आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीत केवळ पदे मिरवणाऱ्यांना, काम न करणाऱ्यांना यापुढे घरचा रस्ता : जयंत पाटील

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांना एक खुले पत्र लिहून त्याद्वारे भविष्यात पक्षांतर्गत सुधारणा करण्याचे संकेत दिले आहेत. काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना अधिक संधी आणि जबाबदारी सोपवण्याचे संकेत देतानाच काम न करणाऱ्या आणि केवळ पदे मिरवणाऱ्या व्यक्तींना जबाबदारीतून मुक्त करण्याचा थेट इशाराच त्यांनी दिला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फेरबदलाचे अंदाज व्यक्त केले जात आहेत. 


एप्रिल २०१८ मध्ये जयंत पाटील यांची पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाली. नियुक्तीनंतर त्यांनी राज्यातील विविध भागांचे दौरे सुरू केले असून, या दौऱ्यांदरम्यान त्यांनी प्रत्येक जिल्हा व तालुका निरीक्षकांशी भेटून चर्चा केली. तसेच राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सद्य:स्थितीचाही आढावा घेतला. या संपूर्ण प्रक्रियेची माहिती फेसबुकवरील खुल्या पत्राद्वारे कार्यकर्त्यांना दिली अाहे. पक्षाच्या भविष्यातील वाटचालीचा विस्तृत ऊहापोह या पत्रातून करण्यात आला आहे. पक्षाच्या विविध सेल्सनी आधीपेक्षा अधिक सक्रिय राहून काम करण्याच्या सूचना देतानाच निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवण्याचा इशारा दिला आहे. 


पाटील यांनी शिवसेना- भाजप सरकारवरही या पत्राद्वारे टीका केली. 'हे सरकार दलित,आदिवासी आणि अल्पसंख्याक समाजाच्या विकासाकडे संपूर्णपणे दुर्लक्ष करत अाहे. काेरेगाव भीमासारखी प्रकरणे घडवून दोन समाजांना एकमेकांच्या विरोधात उभे करण्याचा प्रयत्न काही मूलतत्त्ववादी विचारांचे लोक करत असून हे प्रयत्न आपण हाणून पाडले पाहिजेत', अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच पक्षाच्या सर्व कार्यकारिणींमध्ये दलित, आदिवासी, अल्पसंख्याक आणि ओबीसी समाजास प्रतिनिधित्व देण्यास आपले प्राधान्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. 


पक्षवाढीसाठी राष्ट्रवादी वापरणार जपानचा 'कायझेन' सिद्धांत 
जपान या देशात 'कायझेन' नावाचा सिद्धांत आहे. कायझेन म्हणजे 'सातत्यपूर्ण सुधारणा' होय. तेच तत्त्व पक्षात राबवून सातत्यपूर्ण सुधारणा करण्यावर पक्षाचा भर असेल, असेही जयंत पाटील यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

 
मजबुतीसाठी अॅपचा वापर 
राष्ट्रवादीची बूथ स्तरावरील रचना मजबूत करण्याला प्राधान्य दिले जाणार असून बूथ स्तरावर काम करणाऱ्यासाठी एक विशेष मोबाइल ॲप तयार करण्यात आले आहे. या ॲपद्वारे पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला थेट पक्ष नेतृत्वापर्यंत संदेश पाठवता येणार असून पक्ष नेतृत्वालाही पक्षाच्या शेवटच्या कार्यकर्त्यापर्यंत कोणताही निरोप थेटपणे पोहोचवता येणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...