आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशात 11% नागरिक वाचतात पुस्तके, राज्यात 25% पुस्तकप्रेमी; सर्वाधिक वाचक मुंबई महानगरात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- इंटरनेट आणि मोबाइलच्या युगात वाचन संस्कृती संपली, अशी भीती वाटणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्रातील एक चतुर्थांश म्हणजेच २५ % नागरिक पुस्तकांचे नियमित वाचन करतात. तर देशात सर्वाधिक ३३ % वाचक मुंबईकर आहेत. एवढेच नव्हे तर देश आणि अन्य राज्यांतील पुुस्तक वाचणाऱ्यांची संख्या घटत असताना महाराष्ट्रातील वाचकांच्या संख्येत गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ झाली आहे. पुस्तकांवर सर्वाधिक खर्च करणारे, वाचनासाठी अधिक वेळ देणारेही मराठी वाचक आहेत.

 

महाराष्ट्र, मुंबईकर वाचनात आघाडीवर
देशात सर्वाधिक म्हणजे ३३ % मुंबईकर पुस्तके वाचतात. गेल्या वर्षीच्या तुलनेत वाचनप्रिय मुंबईकरांची संख्या ३१ वरून वाढून ३३ % वर पोहोचली आहे. देशात मात्र ती ही संख्या ३ टक्क्यांनी घटून १४ वरून ११ टक्क्यांवर आली आहे. महाराष्ट्रात वाचक एक टक्क्याने वाढला आहे.

 

२० हजार नागरिकांचा कौल
ऑगस्ट ते नोव्हेंबरदरम्यान उत्तर आणि पश्चिम भारतात सर्वेक्षण झाले. अशा प्रकारचे हे तिसरे सर्वेक्षण आहे. यंदा श्रेणी २ आणि श्रेणी ३ शहरातील १५,३८१ पुरुष आणि ५३०५ महिला अशा २०,६८६ वाचकांना प्रश्न विचारण्यात आले. महाराष्ट्रात मुंबई, औरंगाबाद, अहमदनगर, अमरावती, नाशिक, अकोला, जळगाव, सोलापूर आणि यवतमाळ या शहरांत सर्वेक्षण झाले.

 

वाचनात महिला पुढे
१५ % महिलांनी पुस्तके वाचत असल्याचे सांगितले. गेल्या वर्षी ही संख्या १८ % होती. तर केवळ १० % पुरुष पुस्तके वाचतात. गेल्या वर्षी ही संख्या १३ % होती. सर्वाधिक पुस्तके ४१ ते ६० वयोगटातील नागरिक वाचतात.

 

महिन्याकाठी १ किंवा २ पुस्तके
महिन्याकाठी १२ % वाचक सरासरी १ किंवा २ पुस्तके वाचतात, तर २ हून अधिक पुस्तके वाचणाऱ्यांची संख्या १ % आहे. यातही महिला वाचक आघाडीवर आहेत. २२ % महिला तर १० % पुरुष सरासरी १ किंवा त्याहून अधिक पुस्तके वाचतात. एक किंवा त्याहून अधिक पुस्तके वाचणाऱ्यांत २५ % वाचक हे ४१ ते ६० वयोगटातील आहेत. तर देशात एक किंवा त्याहून अधिक पुस्तके वाचणाऱ्यांत सर्वाधिक ३५ % वाचक हा मुंबईकर आहे. हिंदीबहुल भागात हरियाणात १५ % वाचक तर बिगरहिंदी भागात महाराष्ट्रातील २५ % वाचक एकापेक्षा अधिक पुस्तकांचे वाचन करतात. महानगरांमध्येही मुंबईकरच सर्वाधिक पुस्तकांचे वाचन करतात.

 

मातृभाषेतील पुस्तकांना पसंती (टक्क्यात) :
सरासरी ५९ % वाचक हिंदी तर १४ % वाचक इंंग्रजी पुस्तकांचे वाचन करतात. गेल्या वर्षी हे प्रमाण अनुक्रमे ६३ आणि १८ % होते. ५७ % पुरुष तर ६४ % महिला हिंदी साहित्याचे वाचन करतात. १६ % पुरुष तर ८ % महिला इंग्रजी पुस्तके वाचतात. १६ ते २५ वयोगटातील ५५ % वाचक हिंदी तर २१ % वाचक इंग्रजी पुस्तके वाचतो. २६ ते ४० वयोगटातील ५८ % हिंदी तर २० % वाचक इंग्रजी वाचतो. ४१ ते ६० वयोगटातील ६५ % वाचक हिंदी तर १ % वाचक इंग्रजी पुस्तके वाचतात.

 

दिवसाकाठी वाचनासाठी ४६ मिनिटे :
भारतीय वाचक सरासरी दिवसाकाठी ४६ मिनिटे वाचन करतो. गेल्या वर्षी हे प्रमाण ४९ मिनिटे हाेते. अत्यंत व्यग्रतेतूनही मुंबईकर देशात सर्वाधिक ८५ मिनिटे वाचनासाठी वेळ काढतो हे विशेष.

बातम्या आणखी आहेत...