आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Opposition Within The Party United, Devendra Fell Alone!, Sanjay Awate Editorial

पक्षांतर्गत विरोधक एकवटले, देवेंद्र एकाकी पडले!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बुडत्याचा पाय खोलात कसा जातो, त्याचे उदाहरण फडणवीसांच्या निमित्ताने सध्या राज्यात दिसत आहे

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे सोमवारी ६, जनपथवर होते. शरद पवारांना दिल्लीत जाऊन भेटावे, असे खडसेंना अचानक का वाटले असेल? 
अनेक संदर्भांतूून या घटनाक्रमाकडे पाहता येई
ल. 

‘एकचालकानुवर्ती’ सत्ताधीश खुर्चीवर असताना वलयांकित भासतो, पण पायउतार होताच त्याच्या खऱ्या लोकप्रियतेचा अंदाज येतो. देवेंद्र फडणवीसांचे यापेक्षा वेगळे झालेले नाही. सत्तेत असताना त्यांची प्रतिमा जेवढी ‘लार्जर दॅन लाइफ’ होती, तेवढीच पायउतार झाल्यानंतर केविलवाणी झाली आहे. महाराष्ट्राचा सुसंस्कृत, सर्वशक्तिमान आणि यशस्वी पद्धतीने टर्म पूर्ण करणारा कर्तबगार मुख्यमंत्री असे त्यांचे वर्णन तोवर होत होते, जोवर निवडणुकांची प्रत्यक्ष घोषणा व्हायची होती. त्यांनी राज्यभर जी महाजनादेश यात्रा काढली, त्या ‘इव्हेंट’ने तर त्यांच्या एकमेवाद्वितीय प्रतिमेवर शिक्कामोर्तब झाले. सोबतची शिवसेना फरफटत त्यांच्यासोबत निघाली होती आणि विरोधकांना आवाजही नव्हता. 

देवेंद्रांना बाहुबली मानले जात होते, त्यांचा जयजयकार राज्यभर दुमदुमत होता. तेच देवेंद्र फडणवीस नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी शिवाजी पार्कवर आले, तेव्हा त्यांची थट्टा करण्याची संधी लोक सोडत नव्हते. ज्या शिवसेनेने भाजपसमोर नांगी टाकली, ती शिवसेना आता देवेंद्रांचे एकेक निर्णय बदलत आहे आणि त्यांना थेट आव्हान देत आहे. शिवसेनेसोबत सत्तेत जाण्याचा निर्णय भाजपने घेतला असता, तर त्यांना तेव्हाच सरकार स्थापन करता आले असते. मात्र, तसे न करता देवेंद्रांनी रातोरात शपथविधी उरकला, तोही त्या अजित पवारांसोबत, ज्यांना तुरुंगात टाकण्याची घोषणा त्यांनी केली होती. मतदारांनी देवेंद्रांना जागा दाखवत तुम्ही ‘एकमेव’ नाही आहात, हा संदेश दिला होताच, पण सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे औटघटकेच्या सरकारने त्यांची सुसंस्कृत वगैरे प्रतिमाही अंधारात पुसून गेली. 

बुडत्याचा पाय खोलात कसा जातो, त्याचे उदाहरण देवेंद्र फडणवीसांच्या निमित्ताने सध्या राज्यात दिसत आहे. मित्रपक्ष असलेली शिवसेना आपले धाकटेपण विसरून आता ‘मोठी’ झालेली आहे. दुसरीकडे, भाजपमधील नेते देवेंद्रांच्या विरोधात शड्डू ठोकून उभे राहिले आहेत. मुख्यमंत्री असताना देवेंद्रांनी त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांचे पंख कापण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न एवढा थेट होता, की तो कधीच लपून राहिला नाही. नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेही नागपूरचे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाशी सलगी असणारे. गडकरी हे देवेंद्रांना खूप सीनियर. मात्र, देवेंद्र मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी गडकरी गटाचा प्रभाव संपवून टाकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. त्याचप्रमाणे जे स्पर्धक वाटतात, त्यांचे पत्ते कापायला सुरुवात केली. एकनाथ खडसे हे देवेंद्रांच्या मंत्रिमंडळातील बलदंड मंत्री. विरोधी पक्षनेते असणारे खडसे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार होते. मात्र, खडसेंना देवेंद्रांनी घरी बसवले. गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा यांना जनाधार आहे. ‘मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे,’ असे म्हणणाऱ्या पंकजांना त्यांनी जागा दाखवली. या निवडणुकीत पंकजा पराभूत झाल्या. त्यांचेच बंधू धनंजय मुंडे यांनी पंकजांना धूळ चारली. धनंजय मुंडे हे राष्ट्रवादीचे नेते असले तरी त्यांचे आणि देवेंद्रांचे मधुर संबंध सर्वज्ञात आहेत. 

अजित पवारांसोबत फडणवीसांनी शपथ घेतली, त्याचे सूत्रधार प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यासोबत धनंजय मुंडेही होते. त्यामुळे पंकजा आणखी भडकल्या असाव्यात. येत्या १२ डिसेंबरला गोपीनाथ मुंडेंची जयंती आहे. त्या दिवशी आपण मोठा निर्णय घेणार आहोत, असे पंकजांनी फेसबुकवर जाहीर केले आहे. त्यानंतर पंकजा पक्षात अस्वस्थ असल्याची चर्चा सुरू झाली.

या निवडणुकीत खडसेंना उमेदवारी दिली नाही. त्यांच्या मुलीला मिळाली. पण, त्या पराभूत झाल्या. हे सगळे पराभव पक्षातील लोकांनीच केले, असे खडसे म्हणतात. त्यांचा इशारा थेट देवेंद्र फडणवीसांकडे आहे. मंत्री असणाऱ्या विनोद तावडेंना या वेळी उमेदवारी मिळाली नाही. शिवाय निवडणुकीपूर्वी काही दिवस त्यांच्याकडील महत्त्वाची खाती काढून घेतली गेली. चंद्रशेखर बावनकुळे हे आणखी एक मंत्री. त्यांचीही उमेदवारी कापली. सुभाष देशमुख हे महत्त्वाचे मंत्री. पण, त्यांना सतत अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला. चंद्रकांत पाटील हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष. ते मंत्रीही होते. अमित शहांचे ते विश्वासू. त्यामुळे ते स्पर्धक ठरतील, असे वाटल्याने त्यांनाही पराभूत करण्याचा प्रयत्न होता, असे बोलले जाते. ते निवडून आले, हा भाग वेगळा. पण, मुद्दा असा की, निवडणुकीच्या तोंडावर अनेकांना दुखावण्याचा, पराभूत करण्याचा प्रयत्न फडणवीसांनी केला. शिवसेनेच्या ३२ उमेदवारांना त्यांनी पाडले, असे संजय राऊत म्हणतात. इकडे भाजपमधील अशा स्पर्धकांना अडचणीत आणले. काही झाले तरी आपल्याला पराभवाची भीती नाही आणि एकहाती आपण सरकार आणू, या भ्रमात देवेंद्र फडणवीस होते. विरोधी पक्षातील बड्या नेत्यांना आपल्या पक्षात आणतानाच, आपल्या पक्षातील विरोधकांचा मात्र त्यांनी काटा काढला. 

प्रत्यक्षात भलतेच घडले. त्यामुळे आता हे पक्षांतर्गत विरोधक एकवटत आहेत. त्याला ब्राह्मण आणि बहुजन, ओबीसी असे परिमाणही मिळत आहे. महाराष्ट्र भाजपमधील सगळे तगडे नेते एकवटत आहेत आणि देवेंद्र एकाकी पडत आहेत. देवेंद्रांचा एकहाती कारभार खालसा करावा, असा दबाव निर्माण केला जातो आहे. देवेंद्रांचे मुख्यमंत्रिपद तर गेलेच, पण आता पक्षातही त्यांचा शब्द अंतिम असेल, असे दिसत नाही. महाराष्ट्रात स्थापन झालेले नवे सरकार किती काळ टिकेल, भाजपचे भविष्य काय असेल, ते माहीत नाही. मात्र, देवेंद्र फडणवीसांचे एकाकी होणे आता कोणीही रोखू शकत नाही.