आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका तरुण सहका-याचा मृत्यू

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


रविवारचा दिवस होता. त्या दिवशी सकाळीच माझ्या ऑफिसातील एका सहका-याचा फोन आला.त्यांनी सांगितलेली माहिती धक्कादायक होती. खुलताबादचे तालुका कृषी अधिकारी विष्णुपंत कोकाटे यांना अपघात झाल्याचे त्यांनी सांगितले. मी अधिक माहिती घेण्याच्या प्रयत्नात असतानाच फोन कट झाला. पुढे संपर्क न झाल्याने मी घाटी हॉस्पिटलला गेलो. तेथे त्यांची माहिती न मिळाल्याने परतत होतो, तेव्हा ऑफिसचे काही सहकारी भेटले.त्यांनी कोकाटे यांचे निधन झाल्याची माहिती दिली. मन सुन्न झाले. सुमारे दोन वर्षे त्यांच्यासोबत मी काम केले. एक खिडकी योजनेत माझा त्यांच्याशी संपर्क आला. या माणसाच्या चांगुलपणाचा मला अनुभव आला.

लोकांशी सहकार्याच्या भावनेने मदत करायची हा त्यांचा स्वभावविशेष होता. बंडिंग खात्यात वादविवाद असतात. नैतिकता तेथे अभावानेच आढळते, पण कोकाटेंनी आपली नैतिकता सोडली नाही किंवा कोणत्याही प्रलोभनाला ते बळी पडले नाहीत. त्यांच्यावर इतर अधिका-यांनी अन्याय केला, पण त्यांच्याबाबतीतही त्यांनी कधी तक्रार केली नाही. शेतकरी कुटुंबात जन्म झालेला असल्याने त्यांना शेतक-यांविषयी आपुलकी वाटत होती. त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी ते प्रयत्न करत. शासकीय कामेही ते वेळेत पूर्ण करण्यासाठी आग्रही असल्याने इतर अधिकारी फटकून वागत असत. त्यांच्या अपघाती निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा पहाड कोसळला. मित्रवर्गातही त्यांची लोकप्रियता होती. मला त्यांचे सतत मार्गदर्शन मिळत होते. त्यांनी कधी कोणाचा द्वेष केला नाही. मी एका प्रामाणिक अधिका-या च्या मित्रत्वाला पारखा झालो.