आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
जळगाव - पूर्ववैमनस्यातून झालेल्या गोळीबार व हल्ल्यात भुसावळातील भाजप नगरसेवक रवींद्र खरात यांच्यासह कुटुंबातील चार सदस्य तसेच सुमीत गजरे या तरुणाचा खून झाला. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यासह राज्य हादरले. या पाचही जणांच्या शवविच्छेदनास रुग्णालय प्रशासनाला तब्बल सात तास लागले. यात सुमीतच्या डोक्यातून एक गोळी बाहेर काढण्यात आली. इतर सर्वांच्या अंगावर चाकू, गुप्तीने भोसकल्याच्या खुणा आढळल्या आहेत.
नगरसेवक रवींद्र खरात यांच्यासह पाच जणांच्या खुनाची घटना रविवारी रात्री भुसावळ शहरात घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी तीन संशयितांना रात्रीच ताब्यात घेऊन पहाटे अटक केली आहे. दरम्यान, अत्यंत गंभीर स्वरूपाची घटना असल्यामुळे पोलिस तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या प्रशासनाने काळजीपूर्वक तपास केला. सोमवारी दुपारी ११ वाजेपासून शवविच्छेदनास सुरुवात करण्यात आली. या हल्ल्यात मारेकऱ्यांनी पिस्तुलाचा वापर केलेला असल्यामुळे मृतांच्या शरीरात गोळ्या (काडतुसे) असल्याची दाट शक्यता होती. पुढील कार्यवाही तसेच पुराव्यासाठी काडतूस सापडणे अत्यंत आवश्यक होते. त्यामुळे सकाळी ११ वाजेपासून खरात यांच्यासह सर्व पाचही जणांचे मृतदेह सीटीस्कॅन मशीनमध्ये स्कॅन करण्यात आले. या वेळी त्यांच्या शरीरात काडतुसे अडकलेली आहेत की नाही, याची खात्री करण्यात आली. वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ.नीलेश देवराज, सचिन अहिरे, वैभव सोनार, माधुरी रोहेरा यांच्या पथकाने शवविच्छेदन केले. या वेळी सुमीत गजरे याच्या हनुवटीतून आतमध्ये गोळी शिरल्याचे दिसून आले. ही गोळी त्यांच्या मेंदूजवळ अडकलेली होती. दरम्यान, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, गिरीश महाजन यांनी खरात कुटुंबीयांचे सात्वंन केले.
एप्रिल महिन्यातही झाला होता हल्ल्याचा प्रयत्न
एप्रिल महिन्यातदेखील नगरसेवक यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता. त्या वेळी मारेकऱ्यांनी त्यांच्या घराबाहेर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या होत्या. तसेच त्यांची चारचाकीदेखील फोडली होती. या वेळी खरात यांनी पोलिसांत तक्रार करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नाही. पोलिसांनी त्या वेळी या प्रकरणात हलगर्जीपणा केल्यामुळे अखेर मारेकऱ्यांनी पुन्हा एकदा खरात कुटंुबीयांवर हल्ला करून पाच जणांचा खून केला. असा आरोप खरात कुटंुबीयांनी केला आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.