आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खेकड्यांवर ३०२ नोंदवा, त्यांना मारण्यासाठी हजार कोटींची तरतूद करा! धरणफुटीचे खापर खेकड्यांवर फोडणाऱ्या मंत्री सावंत यांंच्या वक्तव्यानंतर विरोधकांची टीका

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत नौपाडा पोलिस स्टेशनमध्ये जाऊन चक्क खेकड्यांच्या नांग्या बांधून त्यांना आरोपी म्हणून सादर केले. या खेकड्यांना अटक करावी, अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली. - Divya Marathi
ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत नौपाडा पोलिस स्टेशनमध्ये जाऊन चक्क खेकड्यांच्या नांग्या बांधून त्यांना आरोपी म्हणून सादर केले. या खेकड्यांना अटक करावी, अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली.

मुंबई - तिवरे धरणफुटीनंतर सरकार आधीच टीकेचे धनी झाले आहे. त्यात जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्या अचाट वक्तव्याची भर पडली. सोलापुरात गुरुवारी सावंत म्हणाले होते, ही नैसर्गिक आपत्ती होती. खेकड्यांनी भोके पाडल्याने जे भगदाड पडले,  त्यामुळेच तिवरे धरण फुटलेे. विरोधी पक्षाने सरकारवर चांगलेच तोंडसुख घेतले. कोल्हापुरात राष्ट्रवादी युवक काँग्रेसने पोलिस ठाण्यासमोर निदर्शने केली. निदर्शक म्हणाले, मंत्री धरणफुटीसाठी खेकड्यांना जबाबदार ठरवत असतील तर खेकड्यांवर ३०२ चे कलम लावून गुन्हा दाखल करावा.

 

धरण में घुसकर मारेंगे!
तिवरे धरण फोडण्याचा गुन्हा केल्याबद्दल तेथील खेकड्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे सरकारने ठरवल्याचे समजते. ठेकेदार व अभियंत्यांवर फरार खेकडे पकडण्याची जबाबदारी सोपवली आहे. तत्काळ सुनावणी होणार असून तिवरे धरणावरच या खेकड्यांच्या नांग्या तोडण्यात येतील व देहांताची शिक्षा सुनावण्यात येईल. जे अजून फरार राहतील त्यांना धरणात घुसून मारण्याचे आदेश दिले  आहेत. या मोहिमेला “सर्जिकल स्ट्राइक ३' असे नाव देण्यात यावे का? याबाबत वरिष्ठ पातळीवर विचार सुरू असल्याचे समजते. 
- सचिन सावंत, काँग्रेस प्रवक्ते

 

भ्रष्ट माशांसाठी खेकड्यांचा बळी
मंत्री तानाजी सावंत तिवरे धरण फुटल्याबद्दल खेकड्यांना जबाबदार धरत आहेत. त्यांच्या कंत्राटदार आमदाराला पाठीशी घालण्यासाठी हे निर्लज्ज समर्थन आहे. भ्रष्ट मोठे मासे वाचवण्यासाठी खेकड्यांचा बळी दिला जातोय. या दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे. 
- नवाब मलिक, मुख्य प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस

 

फुटीसाठी प्राणी कसे जबाबदार?
कालवा फुटला तर उंदीर जबाबदार, धरण फुटलं तर खेकडे जबाबदार! मग त्यांनी मंत्रिपद तरी का घेतले? भाजप आणि शिवसेनेचे मंत्री स्वतःचे अपयश केव्हा मान्य करणार? लोकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करून जनतेच्या जिवाशी खेळणारे हे नेते सरकारच्या निष्क्रियतेचे खापर प्राण्यांवर फोडताहेत! 
- अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते

 

सर्वच धरणांतील खेकडे मारावेत
सावंत यांचे विधान अत्यंत बालिश आहे. अशा वक्तव्यांच्या माध्यमातून आमदार व उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना वाचवण्याचा त्यांचा प्रयत्न दिसत आहे. आता सरकारने एक काम करावे. राज्याच्या सर्व धरणांतील खेकडे शोधून त्यांना मारावे. यासाठी सरकारने १ हजार कोटींची तरतूद करावी.
- विजय वडेट्टीवार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते

 

त्या खेकड्याचे नाव जाहीर करा
चिपळूणमधील तिवरे धरणफुटी प्रकरणात दोषी आमदार व अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी खेकड्यांना शिक्षा करायची असेल तर जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी त्या खेकड्याचे नाव जाहीर करावे. खेकड्यांवर खापर फोडायचे असेल तर मग सरकारने आधीच का पावले का उचलली नाहीत?
- जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते

 

पुण्यातील कालवाफुटीचे खापर फोडले होते उंदरांवर
पुण्यात गतवर्षी सप्टेंबरमध्ये खडकवासला धरणातून पाणीपुरवठा करणाऱ्या मुठा कालव्याला भगदाड पडून अनेक घरे वाहून गेली होती. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी या घटनेचे खापर उंदीर, घुशी आणि खेकड्यांवर फोडले होते. तेव्हाही त्यांच्यावर बरीच टीका झाली होती.