आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओएलएक्स वेबसाइटवर वाढले ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार, फसवणुकीच्या दर महिन्याला १५० तक्रारी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगेश फल्ले 

पुणे - ओएलएक्स या ऑनलाइन वस्तू खरेदी-विक्री वेबसाइटवर दिवसेंदिवस ग्राहकांच्या फसवणुकीचे प्रकार वाढलेले असून राजस्थान-हरियाणा-उत्तर प्रदेश राज्यांच्या सीमेवरील मेवार भागातून नागरिकांना माेठ्या प्रमाणात गंडा घातला जात आहे. पुणे सायबर गुन्हे शाखेच्या पाेलिसांनी मागील तीन महिन्यांत ओएलएक्सवरील खरेदी-विक्रीच्या बनावट दाेन हजार जाहिरातींवर कारवाई केली असून संशयास्पद दाेन हजार ११६ माेबाइल क्रमांकांवर कारवाई केल्याने फसवणुकीच्या प्रमाणात काही प्रमाणात घट हाेत आहे.

ओएलएक्स वेबसाइटवर दुचाकी वाहने, कार, फर्निचर, महागडे माेबाइल, गृहोपयाेगी वस्तू विक्री करावयाच्या असल्याचे सांगत त्यांचे फाेटाे अपलाेड केले जातात आणि संपर्कासाठी माेबाइल क्रमांक दिला जाताे. ही वाहने, वस्तू आर्मीमधील जवानाच्या असल्याचे सांगत त्यांचे बनावट ओळखपत्र दाखवले जात असल्याने सामान्यांचा पटकन विश्वास बसताे. संबंधित वस्तू घेण्याकरिता काही रक्कम आगाऊ स्वरूपात पेटीएम/गुगल पे, फाेन पे याद्वारे ट्रान्सफर करण्यास सांगितले जाते. प्रत्यक्षात काेणतीही वस्तू अथवा वाहन न पाठवले जात नाही. गुगल पे, फाेन पेवर यूपीआय आयडीद्वारे परस्पर इतर बँक खात्यात पैसे वळवून लगेच एटीएममधून काढले जातात. आराेपी वेगवेगळे माेबाइल क्रमांक वापरत असल्याने त्यांचा शाेध घेणे पाेलिसांना अवघड बनत आहे. मात्र, पाेलिसांनी आता ओएलएक्सवरील फसवणुकीच्या जाहिराती ओळखून त्या ब्लाॅक करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. परिणामी फसवणुकीच्या प्रकारांत काही प्रमाणात घट हाेण्यास सुरुवात झाली आहे. सायबर पाेलिसांनी तक्रार अर्जांची छाननी करून वारंवार वापरले जाणारे पेटीएम खाते तसेच बँक खाते फ्रिज केलेले आहे. पेटीएम कंपनीशी यासंदर्भात संपर्क झाल्यानंतर १३०८ माेबाइल क्रमांकांची पेटीएम खाती बंद करण्यात आली आहेत, तर आराेपींची ७५ बँक खाती फ्रिज करण्यात आलेली आहेत. 

पूर्ण गावेच ऑनलाइन फसवणुकीत


पुणे पाेलिसांचे एक पथक आराेपींचा माग काढत राजस्थानमधील भरतपूर व अलवर या जिल्ह्यातील काही गावांमध्ये पाेहोचले असता, पाेलिस येत असल्याचे दिसताच संशयित आराेपी गावातून पसार हाेतात किंवा पाेलिस गावात पाेहोचताच स्थानिकांचा प्रचंड विराेध त्यांना हाेऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण हाेताे. तर, हरियाणातील नुह जिल्हा आणि उत्तर प्रदेशमधील मथुरा जिल्ह्यातील देवसरार्इ भागात अशाच प्रकारे संशयित आराेपी ओएलएक्सवरून फसवणूक करत असून स्थानिक पाेलिसांचे मनुष्यबळ कमी असल्याने त्यांच्यावर कारवाई करता येऊ शकत नाही. 
 

अशी घ्यावी काळजी : वस्तूंची खातरजमा केल्याशिवाय खरेदीचे व्यवहार करू नका

  • विक्री करणाऱ्याशी प्रत्यक्ष भेट झाल्यानंतर व वस्तू प्राप्त झाल्यानंतरच पैसे देणे
  • वस्तू खरेदीकरिता आगाऊ रक्कम न देणे
  • वस्तू विक्री करणाऱ्यांची भेट ठरलेल्या सार्वजनिक ठिकाणीच घ्या. ठिकाण बदलू नका
  • प्रत्यक्ष वस्तू ज्या प्रकारे दाखवली त्याची खातरजमा करूनच किंमत द्या
  • खरेदी/विक्री व्यवहाराशी संबंधित ओटीपी काेणासाेबत शेअर करू नका
  • खरेदीदारास बँक खात्याची किंवा इतर वैयक्तिक माहिती देऊ नका
  • वाहन खरेदी करताना वाहनाची कागदपत्रे पडताळून व वाहन पाहूनच पैसे द्या
  • फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तत्काळ पाेलिसांशी संपर्क साधा

फसवणुकीच्या दर महिन्याला १५० तक्रारी


सायबर गुन्हे शाखेचे पाेलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितले की, ओएलएक्सच्या माध्यमातून ऑनलाइन फसवणुकीच्या तक्रारी यंदा माेठ्या प्रमाणात वाढलेल्या असून दर महिन्याला सरासरी १५० तक्रारी येत आहेत. मागील वर्षी ओएलएक्स फसवणुकीच्या केवळ २५० तक्रारी हाेत्या, परंतु यंदा त्यांचे प्रमाण एक हजारपेक्षा अधिक झाले आहे. आर्थिक फसवणुकीची रक्कम कमी आहे, पण फसवणूक हाेणाऱ्या ग्राहकांची संख्या अधिक आहे. ओएलएक्सवर स्वत:हून पाेलिस दरराेज बनावट ६० ते ७० जाहिराती ब्लाॅक करत आहेत. नागरिकांनी ऑनलाइन व्यवहार करताना पुरेशी खबरदारी घेतली पाहिजे. 
 

बातम्या आणखी आहेत...