आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र विधानसभेत केवळ सात टक्केच महिला आमदार; 2014 मध्ये 20 जणींनाच संधी; सहा दशकांत आजवर एकही महिला मुख्यमंत्री नाही

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महेश रामदासी/ बिपिन खंडेलवाल  महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून झालेल्या विधानसभेच्या आजवरच्या १३ सार्वत्रिक निवडणुकांमध्ये महिला आमदार निवडून येण्याचे प्रमाण अत्यल्पच असल्याचे दिसते. १९६२ च्या निवडणुकीत १३ आमदार निवडून देणाऱ्या महाराष्ट्रातील २०१४ च्या निवडणुकीपर्यंतची महिला आमदारांची संख्या २० च्या पुढे जाऊ शकलेली नाही. तर नुकत्याच झालेल्या लाेकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून निवडून गेलेल्या ८ महिला खासदारांची संख्या आजवरची सर्वाधिक आहे. लाेकसभा व विधानसभेत महिलांना ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा अनेक वर्षांपासून गाजत आहे. भाजप व काॅंग्रेस या प्रमुख राजकीय पक्षांनी जाहीरनाम्यात याबाबतचे आश्वासन दिले, मात्र ते पाळले नाही. ९ मार्च २०१० राेजी डाॅ. मनमाेहन सिंग सरकारच्या कार्यकाळात राज्यसभेत गाेंधळात मंजूर झालेले हे विधेयक लाेकसभेत मंजुरी मिळण्याच्या प्रतीक्षेत आहे. दाेन टर्मपासून पूर्णपणे बहुमतात असलेले व ट्रीपल तलाक, ३७० कलम यासारखे एेतिहासिक निर्णय घेणारे माेदी सरकारही हे विधेयक मंजूर करण्याचे धाडस दाखवू शकलेले नाहीत. प्रस्तावित ३३ टक्के आरक्षणाचा विचार केल्यास सध्या २८८ जागा असलेल्या महाराष्ट्र विधानसभेत ९५ महिला आमदार असणे अपेक्षित आहे. मात्र सध्या केवळ ७ टक्केच महिलांना हे स्थान मिळालेले आहे. २०१४ च्या निवडणुकीत फक्त २० महिला राज्यात निवडून आलेल्या आहेत, विधानसभेच्या आजवरच्या इतिहासात हा सर्वाधिक आकडा आहे.

देशाला पहिली महिला राष्ट्रपती देणाऱ्या महाराष्ट्रात अद्याप महिला मुख्यमंत्री नाही 
राज्य स्थापनेपासून म्हणजेच सुमारे ६० वर्षात पुराेगामी महाराष्ट्रात एकही महिला मुख्यमंत्री हाेऊ शकल्या नाहीत. प्रेमलाताई चव्हाण, प्रतिभाताई पाटील, प्रभा राव, शालिनीताई पाटील यांच्यापासून ते आता कॅबिनेट मंत्री असलेल्या पंकजा मुंडे, खासदार सुप्रिया सुळे यांचे राज्याच्या राजकारणात महत्त्व असले तरी आतापर्यंत यापैकी एकाही महिलेला हे मानाचे पद मिळू शकलेले नाही.  विशेष म्हणजे प्रतिभाताईंच्या रुपाने देशाला पहिल्या महिला राष्ट्रपती देणाऱ्या महाराष्ट्राला अद्याप महिला मुख्यमंत्री मात्र निवडता आलेला नाही.

आजवर तीनच महिला विराेधी पक्षनेत्या 
महाराष्ट्रात विधानसभेच्या पहिल्या महिला विराेधी पक्षनेत्या हाेण्याचा मान काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या प्रभा राव यांना मिळाला होता. फेब्रुवारी १९७९ ते १३ जुलै १९७९ एवढा अल्पकाळ राव यांना मिळाला. त्यानंतर सलग दुसऱ्यांदा हे पद प्रतिभाताई पाटील यांना मिळाले. १६ जुलै १९८९ ते फेब्रुवारी १९८० पर्यंत त्यांचा कार्यकाळ हाेता. त्यानंतर ८ वर्षांनी ‘पाणीवाली बाई’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या ज्येष्ठ समाजवादी नेत्या मृणाल गाेरे विराेधी पक्षनेत्या बनल्या. २३ डिसेंबर १९८८ ते १९ आॅक्टाेबर १९८९ पर्यंत त्या पदावर हाेत्या. त्यानंतर ३० वर्षांत हे पद एकाही महिलेला मिळालेले नाही.

पंचवार्षिक निवडणुका वगळता या आमदार
१९९६ मध्ये २ महिलांनी निवडणूक लढवली. १९९७ मध्ये निफाडमधून मंदाकिनी कदम विजयी झाल्या. १९९८ मध्ये २ महिलांनी निवडणूक लढवली. कन्नडमधून तेजस्विनी रायभान जाधव विजयी झाल्या. २००० मध्ये चौघींनी निवडणूक लढवली. २००१ मध्ये दौंडमधून रंजना कुल विजयी झाल्या. २००२ मध्ये एकाच महिलेने निवडणूक लढवली होती. २००५ मध्ये दोन, तर २००६ मध्ये तीन महिला उमेदवार होत्या. २०१५ मध्ये तृप्ती सावंत आणि सुमन आर.आर. पाटील यांनी विजय मिळवला. 

आजवर १६ महिला मुख्यमंत्री, सध्या एकमेव ममता
देशातील पहिल्या महिला मुख्यमंत्रिपदाचा मान सुचेता कृपलानी यांच्या नावे आहे. १९६३ ते १९६७ या काळात त्यांनी कारकीर्द गाजवली. त्यानंतर १९७२ मध्ये नंदिनी सत्पथी ओडिशाच्या मुख्यमंत्री झाल्या.

सध्या पंचायत राजमध्ये ५० टक्के आरक्षण
पंचायत राज व्यवस्थेत आरक्षण लागू झाल्यापासून आपली राजकीय सक्षमता सिद्ध करणाऱ्या महिलांना संसद आणि विधिमंडळासारख्या सर्वाेच्च सभागृहांत आरक्षण मिळवण्यासाठी अद्यापही झगडावे लागत आहे. १९९३ मध्ये शरद पवार मुख्यमंत्री असताना पंचायत राज व्यवस्थेत महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळाले होते. २०११ मध्ये पंचायत राजमध्ये महिलांना निम्मे म्हणजे ५० टक्के आरक्षण देण्याची तरतूद करण्यात आली. २०१२ च्या निवडणुकांपासून ते लागू झाले.

लोकसभा : सात दशकांत महाराष्ट्रातून केवळ ६० महिला खासदार, सध्या ८ 
- देशात १७ लोकसभा निवडणुकांत महाराष्ट्राने केवळ साठच महिला खासदार दिले आहेत.
- २०१९ मध्ये महाराष्ट्रातून सर्वाधिक ८ महिला संसदेत पोहोचल्या. १९५२ च्या पहिल्या निवडणुकीत राज्यात तीन महिला खासदार होत्या.
- १४ लोकसभा निवडणुकांत महाराष्ट्रातील महिला खासदारांचा आकडा ४ च्या पुढे सरकला नाही.
- २००४ आणि २०१४ च्या लाेकसभा निवडणुकीत सहा महिला खासदार महाराष्ट्राने दिल्या.