आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेकलेले अन्न खाऊन बालपण गेले; आज जगातील सर्वात शक्तिशाली महिलांपैकी एक

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

> नाव- ओप्रा विन्फ्रे

> व्यवसाय- टॉक शो सादर करते, अभिनेत्री, टीव्ही कार्यक्रम निर्माती  

> एकूण संपत्ती - १७,९०० कोटी रुपये 


यांच्याबाबत यासाठी  हे वाचा- त्यांचा ‘दि ओप्रा विन्फ्रे शो’ त्या काळातील सर्वात लोकप्रिय टीव्ही कार्यक्रम होता. 

 

ओप्रा विन्फ्रे आपला लोकप्रिय टीव्ही शो  ‘द ओपरा विन्फ्रे शो’ साठी ओळखली जाते. हा शो १९८६ ते २०११ इतकी वर्षे चालू असलेला सर्वात लोकप्रिय शो होता. टॉक शो च्या सादरीकरणाशिवाय ती निर्माती, अभिनेत्री आणि समाजसेविकाही आहे.  ‘द प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम’हा अमेरिकेचा सर्वोच्च नागरी सन्मान तिला बहाल करण्यात आला आहे.  


ओप्रा विन्फ्रेचा जन्म २९ जानेवारी १९५४ रोजी अमेरिकेच्या मिसिसिपीमध्ये झाला. तिची अविवाहित आई वर्निता ली हिने तिच्या फार लहान वयात  ओपराला जन्म दिला. सुरुवातीला ओपराचे नाव  ‘बुक ऑफ रूथ’  पुस्तकावरून ‘ओरपा’ ठेवले गेले होते. पुढे त्याचा अपभ्रंश ‘ओपरा’ असा झाला.  तिचे वडील कोण हेही कोणाला माहीत नव्हते. आईने काही महिने तिचे पालन-पोषण केले. पण आर्थिक स्थिती फारच बिघडली. तेव्हा तिने अोपराला आजीच्या घरी सोडले. पण आजीच्या घरीही फार काही चांगली स्थिती नव्हती. ज्या पोत्यांमध्ये बटाटे भरले जात, ती पोती फाडून त्याचे तुकडे अंग झाकण्यासाठी वापरावे लागत आणि गल्ली-बोळात हिंडून लोकांनी फेकून दिलेले अन्न तिला खावे लागत असे.  जेव्हा खायला काहीच मिळत नसे तेव्हा चोऱ्या करण्याची वेळही तिच्यावर आली. पण काही वर्षांनी आजीची प्रकृती बिघडल्याने तिला पुन्हा आईच्या घरी परतावे लागले. 
ओपराची आई दुसऱ्याच्या घरी जाऊन धुणी-भांडीचे काम करत असे. पैसे कमविण्यासाठी ती दिवसभर बाहेर राहत असे. यामुळे ओपरा एकटीच असे.  त्यामुळे लहानपणीच अनेक वेळा तिचे लंैगिक शोषण झाले. पण ही गोष्ट ती कोणाला सांगू शकली नाही. वयाच्या तेराव्या वर्षीच ती मनाने आणि शरीराने उद्ध्वस्त झाली होती. अशा स्थितीत ती घर सोडून पळून गेली.  


तिने जेव्हा घर सोडले तेव्हा ती गर्भवती होती. कमी वय असल्याने तिचा मुलगा वाचला नाही. पण लवकरच तिच्या आईने तिला शोधून काढले आणि घरी आणले. दरम्यान, आईकडे थाेडे पैसे जमा झाले होते. म्हणून तिने ओपराला शाळेत प्रवेश दिला. तेथे श्रीमंत मुलांना पाहून त्यांच्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करत असे. घरातून ती पैसेही चाेरत असे. तिच्या या वागण्याला कंटाळून आईने तिला सावत्र वडिलांकडे पाठवून दिले.  


बस आणि इथूनच तिचे आयुष्य बदलण्यास सुरुवात झाली. कारण तिचे सावत्र पिता स्वभावाने चांगले होते. त्यांनी तिला शाळेत पाठविले आणि शिस्त लावली.  तिला जेव्हा शिक्षणाची संधी मिळाली, तेव्हा तिने सगळ्यांना मागे टाकले. पब्लिक स्पिकिंग आणि नाटक यात तिची बरीच प्रगती होती. तिचे बोलण्याचे कौशल्य आणि आवाज पाहून एका स्थानिक रेडिओ स्टेशनने तिला बातमी वाचण्यासाठी बोलावले. ओपराने टेनेसे स्टेट युनिव्हर्सिटीतून स्कॉलरशिप घेऊन स्पीच कम्युनिकेशनचे शिक्षण घेतले. वयाच्या १७ व्या मिस ब्लॅक नॅशविले आणि मिस टेनेस या दोन सौंदर्यस्पर्धाही तिने जिंकल्या. स्पीच कम्युनिकेशन शिकत असतानाच तिला मॅरीलँडच्या प्रसिद्ध  न्यूज़ टीव्ही चॅनलमध्ये नोकरी लागली. या नोकरीसाठी तिने शिक्षण मध्येच सोडले. काही काळानंतर तिला या  नोकरीतून काढण्यात आले. कारण बातम्या वाचताना ती भावूक होत असे. १९८६ मध्ये ‘द ओपरा विन्फ्रे शो’ ने तिच्या जीवनाला नवे वळण दिले. पहिल्यांदा हा शो महिलांसाठी होता. पण नंतर यात राजकारण, आरोग्य, अध्यात्म आणि वादग्रस्त मुद्देही येऊ लागले. हा शो दाेन दशकांपेक्षा जास्त चालला. २४ सीझनमध्ये ५ हजार भाग झाले.  २०१६ च्या आकडेवारीनुसार  ती सर्वात जास्त पैसे कमविणारी टीव्ही अभिनेत्री आहे. 

 

मिळालेली शिकवण 
> अडचणी  कितीही असल्या तरीही यश मिळवता येतेच. 
> जीवनात स्वत:ला सिद्ध करण्याच्या संधी फार दुर्मीळ असतात, त्या हातातून जाऊ देऊ नका.