बीड बायपास राष्ट्रीय'मृत्यू'मार्ग: / बीड बायपास राष्ट्रीय'मृत्यू'मार्ग: सहारा सिटी वळणावर भरधाव स्कॉर्पिओच्या धडकेत एक ठार

बीड बायपास रोडवर अपघाताची मालिका सुरूच असून गुरुवारी सकाळी पावणे दहा वाजेच्या सुमारास सहारा सिटीमध्ये जाण्यासाठी बायपासवरून वळण घेत असलेल्या दुचाकीस्वार मजुरास देवळाई चौकाच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या स्कॉर्पिओने उडवले. स्कॉर्पिओ एवढी वेगात होती की, तिने दुुचाकीस्वारास दूरवर फरपटत नेले. त्यामुळे मजुराचा जागीच मृत्यू झाला. फरपट नेल्यामुळे दुचाकीचे इंजिनही फुटले. अपघातानंतर स्कॉर्पिओ चालक गाडी सोडून फरार झाला.

Sep 07,2018 09:06:00 AM IST

औरंगाबाद- बीड बायपास रोडवर अपघाताची मालिका सुरूच असून गुरुवारी सकाळी पावणे दहा वाजेच्या सुमारास सहारा सिटीमध्ये जाण्यासाठी बायपासवरून वळण घेत असलेल्या दुचाकीस्वार मजुरास देवळाई चौकाच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या स्कॉर्पिओने उडवले. स्कॉर्पिओ एवढी वेगात होती की, तिने दुुचाकीस्वारास दूरवर फरपटत नेले. त्यामुळे मजुराचा जागीच मृत्यू झाला. फरपट नेल्यामुळे दुचाकीचे इंजिनही फुटले. अपघातानंतर स्कॉर्पिओ चालक गाडी सोडून फरार झाला.


मुकुंदवाडीच्या शिवशाही नगरमधील भगवान गंगाधर शेळके (४४) चार महिन्यांपासून सहारा सिटीतील कंत्राटदाराकडे काम करतात. गुरुवारी सकाळी दुचाकीने ते कामावर जाण्यासाठी निघाले. बीड बायपासवरून त्यांनी सहारा सिटीसमोर असलेल्या वळणावरून वळण घेऊन रस्ता ओलांडला. रस्ता ओलांडून रस्त्याच्या खाली उतरलेल्या शेळके यांच्या अंगावर जालन्याकडून देवळाई चौकाच्या दिशेने भरधाव जात असलेली स्कॉर्पिओ ( क्रमांक : एमएच २१- व्ही २५२९) येऊन धडकली. स्कॉर्पिओने त्यांना रस्त्याच्या खाली कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर लावलेल्या गट्टूपर्यंत घासत नेले. यात शेळके यांचा जागीच मृत्यू झाला. स्थानिकांनी पोलिसांना कळवले. त्यानंतर शेळके यांचा मृतदेह घाटी रुग्णालयात नेण्यात आला. एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करून स्कॉर्पिओ जप्त करण्यात आली. परंतु अपघातानंतर चालकाने लगेच धूम ठोकली होती. बीडबायपासवर वेग व जड वाहनांमुळे अपघात होऊन मृत्यूची शृंखला सुरू आहे. त्यात महिनाभरात आठ जणांचे बळी गेले आहेत. गुरुवारी शेळके यांचा ९ वा बळी गेला. शेळके हे मूळ पैठण तालुक्यातील केकतजळगाव येथील आहेत. दहा बारा वर्षांपूर्वी कामानिमित्त ते शहरात स्थायिक झाले होते. रोज सकाळी आठला कामाला जाणाऱ्या शेळके यांना गुरुवारी उशीर झाल्याने ते नऊ वाजता निघाले व अपघात झाला, असे त्यांच्या छोट्या मुलाने सांगितले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन विवाहित मुली असून मोठा मुलगा वाहन चालक आहे.


राँग साइड जाणाऱ्या दुचाकींची समोरासमोर धडक; २ ठार
राँग साइड जाणाऱ्या दुचाकीचालकामुळे त्याच्यासह दुसऱ्याही दुचाकीचालकाचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना बुधवारी आपदभालगाव उड्डाणपुलावर रात्री नऊ वाजता घडली. विजय शांतीलाल फुतपुरे (३०, रा. कचनेर) व वासुदेव कल्याण बोंगाणे (२८, रा. नायगाव) अशी त्यांची नावे आहेत. विजय आईसोबत दुचाकीने (एमएच २० - ई एस ८०१८) उड्डाणपुलावरून राँग साइड जात होता. या वेळी समोरून वासुदेव हे दुचाकीवरून (एमएच २० - डी एल - २९२३) येत होते. अंधारात दोन्ही दुचाकी समोरासमोर धडकल्या व यात तिघेही गंभीर जखमी झाले. तिघांना घाटीत दाखल केल्यावर डॉक्टरांनी वासुदेव यांना तपासून मृत घोषित केले तर विजय यांचा गुरुवारी मृत्यू झाला.चिकलठाणा पोलिस ठाण्याचे लहू थोटे तपास करत आहेत.


अपघात झाल्यानंतर आला स्फोटासारखा मोठा आवाज
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, स्कॉर्पिओचा वेग इतका प्रचंड होता की अपघात झाल्यानंतर स्फोट व्हावा, तसा आवाज ऐकू आला. या धडकेत काही फुटापर्यंत दुचाकी घासत नेल्याने शेळके यांच्या दुचाकीचे इंजिन फुटले. सहारा सिटीसमोर रस्त्याच्या खाली बसवलेल्या गट्टूंवर चाक घासल्याचे काळे निशाण उमटले. यात स्कॉर्पिओच्या समोरील बाजूचाही बराच भाग फुटला होता.

X