आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पांढुर्ण्याच्या गोटमार यात्रेत एकाचा मृत्यू, ६ गंभीर; तर ३०० जखमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वरुड- महाराष्ट्र-मध्य प्रदेशच्या सीमेवरील वसलेल्या पांढुर्णा येथे दरवर्षी प्रमाणे पोळ्याच्या करीला जांब नदीपात्रात भरलेल्या गोटमार यात्रेत सोमवारी (दि. १०) एकाचा मृत्यू झाला. यामध्ये ६ जण गंभीर, ३०० जण किरकोळ जखमी झाले. गंभीर ६ जखमींना उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले आहे, तर ३०० किरकोळ जखमींपैकी १२ जखमींना पुढील उपचारासाठी पांढुर्णा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असून, उर्वरित जखमींना सुटी देण्यात आली. शंकर झीगु भलावी (२५) रा. भुयारी असे गोटमारीत मृत्यू झालेल्या मृतकाचे नाव आहे. सायंकाळी उशिरापर्यंत नदीपात्रात गोटमार सुरूच होती. 


पांढुर्णा येथे प्रेमकथेच्या आख्यायिकेवरून पोळ्याच्या करीला गोटमार यात्रा भरते. प्रेमवीरांची स्मृती म्हणून सावरगाव आणि पांढुर्णा येथील नागरिक गोटमार करतात. दरवर्षी यामध्ये शेकडो नागरिक जखमी होतात. सोमवारी सकाळी १० वाजता यात्रेला सुरुवात झाली. भाविकांनी सूर्योदयापूर्वी जांब नदीपात्रात पळसाचे मोठे वृक्ष लावून त्यावर झेंडा लावला होता. वाजंत्रीच्या तालावर पूजाअर्चा करण्यात आली. यात्रा पाहण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होती. गोटमारीच्या धुमश्चक्रीत गंभीर आणि किरकोळ जखमी होणाऱ्या नागरिकांसाठी मध्य प्रदेश आरोग्य विभागाच्या वतीने सेवा केंद्र उभारण्यात आले होते. प्रथेनुसार दोन्ही गावातील नागरिकांनी एकमेकांवर तुफान दगडफेक करून झेंडा आणण्याचा प्रयत्न केला. सूर्यास्तानंतर दोन्ही गटात तडजोड झाली. त्यानंतर झेंडा चंडीदेवीच्या मंदिरात आणून त्याची विधिवत पूजा करण्यात आली. यात्रेदरम्यान छिंदवाडा येथील जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, जिल्हा आरोग्य अधिकारी, सार्वजनिक रुग्णालयाच्या निवासी डॉक्टरांचे पथक तैनात होते. 

बातम्या आणखी आहेत...