आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेंद्रिय 'काळा तांदुळ' उत्पादनाचा प्रयोग यशस्वी, राज्यातील पहिलाच प्रयोग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - पारंपरिक पद्धतीची भातशेती (धान) अत्यल्प उत्पादनामुळे तोट्याची ठरत असताना त्यावर उपाय म्हणून राज्यात प्रथमच सेंद्रिय ब्लॅक राइसचे (काळा तांदूळ) उत्पादन घेण्याचा प्रयोग यशस्वी ठरला आहे. नागपूर जिल्ह्यातील ६ तालुक्यांत शेतकऱ्यांचे गट तयार करून ७० एकर क्षेत्रात हा प्रयोग राबवण्यात आला. 

 

कृषी विभागाच्या 'आत्मा' योजनेअंतर्गत राबवण्यात आलेला हा राज्यात पहिलाच प्रयोग असल्याचा दावा होत आहे. या प्रयोगासाठी खास छत्तीसगडमधून बियाणे मागवण्यात आले. दहा बचत गटांना बियाण्यांसह जैविक खते, सेंद्रिय धानासाठी आवश्यक असलेले निंबोळी अर्क अशा सुविधाही दिल्या. या वाणांवर किडींचा प्रादुर्भावही नसल्याचे आढळून आले आहे. ११० दिवसांतच उत्पादन घेणे शक्य असल्याने दुसऱ्या पिकांसाठी जमीन उपलब्ध करून दुबार पीक घेण्याचीही शेतकऱ्यांची सोय झाली असल्याचे लक्षात आले. सध्या पारंपरिक धानापेक्षा जास्त उत्पादन होण्याची खात्री असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून मिळत असल्याचे 'आत्मा' प्रकल्पाच्या संचालक डॉ. नलिनी भोयर यांनी सांगितले. 

 

कमी दिवसांत चांगले उत्पादन : कामठी तालुक्यातील सेलू येथील निसर्गराजा सेंद्रिय शेतमाल उत्पादक स्वयंसहायता गटामार्फत दिनकर ठाकरे व अशोक कोकाटे यांनी प्रत्येकी एका एकरात काळ्या तांदळाची रोवणी केली होती. त्यास कमी कालावधी व खर्चात चांगले उत्पादन आले आहे. बाजारपेठेतील मागणी लक्षात घेऊन मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्याचा संकल्पही बचत गटाच्या शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांच्या या धानाला चांगला भाव मिळावा, यासाठी विक्री व्यवस्था निर्माण करण्यात येत आहे. पारंपरिक भातपिकापासून १२ ते १५ क्विंटल हेक्टरी उत्पादन होते. काळ्या तांदळाचे उत्पादन त्यापेक्षा अधिक होऊ शकते. विशेष म्हणजे त्याला किंमत चांगली मिळणार असल्याने पूर्व विदर्भ व अन्य शेतकऱ्यासाठी काळे तांदूळ वरदान ठरेल, असा विश्वास डॉ. भोयर यांनी व्यक्त केला. 

 

कर्करोगावर गुणकारी गुणधर्म 
काळ्या तांदळात फायबर, आयर्न व कॉपरसारखे मिनरल्स, वनस्पतीयुक्त प्रोटीन आहे. याच्या आवरणात सर्वाधिक प्रमाणात अॅँथोसिनीन अँटिऑक्सिडंटचे गुणधर्म आहेत. त्यामुळे तो कॅन्सरसह विविध आजारांसाठी गुणकारी असल्याचे सिद्ध झाले आहे. काळा तांदुळ आरोग्यवर्धक असल्यामुळे चांगला भाव मिळत आहे. 

 

काय आहे ब्लॅक राइस 
चीनमध्ये राजघराण्यासाठी पूर्वी काळ्या तांदळाचे राइसचे उत्पादन घेतले जायचे. त्याला फॉरबिडन राइस म्हटले जात. वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मामुळे या तांदळाचा युरोप, अमेरिकेपर्यंत प्रसार झाला. 

 

बातम्या आणखी आहेत...