आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी विचारणार भाजप-शिवसेनेच्या नेत्यांना जनतेच्या मनातील प्रश्न

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई  - लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांच्या महाआघाडीनेही ऑडिओ, व्हिडिओ तसेच सोशल मीडियाचा प्रभावी वापर करण्याचे नियोजन केले असून त्या आराखड्याची रूपरेषाच महाआघाडीच्या वतीने जारी करण्यात आली आहे. ‘लाज कशी वाटत नाही’ या टॅगलाइनद्वारे महाआघाडीच्या वतीने केंद्र व राज्य सरकारच्या गेल्या पाच वर्षांतल्या अपयशी कारभाराची माहिती जनतेसमोर मांडली जाणार आहे. या प्रचार मोहिमेच्या माध्यमातून जनतेच्या मनातील प्रश्न सरकारला विचारले जाणार असल्याची माहिती काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीच्या पत्रकार परिषदेत मंगळवारी देण्यात आली.   


काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई म्हणाले की, ‘सरकारच्या गेल्या पाच वर्षांतील चुकीच्या धोरणामुळे गरीब, शेतकरी, कष्टकरी, तरुण, विद्यार्थी, छोटे व्यापारी, दलित, अल्पसंख्याक, आदिवासी असे सर्वच समाज घटक अडचणीत आले आहेत. मोदींनी गेल्या लोकसभा निवडणुकीत दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. त्यामुळे या निवडणुकीत मते मागायला येण्याच्या आधी मागच्या निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांचे काय झाले ते अगोदर सांगा? अशी जनतेची भावना आहे. त्याच भावनेला आपण या मोहिमेच्या माध्यमातून वाट करून दिली जाईल.’


बीड नव्हे बिहार :

बीडमध्ये बिहार परिस्थिती होते आहे. तिथल्या पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या होऊनही त्यांना सोडले जात नाही. कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असल्याचे पत्र उमेदवाराने दिले आहे. शिवाय या निवडणुकीत बंदाेबस्तावर स्थानिक पोलिस नको अशी मागणीही आम्ही मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे लेखी पत्र देवून केली असल्याचे नवाब मलिक म्हणाले.


गुजरातमध्ये जाऊन  ढोकळा खाऊन आलेले शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आज ‘दगा नही देना हे’ असे सांगत आहेत. ‘दगा नही देना जमाना खराब है’  हे गाणं वाजवून मुखपत्रात आलेल्या मुलाखतीची खिल्ली नवाब मलिक यांनी उडवली. तसेच भाजप शिवसेनेत रडारडीचा डाव सुरु असून हो दोन्ही पक्ष एकमेकांना दगा देणार हे स्पष्ट आहे. जनतेशी दगाफटका करणाऱ्यांना जनता चांगलाच दणका देणार आहे, असेही नवाब मलिक म्हणाले.

 

आमचा नेता हिट विकेट होणारा नाही, क्लीन बोल्ड करणारा : नवाब मलिक
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले की, ‘देशभरात तीन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. पण वर्ध्याच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांविषयी दोन मिनिटेही बोलले नाहीत. गुजरातचे मुख्यमंत्री असताना शरद पवारांमुळे गुजरातचा विकास झाला हे सांगणारे मोदी आता निवडणुकांच्या तोंडावर शरद पवारांवरच टीका करत आहेत. मात्र,  आमचा नेता हिट विकेट होणारा नाही, तर क्लीन बोल्ड करणारा आहे,’ असा टोला त्यांनी मोदींना लगावला. जनतेच्या मनातील रोष आणि त्यांच्या मनातील प्रश्न विचारण्याची हीच वेळ असून सर्वसामान्यांच्या आवाजाला व्यासपीठ मिळावे म्हणून ही मोहीम राबवण्यात आल्याचे ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...