आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कथा प्रेमाची: ऑनलाइन प्रेमात वयाचा अडसर, मुलीला पाठवले बालसुधारगृहात

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबद- प्रेमामध्ये कुठलेही बंधन नसते असे म्हणतात. अशीच एक घटना फेसबुकच्या माध्यमातून घडली आहे. वय अवघे १७ वर्षे साक्षी (नाव बदलले आहे ) उमरग्यात इयत्ता बारावीत शिक्षण घेते. तिची कन्नड येथील विश्वास २० (नाव बदलले आहे) याच्याशी फेसबुकवर मैत्री झाली. मागील सहा महिन्यांपासून रोज चॅटिंग सुरू होती. त्याचे रूपांतर ऑनलाइन प्रेमात झाले. ऑनलाइनच एकमेकांनी प्रेमाच्या आणाभाका घातल्या अन् त्यांनी थेट घर सोडून औरंगाबाद गाठले. आठ दिवसानंतर हे प्रेम ओसरले. मुलांनी घरी फोन केला तेव्हा अरे ती मुलगी अजून लहान आहे. शिवाय आपल्या समाजाची नाही, असे सांगत त्याचा पत्ता विचारला आणि चाइल्ड हेल्पलाइनला फोन करून दोघांनाही पोलिसांच्या ताब्यात दिले. 

 

छावणी पोलिसांनी देखील घटनेचे गांभीर्य तत्काळ लक्षात घेऊन घटनास्थळी धाव घेतली. दोघांनाही ताब्यात घेतले. विश्वासला पुन्हा त्याच्या घरी पाठवले तर साक्षीच्या आई-वडिलांना याबाबत माहिती दिली. मात्र, संतप्त आई-वडिलांनी मुलीसोबत नाते तोडत आमच्या मुलीचे काय करायचे ते करा, असे पोलिसांना सांगितले. त्यानंतर साक्षीला पोलिसांना बाल सुधारगृहात ठेवावे लागले. आठ दिवसांपूर्वी हे दोघेही शहरात आले होते. वाळूज परिसरात जागा मिळेल त्या ठिकाणी थांबले. त्या मुलीने वडिलांचे कार्ड दाखवत नोकरी मागण्याचा प्रयत्न केला. तेव्हा चौकशीसाठी ज्या ठिकाणी नोकरी मागण्यासाठी गेले त्यांनी वडिलांना फोन केला. तेव्हा या मुलीला नोकरी देऊ नका, असे वडिलांकडून सांगण्यात आले. त्यामुळे मुलाने घरी वडिलांना फोन केला तेव्हा विश्वासच्या आई-वडिलांनी गोड बोलून तू कुठे आहे हे काढून घेतले. नंतर चाइल्ड हेल्पलाइनला फोन करत माहिती दिली. चाइल्ड हेल्पलाइनचे सदस्य आणि उपनिरीक्षक रावसाहेब मुळे यांनी तत्काळ बाबा पेट्रोल पंपाजवळील महावीर चौक गाठले व दोघांना ताब्यात घेतले. पोलिस निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. मुलीचे वडील शासकीय नोकरदार आहेत. दरम्यान मुलगी ही मुलाच्या घरी देखील गेली होती. मात्र, मुलाच्या कुटुंबीयांनी मुलीला स्वीकारले नसल्यामुळे तो तिला घेऊन परत शहरात आल्याची माहिती समोर आली आहे. या बाबतही तपास सुरू आहे. या प्रकरणात अजून कोणीही फिर्याद दिलेली नाही, त्यामुळे मुलीची वैद्यकीय तपासणी करून त्यानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. 

 

दोन्ही कुटुंबीयांनी केला प्रेमवीरांचा तिरस्कार 
समाजामध्ये आजही आंतरजातीय प्रेमाला थारा दिला जात नाही, जेव्हा मुलगी घरातून निघून गेल्याचे समजते. तेव्हा मुलीचे आई-वडील मुलीला काय करायचे ते करा, तिचे आमच्याशी काहीही नाते नाही, असे बोलून मोकळे झाले. तर मुलाचे आई-वडील ती मुलगी आपल्या जातीची नाही. त्यामुळे तिला घरात आणू नको, असे म्हणाले. त्यामुळे शेवटी त्या दोघांनी पुन्हा शहर गाठले.