आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Oppose To CAA NRC; Firing In The Air In The Dhule, Violent Turn In Vidarbha; But Peace In Marathwada

सीएए-एनआरसीला विरोध; धुळ्यात हवेत गोळीबार, विदर्भात हिंसक वळण; मराठवाड्यात शांततेत आंदोलन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 शहरात भारत बंददरम्यान जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. - Divya Marathi
 शहरात भारत बंददरम्यान जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला.

सीएए कायदा व एनआरसीविरोधात बहुजन क्रांती मोर्चाने पुकारलेल्या भारत बंदला विदर्भात गालबोट लागले. धुळ्यात जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्रात संमिश्र प्रतिसादासह बंद शांततेत पार पडला.

विदर्भात अनेक ठिकाणी दगडफेक, रास्ता रोको

अकोला, अमरावती : भारत बंददरम्यान बहुतांश व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद केली नाहीत. नंतर युवकांनी माेठ्या संख्येने धाव घेत ही दुकाने बंद करण्यास भाग पाडले. पातूर व बाळापूरमध्ये दगडफेकीच्या घटनेत सहा जण जखमी झाले. तर शेगाव येथे दगडफेकीत श्याम राठी जखमी झाले.

अमरावती : दुकानांवर दगडफेक

बंददरम्यान शहरातील मुख्य इर्विन चौकात रास्ता रोको करण्यात आले. त्यामुळे येथील वाहतूक सुमारे तीन तास खोळंबली होती. बंददरम्यान काही दुकाने बंद होत असल्याचे बघून त्यांच्यावर दगडफेक करण्यात आल्याच्याही घटना घडल्या.बडनेऱ्यासह शहरातही बंदमुळे शाळांना सुटी देण्यात आली होती. तसेच येथेही आंदोलकांनी रस्त्यावर उतरून वाहतूक रोखली. त्यामुळे अमरावती-अकोला मार्गावरील वाहतूक सकाळी सुमारे १ तास खोळंबली.

यवतमाळ : बाचाबाची, लाठीमार

शहरातील मारवाडी चौकात प्रतिष्ठाने बंद करण्यावरून आंदोलक, व्यापाऱ्यात बाचाबाची झाली. त्यामूळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज करीत आंदोलकांना पांगवले.

धुळ्यात अश्रुधुराचा वापर, अनेक ठिकाणी लाठीमार

धुळे : सीएए, एनआरसी, एनपीआरविरोधात पुकारण्यात आलेल्या भारत बंदला धुळ्यात हिंसक वळण लागले. जमावाने बसच्या काचा फोडल्या, डंपर उलटवले. बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांच्या दोन दुचाकीही जाळल्या. दरम्यान, १०० फुटी महामार्गावर दगडफेक करण्यात आली. पोलिसांनी लाठीमार केला. जमावाला पांगवण्यासाठी हवेत गोळीबार अन् अश्रधुराच्या नळकांड्याही फोडल्या. दरम्यान, भुसावळ वगळता जळगाव जिल्ह्यात बंद शांततेत झाला.

मराठवाडा : भारत बंदला संमिश्र प्रतिसाद

उस्मानाबादेत प्रमुख मार्गावरील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवणेच पसंत केले. दुपारनंतर बहुतांश बाजारपेठ सुरू झाल्याचे दिसून आले. हीच परिस्थिती जिल्ह्यात होती. लातूर शहर आणि जिल्ह्यात बंदला अत्यल्प प्रतिसाद मिळाला. जालना शहर व जिल्ह्यात बहुतांश व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवली होती परभणीत व्यापाऱ्यांनी दुकाने सुरू ठेवण्याच्या घेतलेल्या निर्णयानंतरही कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून दुकाने बंद करण्यास भाग पाडले. हिंगोली, बीड आणि नांदेड जिल्ह्यात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.

संतप्त महिलेने आंदोलकांवर फेकली मिरचीपूड

यवतमाळ शहरातील मारवाडी चौकात एका महिलेचे मिरचीचे दुकान बंद करण्यावरून आंदोलकांनी वाद घातला. त्यावेळी आंदोलकांनी दुकानातील साहित्य फेकण्याचा प्रयत्न केला. तर काही आंदोलकांनी महिलेच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न देखील केला होता. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलेने आंदोलकांवर चक्क मिरची पावडर फेकली.

औरंगाबाद जमावाने फाेडला पाेलिसांचा कॅमेरा

अाैरंगाबाद :; शहरातील मुस्लिमबहुल भागात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मोर्चेकऱ्यांकडून दुकाने बंद करण्याचा प्रयत्न सुरू हाेता. मात्र काही ठिकाणी दुकानदारांनी त्यांना विराेध केला असता अांदाेलक व दुकानदारांत हुज्जत झाली. एका दुकानावर दगडफेक झाली. दिल्ली गेट परिसरात बस अडवत असलेल्या जमावाची बेगमपुरा पोलिस ठाण्याचा कर्मचारी शूटिंग करत हाेता, त्याला मारहाण करून जमावाने कॅमेरा हिसकावून घेत ताेडला व नंतर फेकून दिला. तीन ठिकाणी बसवर दगडफेक झाल्याचे वृत्त अाहे. महाराष्ट्र चेंबर अाॅफ काॅमर्स संघटनेचे पदाधिकारी मात्र रस्त्यावर उतरून बंदमध्ये सहभागी न हाेण्याचे अावाहन व्यापाऱ्यांना करत हाेते.

 

बातम्या आणखी आहेत...