खाद्यान्न पोहोचवणाऱ्या कंपन्यांना / खाद्यान्न पोहोचवणाऱ्या कंपन्यांना 2 वर्षांत 1,371 कोटींचा तोटा, तरी 5.5 कोटी ऑर्डर 

Feb 14,2019 10:01:00 AM IST

नवी दिल्ली- अॅपच्या माध्यमातून ऑर्डर घेऊन खाद्यान्न पोहोचवण्याचा व्यवसाय भारतात तेजीने वाढत आहे. स्विगी, झोमॅटो, उबेर ईट्स आणि फूड पांडासारख्या कंपन्या जास्तीत जास्त ग्राहक जोडण्यासाठी अनेक प्रकारचे डिस्काउंट देत आहेत. यामुळे त्यांना कोट्यवधी रुपयांचा तोटा होत आहे. मार्च २०१८ मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात या कंपन्यांना एकूण ७३१ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. त्या आधीच्या आर्थिक वर्षात २०१६-१७ मध्ये या कंपन्यांना ६४० कोटी रुपयांचा तोटा झाला होता. म्हणजेच दोन वर्षांत या कंपन्यांनी एकूण १,३७१ कोटी रुपयांचा तोटा सहन केला आहे. यात सर्वाधिक तोटा स्विगीला झाला आहे. त्यानंतर झोमॅटोचा क्रमांक आहे. या दोन्ही सध्या भारतातील फूड डिलिव्हरी क्षेत्रातील सर्वात मोठ्या कंपन्या आहेत. स्विगी भारतात या क्षेत्रातील एकमेव युनिकॉर्न (१०० कोटी डॉलरपेक्षा जास्तीचे मूल्य असलेली) कंपनी आहे.

जास्तीत जास्त ग्राहक कंपनीसोबत जोडले जाऊन हे अॅप लोकांच्या दिनक्रमातील एक भाग व्हावा, यासाठी या कंपन्या तोटा सहन करत आहेत. सध्या भारतात दर महिन्याला फूड डिलिव्हरी अॅपच्या माध्यमातून ५.५ कोटी ऑर्डर दिल्या जात आहेत. २०२१ पर्यंत भारतात अॅपच्या माध्यमातून फूड डिलिव्हरी बिझनेस चारपट वाढून २.५ अब्ज डॉलरचा (सुमारे १७.७ हजार कोटी रुपये) होईल. देशात स्मार्टफोनची विक्री वाढवण्याबरोबरच या व्यवसायात तेजी दिसून येत आहे. याच अपेक्षेमुळे गुंतवणूकदारदेखील या व्यवसायात मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवत आहेत.

स्विगी आणि झोमॅटोने मागील वर्षात १४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक मिळवली आहे. यातील अर्ध्यापेक्षा जास्त गुंतवणूक स्विगीला मिळाली आहे. ओलाची मालकी असलेली कंपनी फूड पांडा त्यांच्या व्यवस्थापनात तेजी आणण्यासाठी सुमारे १.४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.

स्विगी अन् झोमॅटोलाच मिळतात ८१ टक्के ऑर्डर
भारतात सध्या दर महिन्याला अॅपच्या माध्यमातून ५.५ कोटी फूड ऑर्डर केले जाते. यामधील ४.५ कोटी ऑर्डर (८१ टक्के) स्विगी आणि झोमॅटोला मिळतात. उर्वरित उबेर ईट्स आणि फूड फांडाला मिळत आहेत. सलग खर्च वाढत असतानाही स्पर्धेमुळे कंपन्यांची सवलत पूर्णपणे संपलेली नाही. झोमॅटो, उबेर ईट्स आणि फूड पांडा अजूनही अनेक उत्पादनांवर ५० टक्क्यांपर्यंत सूट देत आहेत. खर्चाच्या बाबतीत स्विगी या सर्वांच्या पुढे आहे. मार्च २०१८ मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात कंपनीने ८६५ कोटी रुपये खर्च केले. त्यानंतर झोमॅटो आणि फूड पांडाचा क्रमांक लागतो.

X