दिव्य मराठी अभियान / पर्यावरण रक्षण, आरोग्यासाठी उस्मानाबादेत भव्य सायकल रॅलीये आयोजन; लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकाऱ्यांसह शेकडो नागरिक होणार सहभागी

  • जिल्हा प्रशासनासह पाेलिस विभाग, विविध संस्था, संघटनांचा पुढाकार; 11 वर्षापूढील विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार
  • उस्मानाबादेत पशूधन विकास अधिकाऱ्यांना विवाहात सायकल भेट, सायकलवरूनच लग्नाला आले अधिकारी

प्रतिनिधी

Feb 14,2020 04:19:00 PM IST

चंद्रसेन देशमुख

उस्मानाबाद- पर्यावरण रक्षण, आरोग्यासाठी दिव्य मराठीच्या वतीने उस्मानाबादमध्ये सायकल अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात आता सबंध उस्मानाबादकरांचा सहभाग वाढला आहे. या अभियानाचा महत्वाचा भाग म्हणून रविवारी (दि.16) सकाळी 6 वाजता जिल्हा क्रीडा संकुलापासून भव्य पर्यावरण सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले असून, या रॅलीमध्ये खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर,जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता कांबळे, आमदार कैलास पाटील, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्यासह जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोलते, पोलिस अधीक्षक राजतिलक रोशन आदी अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

‘दिव्य मराठी’ने पर्यावरण जनजागृतीसाठी उस्मानाबादेत पर्यावरणपूरक मातीचे गणेश मुर्ती, फटाकेमुक्त दिवाळी, नैसर्गिक रंगांसोबत रंगपंचमी, एक झाड, एक जीवन, असे विविध उपक्रम राबविले असून,आता पर्यावरणासाठी सायकल अभियान हाती घेण्यात आले आहे. या अभियानासाठी जिल्हा प्रशासनानेही पुढाकार घेतला आहे.जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनीही सोमवारपासून निवासस्थानापासून कार्यालयापर्यंत सायकलचा वापर सुरू केला आहे. त्यांनी सर्व विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनाही सायकल वापराचे आवाहन केल्याने तसेच दिव्य मराठीच्या माध्यमातून होत असलेल्या जनजागृतीचा भाग म्हणून सायकलीचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदारांसह कर्मचाऱ्यांनी सायकलवरूनच कार्यालयाचा प्रवास सुरू केला आहे. उस्मानाबादचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार यांच्यासह अन्य विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांनी सायकलीचा नित्यपणे वापर सुरू केल्याने त्यांचे अनुकरण उस्मानाबादकर करू लागले आहेत. उस्मानाबादकरांमध्येही जनजागृतीचा सकारात्मक परिणाम दिसू लागला आहे.

विद्यार्थ्यांसह व्यापारी, उद्योजक, राजकीय व्यक्तींकडूनही सायकल वापरली जाऊ लागल्याने समाधान व्यक्त होत आहे. दरम्यान, या अभियानांतर्गत उस्मानाबादेत रविवारी सकाळी ६ वाजता जिल्हा क्रीडा संकुलापासून भव्य पर्यावरण सायकल रॅली काढण्यात येणार असून, या रॅलीमध्ये उस्मानाबादकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींकडून आवाहन करण्यात येत आहे.या सायकल रॅली उपक्रमासाठी जिल्हा प्रशासनासह उस्मानाबाद हाफ मॅरेथॉन,रोटरी क्लब उस्मानाबाद,यशदा मल्टिस्टेट, समर्थ सिटी डेव्हलपर्स, वरद प्लायवुड,पल्स आयसीयु सेंटर,अनंतछाया टेक्सटाईल, जगत फार्मा (बेंगलोर) यांचे सहकार्य लाभत आहे. विविध शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. या रॅलीमध्ये 11 वर्षांपुढील विद्यार्थी सहभाग घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी ‘दिव्य मराठी’चे ब्युरो चीफ चंद्रसेन देशमुख (मो.९८२२५९३९८०) यांच्याशी संपर्क साधावा. तसेच, येथे क्लिक करा

अधिकारी लग्नाला गेले सायकलवरून, भेट दिली सायकल

उस्मानाबादेत शुक्रवारी दुपारी परिमल मंगल कार्यालयात पशूधन िवकास अधिकारी ०० यांचा विवाह होता. या विवाहासाठी सर्व निमंत्रित अधिकारी सायकलवरूनच मंगल कार्यालयात पोहोचले. शिवाय त्यांनी नवरदेव असलेल्या पशूधन विकास अधिकारी डॉ.अभिजीत इंगळे यांना सायकल भेट दिली. या उपक्रमाचा संदेश पोहोचण्यासाठी काही अधिकाऱ्यांनी उपस्थितांना सायकल वापराचे महत्वही सांगितले. यावेळी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.सुनील पसरटे, सहआयुक्त पशुसंवर्धन डॉ.सूर्यवंशी, डॉ.नामदेव आघाव,डॉ. पडिले, डॉ.जाधव यांच्यासह कर्मचारी श्री.तळेकर, श्री.गेहलोत, श्री.कादरी,श्री. बनसोड, श्री.भोसले उपस्थित होते. या सगळ्यांनी सायकल वापरासाठी सुरुवात केली आहे.

X