आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महागाई दरात घट झाल्याने रिझर्व्ह बँकेसाठी व्याजदर कपातीची संधी : एसअँडपी 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - व्याज दरावर निर्णय घेण्यासाठी रिझर्व्ह बँकेचे पतधोरण आढावा समितीची (एमपीसी) तीन दिवसीय बैठक मंगळवारपासून सुरू झाली आहे. या द्वैमासिक आढावा बैठकीतील निर्णय रिझर्व्ह बँक गुरुवारी जारी करणार आहे. रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करेल, अशी अनेकांना अपेक्षा आहे. आंतरराष्ट्रीय मानांकन संस्था एसअँडपीच्या मते महागाई दरात झालेली घसरण आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात झालेली घसरण पाहता या बैठकीत रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करू शकते. ही पतधोरण आढावा बैठक चालू आर्थिक वर्षातील सहावी आणि शेवटची द्वैमासिक आढावा बैठक असेल. नवीन गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली ही पहिलीच आढावा बैठक होणार आहे. माजी गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी अचानक राजीनामा दिल्यानंतर डिसेंबर २०१८ मध्ये दास यांनी पदभार स्वीकारला होता. 
एसअँडपी ग्लोबल रेटिंग्सचे अर्थतज्ज्ञ व्ही. राणा यांनी सांगितले की, महागाई दर नियंत्रणात असून उद्दिष्टाच्या नीचांकी पातळीवर आहे. खाद्यान्नाचे विक्रमी उत्पादन आणि कच्च्या तेलाच्या दरात झालेली घसरण यामुळे महागाई दर या पातळीवर पोहोचला आहे. कच्च्या तेलाचे दर ऑक्टोबरमध्ये उच्चांकावर पोहोचल्यानंतर सुमारे २० टक्क्यांनी कमी झाले आहेत. या दोन्ही कारणांमुळे रिझर्व्ह बँकेकडे दर कपात करण्याची संधी आहे. दुसरीकडे महागाई दर पाहता रिझर्व्ह बँक व्याजदरात ०.२५ टक्क्यांची कपात करण्याची शक्यता असल्याचे मत देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयच्या इकोरॅम अहवालात व्यक्त करण्यात आले आहे. रिझर्व्ह बँकेने मागील डिसेंबर महिन्यात पतधोरणाचा आढावा घेताना व्याजदर "जैसे थे' ठेवले होते. मात्र, जर महागाई दरात तेजी येण्याचा धोका वास्तविक स्वरूपात दिसला नाही तर दर कपात केली जाऊ शकते, असेही मत व्यक्त केले होते. खाद्यपदार्थ आणि इंधनाचे दर सतत घसरत असल्याने किरकोळ महागाई दर डिसेंबर २०१८ मध्ये २.१९ टक्क्यांवर आला आहे. हा मागील १८ महिन्यात म्हणजेच दीड वर्षात सर्वात कमी पातळीवर आहे. तर घाऊक महागाई दर देखील डिसेंबरमध्ये ३.८० टक्के होता. ही मागील आठ महिन्यापासून याची सर्वात नीचांकी पातळी आहे. 


सरकारने किरकोळ महागाई दराला २ टक्क्यांच्या कमी-अधिक प्रमाणाच्या शक्यतेसह ४ टक्क्यांच्या जवळपास ठेवण्याची जबाबदारी रिझर्व्ह बँकेकडे सोपवली आहे. रिझर्व्ह बँकेने चालू आर्थिक वर्षाच्या दोन आढाव्यामध्ये व्याजदर ०.२५ टक्के - ०.२५ टक्के वाढवल्यानंतर मागील तीन तिमाहीमध्ये कायम ठेवले होते. कच्च्या तेलाचे दर सध्या ६३ डॉलर प्रति बॅरलच्या जवळपास गेले आहेत. 
 

बातम्या आणखी आहेत...