आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

केवळ भाजप आणि शिवसेनाच चर्चेत; बंडखोरीही त्यांचीच

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दीपक पटवे बीड विधानसभा मतदारसंघात जयदत्त क्षीरसागर हे शिवसेनेचे उमेदवार ओबीसी प्रवर्गाचे प्रतिनिधी आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणून त्यांचे पुतणे संदीप हेच राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे लढताहेत.  मराठा समाजाची मते त्यांच्या पारड्यात टाकण्याचा विडा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उचलला आहे. तिथे वंचित बहुजन आघाडीने आधी अशोक हिंगे यांना उमेदवारी जाहीर केली. ते मराठा समाजाचेच आहेत. पण त्यामुळे जयदत्त यांनाच फायदा होईल, अशी ओरड झाल्यावर एका रात्रीत त्यांची उमेदवारी बदलली गेली आणि ओबीसी समाजाचे शिवराज बांगर यांना ती दिली गेली. हे प्रा. बांगर आधी शिवसेनेतच होते. म्हणजे जयदत्त यांना दुहेरी धोका. पण पुन्हा चक्रे फिरली आणि बांगर यांची उमेदवारी बदलून पुन्हा अशोक हिंगे यांनाच उमेदवारी दिली गेली. उमेदवारीच्या अशा अदलाबदलीमागचे कारण काय असावे, यावर बीडमध्ये आता चर्चा रंगत आहेत.  मराठवाड्यातल्या राजकीय कुरघोडीच्या किश्शांपैकी हा एक किस्सा. ४६ विधानसभा मतदारसंघांतल्या अनेक मतदारसंघांत अशा राजकीय कसरती सुरू आहेत. नेमके कोण कोणत्या पक्षाचे उमेदवार आहेत, त्या पक्षाची उमेदवारी त्यांना कशी काय मिळाली, काही मतदारसंघांत अचानक मुंबईतले उमेदवार कसे काय अवतरले, विधानसभा निवडणुकीनंतर कोण कोण पक्षांतर करणार आहेत हे कसे जाहीर सभांमधून सांगितले जाते आहे हे सर्वसामान्यांनाच काय, भल्या भल्या राजकारण्यांना कळेनासे झाले आहे. काही मतदारसंघांत युतीनेच आघाडीसाठी मार्ग प्रशस्त करून दिले आहेत, तर काही ठिकाणी युतीच्या उमेदवारांनाच अडचणीत आणण्याचे काम युतीच्याच नेत्यांनी चालवले आहे. राजकारणात वेगवेगळ्या पक्षात असले तरी वरिष्ठ नेते एकमेकांना सांभाळून घेत असतात, असे म्हणतात. विलासरावांचे चिरंजीव आमदार अमित देशमुख भाजपमध्ये जाणार आहेत, अशी चर्चा मध्यंतरी सुरू झाली होती. तसे घडले नाही; पण ‘असे काहीही नाही’ असेही देशमुखांनी कधी स्पष्ट केले नाही. आताचे लातूरमधले चित्र काय आहे? लातूर शहर हा शिवसेनेकडे असलेला मतदारसंघ अचानक भाजपकडे घेण्यात आला आणि भाजपकडे असलेला ग्रामीण मतदारसंघ शिवसेनेकडे देण्यात आला. का? याला काहीही लाॅॅजिक नाही. लातूर शहरातून मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक अभिमन्यू पवार लढणार होते. तशी तयारीही त्यांनी केली होती. पण अचानक त्यांना औसा मतदारसंघातून लढायला सांगण्यात आले. शहरात भाजपने शैलेश लाहोटी यांना उमेदवारी दिली. पण ते प्रचारच करत नाहीत, असे चित्र आहे. ग्रामीणमध्येही तेच झाले. शिवसेनेने सचिन देशमुख या मुंबईतील व्यक्तीला उमेदवारी दिली. त्यांनी अनोळखी व्यक्तींबरोबर येऊन अर्ज दाखल केला आणि त्यानंतर ते मतदारसंघात कोणाला दिसले नाहीत, असे म्हणतात. तिथले शिवसेनेचे पदाधिकारीही त्यांना ओळखत नाहीत. असे का? याचे उत्तर युतीचे नेतेच देऊ शकतील.  मतदार जे समजायचे ते बरोबर समजतात.  भाजपच्या मित्रपक्षांची कशी दुरवस्था करण्यात आली, याचीही ठळक उदाहरणे मराठवाड्यात सहज समोर येतात. परभणी जिल्ह्यातील पाथरी मतदारसंघात भाजपकडून मोहन फड या विद्यमान आमदाराला तिकीट देण्यात येणार होते. अचानक त्यांना रिपाइंच्या नेत्यांचा फोन आला की त्यांना रिपाइंचा एबी फाॅर्म पाठवण्यात येतो आहे. त्यावर  त्यांनी भाजपच्या नेत्यांना विचारले तेव्हा उत्तर मिळाले की चिन्ह कमळच असेल. फक्त जागा त्या पक्षाला दिली असे दिसावे म्हणून हे करा. नांदेड जिल्ह्यातही नायगाव मतदारसंघ भाजपने रिपाइंला सोडला, तर किनवट शिवसंग्रामला. दोन्ही उमेदवारांना चिन्ह मात्र कमळाचे मिळाले.  मित्रपक्षाच्या नावावर जागा तेवढ्या दिसताहेत.  लातूर जिल्ह्यातील निलंग्याचे आमदार आणि मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी भावासाठी औशातून तिकीट मागितले होते. त्यांना ते न मिळाल्याने नाराजी आहे. त्यांनी वारंवार निष्ठा बदलल्या आणि अलीकडे ते नितीन गडकरी यांच्या संपर्कात होते, असे त्यांना जवळून ओळखणारे नेते सांगतात.  माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची लढत भाजपच्या बापूसाहेब गोरठेकरांच्या विरुद्ध थेट होते आहे. वंचितच्या उमेदवाराने त्यांना लोकसभेत पराभूत करायला मदत केली होती. या वेळी मात्र वंचितचा फारसा प्रभाव पडणार नाही, असे चित्र आहे.   

दोन काका-पुतण्यांची लढाई
मराठवाड्यात दोन काकांची लढाई आपल्या सख्ख्या पुतण्याशीच होते आहे. त्यातली एक जोडी आहे बीडमध्ये. जयदत्त क्षीरसागर यांना त्यांचे पुतणे संदीप यांनी आव्हान दिले आहे. दुसरी जोडी आहे लातूर जिल्ह्यातील निलंगा मतदारसंघात. तिथे मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या विरोधात त्यांचे काका अशोक पाटील निलंगेकर काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत. 
 

अशोक चव्हाण यांना अडकवले
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना त्यांच्या भोकर मतदारसंघात भाजपने पुरते अडकवून ठेवले आहे. एेनवेळी भाजपमध्ये येऊन खासदार झालेल्या प्रताप पाटील चिखलीकरांनी भोकर मतदारसंघात बापूसाहेब गोरठेकरांना भाजपची उमेदवारी मिळवून दिली आहे. सर्वाधिक १३४ उमेदवारांनी १४७ उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या या मतदारसंघात सध्या ९ उमेदवार असले तरी अशोक चव्हाण यांची सरळ लढत बापूसाहेब गोरठेकरांशी होत असल्याने तेही जिद्दीने लढताहेत. 
 

सेनेची हानी, भाजपचा लाभ
मराठवाड्यातही शिवसेना आणि भाजपने मतदारसंघांची अदलाबदल केली आहे. त्यात अर्थातच फायदा भाजपने करून घेतला आहे. कारण पाथरी, गेवराई, तुळजापूर आणि लातूर शहर असे चार मतदारसंघ भाजपने सेनेकडून काढून स्वत:कडे घेतले आहेत. शिवसेनेला मात्र लातूर ग्रामीण हा भाजपकडे असलेला एकमेव मतदारसंघ देण्यात आला आहे. अर्थात, भाजपने आपले या तीन मतदारसंघ प्रत्येकी रिपाइं, रासप आणि शिवसंग्रामकडे दिले आहेत.
 

बंडखोरीचा तेराचा आकडा..
सत्ता युतीचीच येण्याची शक्यता असल्याने बंडखोरीही त्याच पक्षांमध्ये सर्वाधिक आहे. ४६ पैकी १३ मतदारसंघांत बंडखोरांनी आव्हान दिले आहे.  त्यात सर्वाधिक म्हणजे चार मतदारसंघांत शिवसेनेला शिवसेनेच्याच बंडखोरांनी आव्हान दिले आहे. भाजपच्या उमेदवाराला भाजप बंडखोरीचे आव्हान असलेले दोन मतदारसंघ आहेत. शिवसेनेच्या विरुद्ध तीन ठिकाणी भाजपच्या तर भाजप  विरुद्ध तीन ठिकाणी शिवसेनेच्या बंडखोरांनी आव्हान दिले आहे. एका ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादीचीच बंडखोरी आहे. 
 

पंकजा मुंडे यांचे बीड जिल्ह्यातील भाजपच्या उमेदवारीवर पूर्ण नियंत्रण असल्याचे चित्र
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत गोपीनाथराव मुंडे यांच्या निधनामुळे काहीशा सहानुभूतीच्या लाटेवर स्वार असलेल्या पंकजा मुंडे या निवडणुकीत जिल्ह्यातील भाजपच्या नेतेपदावर स्वार झाल्या आहेत. जिल्ह्यातील कोणत्या आमदाराची उमेदवारी कापायची हे त्यांनी ठरवले आणि कोणाला उमेदवारी द्यायची हेही त्यांनीच ठरवले. केवळ ठरवलेच नाही, तर आपण तसे केले आहे हे स्पष्ट होईल अशी व्यवस्थाही त्यांनी केली. उदाहरणार्थ केजच्या आमदार संगीता ठोंबरे. जिल्ह्यातील अनेक मतदारसंघांत त्यांनी बंडखोरी होणार नाही याची दक्षता घेतली. त्यांच्या सांगण्यावरून बंडखोरांनी माघार घेतली हे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील शिवसेनेचे उमेदवार ज्येष्ठ मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनाही पंकजा यांनी आपल्या सभेत भाषण करावे, असे वाटत असेल तर पंकजा यांनी जिल्ह्याच्या नेतेपदावर पक्की मांड ठोकली आहे, हे वेगळे सांगावे लागत नाही. त्यांच्यासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा पाच वर्षांत दोन वेळा बीड जिल्ह्यात येऊन जातात, पुन्हा प्रचारालाही येतात, पंतप्रधान नरेंद्र मोदीही दुसऱ्यांदा येतात हे उल्लेखनीय आहे. असे पूर्ण नियंत्रण असलेला नेता मराठवाड्यात तरी दुसरा आढळत नाही.
 

X फॅक्टर
> वंचित बहुजन आघाडी आणि एआयएमआयएम या दोन पक्षांची आघाडी झाली नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी युतीला संधी मिळाली आहे. 

> ज्या ज्या ठिकाणी बंडखोरी झाली आहे त्या ठिकाणी युतीतील अधिकृत उमेदवार निवडून येतील की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. 
 

या महत्त्वाच्या मतदारसंघांत बंडखोरी 
मतदारसंघ         बंडखोरी
पाथरी (भाजप)      शिवसेना
औ’बाद (प.)सेना    भाजप
उस्माना.(सेना)       शिवसेना       मतदारसंघ    बंडखोरी
भूम-परंडा (शिवसेना)    शिवसेना  
औसा (भाजप)             भाजप 
अहमदपूर (भाजप)       भाजप

बातम्या आणखी आहेत...