आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महा'जन' आधाराचा भक्कम किल्ला भेदण्याचे विरोधकांपुढे मोठे आव्हान

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जामनेर (जि. जळगाव) : जळगाव जिल्ह्यातील जामनेर या विधानसभा मतदारसंघावर भाजपची महा'जन' पकड अाहे. विधानसभा निवडणूक ताेंडावर आली असली तरी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याविरुद्ध इतर राजकीय पक्षांच्या हालचाली अद्याप सुस्तच आहेत. शेती वगळता रोजगाराचे साधन नाही. एमआरडीसीची घाेषणा झाली, पण ती विकसित करण्यात सत्ताधाऱ्यांना अपयश आल्याचा मुद्दा विरोधक उपस्थित करत आहेत. महाजनांविराेधात दंड थाेपटण्यासाठी राष्ट्रवादीकडून संजय गरुड, अभिषेक पाटील, काँग्रेसचे शरद पाटील, ज्योत्स्ना विसपुते, शिवसेनेचे दीपक राजपूत, डॉ. मनाेर पाटील इच्छुक आहेत. गेल्या वेळी गिरीश महाजनांना १ लाखाहून अधिक मते मिळाली होती. प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे दिगंबर पाटील यांना ६७ हजार मते होती.

२०१४ च्या विधानसभेनंतरच्या इतर सर्व निवडणुका भाजपने जिंकल्या. भाजपने मतदारसंघातील जातवर्गीय आधार भक्कम केला आहे. लेवा पाटील, कुणबी, माळी, धनगर, गुर्जर अशा जातसमूहाची वीण गुंफून राजकारणावर मजबूत पकड निर्माण केली. मतदारसंघातून अल्प जातसमूह असलेला उमेदवार जिंकत असल्याचे वरकरणी दिसत असले तरी ओबीसी विरुद्ध तत्सम प्राबल्य असलेल्या जातीमधील राजकीय अंतर्कलह जाणवतो.

सलग पाच टर्मच्या आमदारकीमुळे लाभ
गिरीश महाजन जामनेरमध्ये १९९५ पासून सलग पाच टर्म निवडून येत आहेत. १९९५ मधील युती शासनाच्या काळात मंजूर झालेले जलसंधारणचे बरेच प्रकल्प अलीकडच्या काळात साकारले. त्याचा राजकीय लाभ महाजन यांनी निवडणुकांमधून उठवला. २०१४ मध्ये महायुती सत्तेत आली. मंत्रिपद मिळाल्याने विकासासाठी कोट्यवधींचा निधी मंत्री महाजन यांनी खेचून आणला. त्याचा फायदा जामनेर नगर परिषद निवडणुकीत दिसला. सर्वच २५ जागा भाजपने जिंकल्या. महाजनांच्या पत्नी सध्या नगराध्यक्षा अाहेत.

अर्थकारण : वर्षाकाठी कापसाची ३०० कोटींची उलाढाल
७० टक्के लोकांचे रोजगाराचे साधन शेती आहे. कापूस, केळी, बाजरी, मका ही प्रमुख पिके. वर्षाकाठी कापसाचे ३०० कोटी, केळीचे ५ कोटींचे उत्पन्न आहे. तालुक्यात ४ खासगी जिनिंग मिल सुरू आहेत. पूर्वी एका मिलमध्ये किमान तीन हजार जणांना रोजगार मिळत असे. यांत्रिकीकरणाने रोजगार बुडाला.

प्रलंबित प्रश्न
- आैद्योगिक वसाहतीची घोषणा झाली, परंतु अजूनही भूसंपादन प्रक्रियेत अडकली आहे.
- रोजगारनिर्मितीसाठी विशेष प्रयोग, प्रकल्प दोन्ही पक्षांच्या शासनकाळात झालेे नाहीत.
- कृषी मालावर प्रक्रिया करणाऱ्या व्यवसाय, उद्योगांची प्राधान्याने गरज.
- तालुक्यात तीन नद्या तरीही ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यासाठी टँकर लावावे लागतात.

काँग्रेस-राष्ट्रवादीची स्थिती नाजूक
भाजपने 'आयडॉलॉजी' पेक्षा 'आयडियालाॅजी'ला महत्त्व देऊन विरोधकांना कसे काबूत केले याची कथा येथील लोक सांगतात. काँग्रेसवर भ्रष्ट राजकारणाचे आराेप करणाऱ्या भाजपने अाता बाजार समितीपासून सहकार क्षेत्रातील बँक, दूध संघ, शेती संघ, पंचायत समितीवर वर्चस्व प्रस्थापित केले. त्यामुळे सहकाराच्या पारंपरिक माध्यमातून राजकारणावर घट्ट पकड निर्माण करणाऱ्या काँग्रेस व राष्ट्रवादीची अवस्था नाजूक झाली आहे.

जातीय समीकरणे
वंजारी 13%
इतर 20%
अनुसूचित जमाती 12%
अनु. जाती 10%
माळी 8%
धनगर 4%
मराठा 33%

संकटमाेचक म्हणून प्रतिमा
मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय ते फडणवीस सरकारचे 'संकटमाेचक' अशीही गिरीश महाजनांची अाेळख निर्माण झाली अाहे. त्यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील सर्वच निवडणुकांत भाजपने भरघाेस यश मिळवले.
 

बातम्या आणखी आहेत...