आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेळेचा सदुपयोग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मी मुंबईत राहत असताना एकदा औरंगाबादच्या प्राध्यापक काशीकरांच्या भेटीचा योग आला. त्यांच्याशी गप्पा मारीत असताना त्यांनी एक मजेशीर प्रसंग सांगितला. एकदा त्यांचे औरंगाबादला जाहीर भाषण होते. भाषणाच्या ओघात त्यांनी नकळत एक वाक्य उच्चारले. ते म्हणाले, ‘एखाद्याने जर मनापासून ठरवले तर तो कमीत कमी वेळेत देखील जास्तीत जास्त महान काम करू शकतो.’

श्रोत्यांमध्ये एक निवृत्त कर्नल बसले होते. त्यांनी प्राध्यापकांची खिल्ली उडवण्याचे ठरवले. भाषण संपताच कर्नल उभे राहिले आणि त्यांच्या वाक्याचा संदर्भ देऊन म्हणाले, ‘माझ्याकडे दररोज फक्त पाच मिनिटांचा वेळ आहे. ह्या वेळेत मी काय महान काम करू शकतो, ते कृपया सांगा.’ त्यांचा प्रश्न ऐकून प्राध्यापक अवाक् झाले. काय उत्तर द्यावे, हेच त्यांना सुचेना! शेवटी वेळ मारून नेण्यासाठी ते म्हणाले, ‘आपण कार्यक्रम संपल्यावर चर्चा करू.’ कार्यक्रमाची औपचारिकता चालू असतानादेखील प्राध्यापकांना कर्नल साहेबांच्या प्रश्नाचे उत्तर सापडत नव्हते. शेवटी कार्यक्रम संपल्यानंतर प्राध्यापकांनी सहजच कर्नल साहेबांच्या दिनक्रमाविषयी विचारले.

कर्नल साहेबांच्या दिनक्रमातील फक्त ‘पहाटे चार वाजता उठून ते फिरावयास जातात’ हा एक मुद्दा त्यांनी लक्षात ठेवला. त्यांनी त्यांचा फिरावयाचा मार्ग जाणून घेतला आणि ‘मीही उद्या तुमच्याबरोबर येईन’, असे सांगितले. घरी गेल्यावर त्यांनी कर्नल साहेबांच्या फिरावयाच्या रस्त्यावरील पाच दहावी/बारावीच्या विद्यार्थ्यांची नावे शोधून काढली आणि दुस-या दिवशी पहाटे चार वाजता त्यांच्याकडे हजर झाले. फिरता फिरता त्यांनी कर्नल साहेबांना मुलांची घरे दाखवून प्रत्येक मुलाचे दार वाजवून त्याला नावाने हाक मारण्यास सांगितले. एका मुलासाठी एक मिनिट दिल्यास पाच मुलांसाठी केवळ पाच मिनिटे खर्च होतील. कर्नल साहेबांना हे सर्व अजब वाटले तरी त्यांनी ते निष्ठेने केले. आणि काय आश्चर्य ! पाचपैकी तीन विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले.