिली. या प्रकरणी दिलीप मिटकर व त्याचा मित्र विजय जाधव याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक विशाल भोसले करत आहेत.