आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टोळक्याची भावांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू : दुचाकीला कट मारल्यावरून वाद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - काम आटोपून घरी जाताना विरुद्ध दिशेने आलेल्या टवाळखोर तरुणांनी कट मारून वाद घालत दोन भावांना बेदम मारहाण केली. लहान भावाने भांडण सोडवल्यानंतर दोघेही घरी गेले. परंतु मारहाणीत डोक्याला झालेली गंभीर इजा लवकर लक्षात न आल्याने सकाळी मोठा भाऊ झोपेतून उठलाच नाही. रुग्णालयात दाखल केले असता सायंकाळी उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सुनील बाबूराव मुंडलिक (३५, रा. गल्ली क्र. २, पुंडलिकनगर) असे मृताचे नाव असून मारहाणीत त्याचा लहान भाऊ संदीप जखमी झाला आहे. याप्रकरणी मनोज जाधव (रा. गल्ली क्र. ५ हनुमाननगर) आणि शेख जावेद ऊर्फ टिपू व इतर दोन अनोळखी तरुणांवर पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  


मृत सुनील लाइट फिटिंगचे काम करत होता तर संदीपदेखील एका इलेक्ट्रॉनिक साहित्याच्या दुकानात कामाला आहे. रविवारी (२५ नोव्हेंबर) दोघेही भाऊ कामानिमित्त बाहेर गेले होते. रात्री दहाच्या सुमारास सीडी डिलक्स दुचाकीवरून गजानन महाराज मंदिराकडून पुंडलिकनगरकडे जात होते. या वेळी स्वामी समर्थ मंदिराच्या कमानीसमोरून दोन दुचाकींवर काही तरुण भरधाव विरुद्ध दिशेने येत हाेते. कट मारताना सुनील व संदीपचा धक्का लागला म्हणून टोळक्याने त्यांना अडवले. शिवीगाळ सुरू करून दोन्ही भावांना बेदम मारहाण सुरू केली. यात सुनील जमिनीवर कोसळला. तेव्हा चौघांनी पुन्हा त्याच्यावर हल्ला चढवला. मनोज हा संदीपच्या ओळखीचा असल्याने भावाला सोडण्यासाठी विनवण्या केल्या. परंतु कोणीही थांबले नाही.

 

संदीपने काही वेळाने चौघांना आवरत वाद सोडवला व सुनीलला घेऊन घरी पोहोचला. यादरम्यान त्याला उलट्यांचा त्रास झाला. सोमवारी सकाळी दहा वाजता मात्र सुनील झोपेतून उठलाच नाही. त्याला तत्काळ सेव्हन हिल्स परिसरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचार सुरू असताना सायंकाळी ७.३० वाजता सुनीलचा मृत्यू झाला.

 

पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक रामचंद्र पवार, विलास वैष्णव, धर्मराज जाधव, गजेंद्र गोलवाड यांनी रुग्णालयात धाव घेतली. खुनाचा प्रकार समजताच गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक अजबसिंग जारवाल, राजेंद्र साळुंके, शिवाजी झिने, सुनील धात्रक, विशाल सोनवणे, शिवा शिंदे यांच्या पथकाने आरोपींचा शोध सुरू केला. मंगळवारी संदीपच्या तक्रारीवरून पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक एल. ए. शिंगारे करत आहेत.


डोक्याला इजा आणि विषबाधा
सुनीलचे शवविच्छेदन झाल्यानंतर डॉक्टरांनी डोक्याला इजा व विषबाधेमुळे मृत्यू झाल्याचे नमूद केले. पोलिसांना माहिती देताना संदीपने हातापायाने मारहाणीसोबत टणक लोखंडी वस्तूने सुनीलच्या डोक्यात वार केल्याचे सांगितले. परंतु विषबाधा कशामुळे झाली, हा प्रश्न पोलिसांना पडला. शवविच्छेदनाचा सविस्तर अहवाल व पुढील चौकशीत इतर गोष्टी समोर येतील, असे निरीक्षक शिंगारे यांनी सांगितले

बातम्या आणखी आहेत...