आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विरोधकांचा गोंधळ : भ्रष्टाचाराच्या आरोपावर विरोधक सकाळी आक्रमक, मात्र सायंकाळी मवाळ भूमिका

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपावरून बुधवारी सभागृहात झालेल्या रणकंदनाचे पडसाद गुरुवारीही बघायला मिळाले. पटलावरून काढून टाकलेल्या विषयावर चंद्रकांतदादांनी सभागृहात निवेदन केले, पण विरोधकांना चर्चेची परवानगी नाकारण्यात आली. यामुळे विरोधकांनी सभागृहाला डोक्यावर घेतल्याने सलग ६५ मिनिटांसाठी कामकाज तहकूब करण्यात आले. संध्याकाळी मात्र केवळ निवेदन देऊन मुख्यमंत्र्यांनी दोषींवर कारवाईची मागणी करत प्रकरणावर पडदा टाकला. 


सभागृहातील चित्र बघता कालचा गोंधळ बरा होता, असे म्हणण्याची वेळ आली आहे. पुण्यातील इनामी जमीन अाणि सरकारी जमिनीच्या गैरव्यवहाराच्या प्रकरणामुळे बुधवारी सभागृहाचे वातावरण प्रचंड तापले होते. विरोधकांनी ऐनवेळी चर्चेची सूचना दिल्याने विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी ती फेटाळून लावली. यासंबंधीचे कामकाज सभागृहाच्या पटलावरून काढून टाकले. यानंतर राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन चंद्रकांतदादांवर भ्रष्टाचाराने गंभीर आरोप केले, तर चंद्रकांत पाटलांनीही पत्रकार परिषदेत यास प्रत्युत्तर दिले. याप्रकरणी दादांनी सभागृहात निवेदन करत भ्रष्टाचाराचे आरोप फेटाळून लावले. 
 

 

भाषण पटलावरून काढले, मग मंत्र्यांचे निवेदन कशाला?
चंद्रकांतदादांच्या निवेदनावर विरोधकांनी आक्षेप घेतला. जयंत पाटील म्हणाले, मी केलेले भाषण पटलावरून काढून टाकले. मग त्या भाषणावर चंद्रकांतदादांचे निवेदन कसे स्वीकारले? जे इतिवृत्त पटलावरच नाही, त्यावर निवेदन कसे स्वीकारण्यात आले? जर त्यांचे निवेदन स्वीकारले तर माझे भाषणही पटलावर ठेवा, अशी मागणी त्यांनी केली. त्यास अध्यक्षांनी नकार दिला.

 

मुनगंटीवारांच्या मध्यस्थीमुळे विरोधकांकडून जोरदार गोंधळ  
विरोधकांच्या मागणीवर सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “कामकाज पटलावरून काढल्यानंतर जयंत पाटलांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. बाहेरील भाष्यावर मंत्र्यांना नोंद घेता येते. पण विषय पटलावर नसल्याने विरोधकांना बोलता येणार नाही.’ या वक्तव्यावर विरोधकांनी गोंधळ सुरु केला. यामुळे सकाळी सुरुवातीला १५ मिनिटे, मग २० आणि नंतर ३० मिनिटांसाठी कामकाज तहकूब करण्यात आले.

 

एकतर्फी कारवाई, लोकशाहीची गळचेपी : अजित पवार
मग अजित पवार म्हणाले, कामकाजातून काढलेेल्या मुद्द्यावर चंद्रकांत पाटलांचे स्वीकारले, मग आम्हालाही चर्चेला परवानगी द्या. काल नोटिशीसोबत कागदपत्रे न दिल्याचे सांगत चर्चेची परवानगी नाकारली. इतिहासात अशा पद्धतीने कधीच परवानगी नाकारलेली नाही. एकतर्फी कारवाई कशी करता? ही लोकशाहीची गळचेपी असल्याचा आराेप त्यांनी केला.  

 

कागदपत्रे द्या, मग चर्चा : तावडे
संसदीय कामकाज मंत्री विनोद तावडे म्हणाले,  आरोपावर चर्चेपूर्वी लेखी कागदपत्रे देणे बंधनकारक आहे. तुम्ही कागदपत्रे द्या, आम्ही चर्चेस तयार आहोत. यावर थोरात म्हणाले, खडसेंवरील आरोपांवर कागदपत्रे न देता ऐनवेळी कशी चर्चा केली. वडेट्टीवार संतप्त होऊन म्हणाले, सभागृहाची दिशाभूल करू नका. आमच्या अधिकारांवर गदा आणू नका. त्यावर, “त्या वेळी नियम पाळले नाहीत. मग आताही पाळू नयेत का,’ असा प्रतिप्रश्न चंद्रकांत पाटलांनी केला.   
 

 

फक्त निवेदनावर समारोप | संध्याकाळी ४ वाजता जयंत पाटलांनी पुन्हा विषय काढला. पण मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षण निर्णयाची माहिती दिली. नंतर त्यावर अभिनंदाचे ठराव झाले. या वेळी सकाळी आक्रमक असणारे विरोधक शांत होते. अखेरीस जयंत पाटलांना संधी मिळाली. ते म्हणाले, सकाळी भ्रष्टाचारप्रकरणी चंद्रकांतदादांनी केलेल्या निवेदनापेक्षा माझे निवेदन वेगळे आहे. यात महसूल मंत्र्यांचे नाव नाही. या निवेदनातील दोषींवर मुख्यमंत्री कारवाई करतील, असे म्हणत त्यांनी या विषयावर पडदा टाकला.

बातम्या आणखी आहेत...