आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Only Girls Born In A Village In Poland; Mayor's Offer Special Prize For Giving Birth To A Child

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पोलंडमधील एका गावात फक्त मुलीच जन्मतात... शेवटी एक मुलगा ९ वर्षांपूर्वी झाला होता, त्यानेही गाव सोडले; महापौरांची ऑफर- मुलास जन्म दिल्यास खास बक्षीस

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वार्सा - पोलंड आणि झेक रिपब्लिकच्या सीमेवरील मिझॅस्के  ऑद्रजेनस्की गावात गेल्या ९ वर्षांत एकही मुलगा जन्माला आला नाही. येथे २०१० मध्ये एका मुलाचा जन्म झाला होता. परंतु त्यानेही कुटुंबासमवेत हे गाव सोडले. आता येथे एकमेव सर्वात लहान मुलगा १२ वर्षांचा आहे. या गावात फक्त मुलीच जन्माला येतात. परंतु मुलगा होणे खूप दुर्मिळ बाब आहे. यामुळे येथील महापौरांनी ज्या घरात मुलगा जन्मेल त्याला बक्षीस देण्याचे जाहीर केले आहे. गावात मुलाचा जन्म न हाेण्याचे कारण कोणालाही माहिती नाही. परंतु येथे स्त्री-पुरुष जननदराचे प्रमाण खूप काळापासून असेच आहे. येथे मुली जास्त आहेत, तर मुले जवळपास जन्मलीच नाहीत. गावात ३०० लोक राहतात. येथे बहुतांश मुली व महिलाच आहेत. महापौर रेजमंड फ्रिशको यांनीसुद्धा नोंदणीकृत जन्म दाखले व ऐतिहासिक दस्तऐवज तपासल्यानंतर येथे मुलाचा जन्म होणे अनोखी घटना समजली जाते. महापौरांच्या घोषणेनंतर वार्साच्या एका विद्यापीठाने  येथे असे का घडते यावर संशोधन सुरू केले आहे. 
 
रेजमंड यांनी सांगितले, येथे मुली तर जन्माला येतातच. परंतु मुलगा होणे खूप दुर्मिळ आहे. गेल्या ९ वर्षांत कोणालाही मुलगा झालेला नाही. मी सर्व जन्माचे दाखले तपासले आहेत. त्यावरूनच हा दावा करत आहे. गावातील वडीलधारी मंडळी सांगतात तेच खरे आहे. हा गुंता सहजासहजी उलगडणारा नाही.  अग्निशमन दलाचे प्रमुख टोमाज गोलाज यांनी सांगितले, माझ्या घरी मुलगा व्हावा, अशी खूप इच्छा आहे. परंतु गावातील इतिहास पाहता, अशी शक्यता खूप कमी वाटते. याचा अर्थ मी मुलगी होण्याच्या विरोधात आहे, असे नव्हे. मला दोन मुली आहेत. माझी पत्नी याच गावातील आहे. कुटुंबात एक मुलगा असेल तर आमचे कुटुंब परिपूर्ण हाेईल. परंतु आमच्या गावात असे होण्याची काही शक्यता दिसून येत नाही. येथील स्थानिक लोकांच्या घरात मुलगा न होणे समजू शकतो. पण मी बाहेरगावाहून येथे आलो आहे. मलाही मुलगा होत नाही, हे अजब वाटते. या गावातच काही तरी गुण आहे यामुळे येथे मुलगा जन्माला येणे अवघड आहे. 
 

वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राध्यापकाचे मत - लिंगभेदाचे प्रमाण विषय खरोखरच चिंतेचा
गावातील महिला व पुरुष अशा लिंगभेदाच्या प्रमाणात असलेल्या फरकाचे वृत्त काही दिवसापूर्वी पोलंडमध्ये व्हायरल झाली. वार्साच्या वैद्यकीय विद्यापीठाचे प्राध्यापक रफाल प्लॉस्की यांनी सांगितले,  जर गावात मुलाचा जन्म होत नसेल तर ही खूप चिंतेची बाब आहे. या गुंत्याची उकल करणे इतके सोपे नाही. यासाठी जुनी दस्ताएेवज तपासावे लागतील. त्याचबरोबर मुलींच्या आई-वडिलांच्या याच्याशी काही संबंध आहे का? ते दूरचे नातेवाइक तर नाहीत? यानंतर पालक व मुलांशी बोलल्यानंतर येथील तेव्हा कुठे या प्रकरणाची काही प्रमाणात उकल होऊ शकेल. हे लोक इतक्या वर्षांपासून येथे राहत आहेत. त्यांनी या आधी या विषयावर काही चर्चा का केली नाही? हाच एक मोठा प्रश्न आम्हाला पडला आहे. महापौर रेजमंड यांनी बंपर ऑफर जाहीर केली असून आपल्या या दाव्यावर ते ठाम आहेत. मात्र, त्यांनी बक्षीस काय असेल? किती मोठे असेल याबद्दल काही सांगितलेले नाही. परंतु आमची भेट खूप आकर्षक असेल असा पुनरुच्चार मात्र त्यांनी केला. आता मुलगा कोणाला होतो ते पाहायचे!