आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्याच्या हरभऱ्याचे एक लाख ३६ हजार दुसऱ्याच्या खात्यात जमा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


परतवाडा - महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य दर मिळावे, याकरिता शासकीय खरेदी प्रारंभ केली होती. मात्र शासनाच्या ऑनलाइन प्रणालीमुळे मोठा गोंधळ झाला असून, अनेक शेतकऱ्यांना धान्य विक्री केल्यानंतरही मालाची रक्कम त्यांच्या खात्यात जमा न झाल्याने त्यांना मानसिक त्रासाचा सामना करावा लागत आहे. त्यातच भिलोना येथील शेतकऱ्याचे हरभरा विक्रीचे १ लाख ३६ हजार रुपये दुसऱ्याच शेतकऱ्याच्या खात्यात जमा झाल्याची बाब पुढे आली असून, अचलपूर खरेदी विक्री संघांतर्गत खरेदी केलेल्या शासकीय हरभरा खरेदीचा गोंधळ संपता संपत नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. 


भिलोना येथील शेतकरी सुनील पंजाबराव उभाड व वैशाली सुनील उभाड या शेतकऱ्यांनी एप्रिल २०१८ मध्ये २० क्विंटल हरभरऱ्याची विक्री केली होती. विक्री केलेल्या हरभराची रक्कम भरपूर दिवस लोटूनही प्राप्त न झाल्याने त्यांनी वारंवार चौकशी केली असता, ही रक्कम दुसऱ्याच शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा झाल्याची बाब पुढे आली. अचलपूर खरेदी विक्री संघ शासनाच्या धान्य खरेदीची सब एजन्सी म्हणून नियुक्त असल्याने या एजन्सी अंतर्गत तूर, हरभरा या धान्याची खरेदी केली होती. भिलोना येथील शेतकरी सुनील उभाड व वैशाली उभाड यांनी मागील वर्षी शासनाला हरभऱ्याची विक्री केली होती. त्यांनी हरभरा विक्री केलेल्या तारखेतील शेतकऱ्यांना माल विक्री केल्याची रक्कम मिळाली होती, परंतु उभाड यांच्या खात्यात रक्कम जमा न झाल्याने त्यांनी खरेदी विक्रीत वारंवार विचारणा केली. बँक खात्याचे दस्तावेज पुन्हा सादर केले, तरीदेखील रक्कम खात्यात जमा न झाल्याने त्यांनी चौकशी केली असता उपरोक्त प्रकार पुढे आला. 


ऑनलाइन प्रक्रियेची तांत्रिक चूक ठरली डोकेदुखी 
चौकशी अंती सुनील उभाड व वैशाली उभाड यांच्या हरभरा खरेदीचे १ लाख ३६ हजार रुपये भिलोना येथील गजानन उभाड यांच्या खात्यात जमा झाल्याचे निष्पन्न झाले. ऑनलाइन प्रक्रियेच्या तांत्रिक चुकीमुळे हा प्रकार झाला असला, तरी या शेतकऱ्यांना रक्कम प्राप्त करण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागला. 


तांत्रिक चुकीमुळे झाला गोंधळ 
ऑनलाइन प्रक्रियेमुळे ज्या शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी करण्यात आला होता. त्या शेतकऱ्याऐवजी दुसऱ्या खात्यात ही रक्कम तांत्रिक चुकीमुळे टाकण्यात आली. ही बाब स्पष्ट झाली असून ज्या शेतकऱ्याच्या खात्यात ही रक्कम जमा झाली आहे, ती रक्कम संबंधित शेतकऱ्यांना परत करणार असल्याने त्यामुळे पुढील अडचण राहली नाही. लवकरच संबंधित शेतकऱ्यांना ही रक्कम दिली जाईल. सतीश थुटारे, अध्यक्ष, खरेदी विक्री संस्था, अचलपूर 


रक्कम देण्याचे दिले खविसंने आश्वासन 
भिलोना येथील शेतकरी गजानन पाटील उभाड यांच्या बँक खात्यात काही महिन्यांपूर्वी १ लाख ३६ हजार रुपये जमा झाले. ही रक्कम खात्यात कशी आली, हे त्यांनाही कळले नाही. मोदी शासन खात्यात पैसे जमा करीत असल्याने कदाचित आपल्याला ही रक्कम आली असेल म्हणून त्यांनी आपल्या आवश्यक गरजेसाठी काही प्रमाणात ती खर्चही केली. मात्र चुकून ही रक्कम खविसंकडून खात्यात जमा झाल्याचे माहित होताच त्यांनी ती रक्कम परत देण्याचे आश्वासन दिले. 
 

बातम्या आणखी आहेत...