आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विरोधकांनी पराभवाचे सत्य स्वीकारावे, मी पुन्हा येणार : मुख्यमंत्री

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - विरोधी पक्षातील नेत्यांनी ईव्हीएमवर शंका व्यक्त केली आहे. परंतु, अजित पवार यांनी पक्षाच्या कार्यक्रमातच ईव्हीएमला दोष देऊ नका, असे सांगितले होते. २००४, २००९ ला ईव्हीएम होते आणि सुप्रिया सुळे निवडून आल्या आहेत, हे जयंत पाटील यांनी लक्षात घ्यावे आणि जनतेने का नाकारले याचे सत्य स्वीकारावे, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी विधानसभेत दिला. मतदार याद्यांमध्ये होणारा गोंधळ टाळण्यासाठी त्याची आधारबरोबर जोडणी व्हावी, यासाठी निवडणूक आयोगाला पत्र लिहिणार असल्याचेही त्यांनी सांगितले. एवढेच नव्हे तर मी पुन्हा येईन, अशा भावनाही त्यांनी कवितेतून व्यक्त केल्या.


विरोधी पक्षाने अंतिम आठवडा प्रस्तावात विविध मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. चंद्रकांत पाटील, जयकुमार रावल, आशिष शेलार, सुभाष देशमुख, चंद्रशेखर बावनकुळे आदि मंत्र्यांनी त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप पुराव्यासहित खोडून काढले आणि झालेले आरोप कामकाजातून काढून टाकण्याची मागणी केली.


पंकजा मुंडे आजारी असल्याने त्या आरोपांना उत्तर देण्यास सभागृहात न आल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावतीने अंगणवाडी सेविकांना दिलेल्या मोबाईल खरेदीतील आरोप खोडून काढले. त्यानंतर चर्चेला जवळ-जवळ समारोपाचेच स्वरूप असलेले उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, मुख्यमंत्री म्‍हणून काम करताना पाच वर्षांच्या काळात अनेक अडचणी आल्‍या,आव्हाने निर्माण झाली. पण त्‍यापासून पळालो नाही. सर्वांना सोबत घेऊन, प्रामाणिकपणे आणि सकारात्‍मकतेने प्रश्न सोडविण्याचे प्रयत्‍न केले. गेल्‍या १५-२० वर्षांत ज्‍या गोष्‍टी झाल्‍या नाहीत त्‍या करून दाखवल्या आणि महाराष्‍ट्राचे वैभव परत आणण्यात यशस्‍वी ठरलो. आज महाराष्‍ट्र सर्वच आघाडयांवर क्रमांक एकचे राज्य आहे असेही ते म्हणाले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी चंद्रकांत पाटील यांची मुक्तकंठाने प्रशंसा केली.

बातम्या आणखी आहेत...