आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नागपूर : विदर्भातील काँग्रेसचा अतिशय अनुभवी नेता आणि दलित समाजातील प्रमुख चेहरा म्हणूनच काँग्रेसच्या वतीने डॉ. नितीन राऊत यांना उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात संधी मिळाल्याचे मानले जात आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे नागपुरातील भाजपच्या सत्ताकेंद्रांना छेद देण्याची क्षमता असलेला प्रभावी नेता म्हणूनही मंत्रिमंडळाच्या पहिल्या यादीत त्यांची वर्णी लागल्याचे मानले जाते.
२०१४ च्या निवडणुकीत भाजपची सत्ता येण्यामागे विदर्भातील यश महत्त्वाचे ठरले होते. मात्र, यावेळी विदर्भातच भाजपची घौडदौड रोखण्यात काँग्रेसला यश आले. त्यामुळे मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व देण्याच्या दृष्टीने काँग्रेसने विदर्भाचा विचार गांभीर्याने करणे अपेक्षितच होते. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या पूर्वीच्या सत्ताकाळात डॉ. नितीन राऊत हे मंत्री होते. त्यामुळे त्यांच्यापेक्षा मोठा व अनुभवी असा दुसरा चेहरा काँग्रेसकडे नव्हता. विशेष म्हणजे सामाजिक प्रतिनिधित्व राखण्याच्या दृष्टीने दलित चेहरा म्हणूनही काँग्रेसकडे डॉ. नितीन राऊत यांच्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता, असे मानले जाते.
नागपूर हे आजही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या भाजपचे सत्ताकेंद्र मानले जाते. गेली पाच वर्षे मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात नागपूरसह विदर्भात भाजपला माेठ्या प्रमाणावर बळकटी दिली. फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात विदर्भातील मंत्र्यांची संख्याही माेठ्या प्रमाणावर हाेती. त्यामुळे पूर्व व पश्चिम विदर्भात भाजपचे राजकारण बळकट झाले हाेते. मात्र २०१९ च्या निवडणुकीत भाजपचा जनाधार घसरला. अाता अाघाडीच्या माध्यमातून भाजपच्या या सत्ताकेंद्रात छेद देण्याच्या दृष्टीने देखील काँग्रेसपुढे डॉ. राऊत यांचाच पर्याय उपलब्ध होता असले मानले जात आहे.
काँग्रेसचे अतिशय निष्ठावान नेते म्हणूनही डॉ. राऊत यांनी कठीण काळातही आपली अोळख जपली. मागील दीड वर्षात त्यांनी काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाशीही बऱ्यापैकी जवळीक साधली होती. त्यामुळे पक्षाने अनुसूचित जाती आघाडीचे प्रमुख म्हणूनही जबाबदारी दिली होती. लोकसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अपेक्षेप्रमाणे विजयी झाले. मात्र, नागपुरात एकमेव उत्तर नागपूर मतदारसंघात गडकरी यांना आघाडी मिळू शकली नाही. विधानसभा निवडणुकीतही डॉ. राऊत यांनी मोठ्या मताधिक्याने भाजपचा पराभव केला. या साऱ्या बाबींचा एकत्रित परिणाम म्हणूनच काँग्रेसने उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात डॉ. राऊत यांना संधी दिल्याचे मानले जात आहे. भविष्यात विदर्भात काँग्रेसचे संघटन मजबूत होण्याच्या दृष्टीने या निर्णयाचा चांगला फायदा होईल आणि दलित मतदारांमध्ये यातून सकारात्मक संदेश जाईल, असेही काँग्रेसला वाटते आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.