आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओरिजनली रिजनल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

या सदरातील लेखक हे माझ्यासाठी फक्त एखाद्या भाषेचे प्रतिनिधी नव्हते, तर त्यांच्या साहित्यात ते जगणाऱ्या जगाचे भले मोठे चित्रण होते. वास्तवाचे नि कल्पिताचे मिश्रण त्यांच्या रचिताला अधिक थेट बनवत होते. म्हणूनच या स्थित्यंतराच्या काळात हे साहित्य घटिताला एका सर्जनशील पद्धतीने शब्दबद्ध करणारे, दस्तऐवजीकरणच होते...

 

जनावरांमध्ये देव शोधू पाहणाऱ्यांमधील हिंसक जनावरे रस्त्यावर मोकाट झालीत. ती झुंडीने हत्या करू शकतात. झुंडीनेच बोलणाऱ्याला गप्प करू शकतात. अशा वेळी लिहिलेल्या शब्दाला प्रामाणिक राहण्याचं आव्हान लेखकांसमोर आहेय. नि त्याची जबरी किंमतही त्यांना भोगावी लागतेय.

 

देशीकार लेणे' या सदरातील हा शेवटचा लेख. समारोपाचा. या सदराच्या माध्यमातून मला प्रादेशिक भाषेत लिहिणाऱ्या समकालीन साहित्याचा नि साहित्यिकांचा आढावा घेता आला. त्यांच्या सर्जनाच्या प्रेरणा जाणून घेता आल्या. त्यांच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचा, जे जगणाऱ्या परिवेशातील उलथापालथीचा दाब समजून घेता आला. शेवटी कोणताही लेखक निश्चितच कोणत्या ना कोणत्या ना कोणत्या बंधनातून मधूनच लिहीत असतो. मग त्या त्या प्रदेशात घडणाऱ्या सांस्कृतिक, सामाजिक किंवा राजकीय घटना नि त्यांचे साहित्यात दिसणारे स्वरूप, त्यासोबतच आजमितीला असलेला या साहित्याचा संबंध अशा बऱ्याच गोष्टी या सदरातील बहुतांश लेखक निवडत असताना, मी करत होतो. या सदरातील लेखक हे माझ्यासाठी फक्त एखाद्या भाषेचे प्रतिनिधी नव्हते, तर त्यांच्या साहित्यात ते जगणाऱ्या जगाचे भले मोठे चित्रण होते. वास्तवाचे नि कल्पिताचे मिश्रण त्यांच्या रचिताला अधिक थेट बनवत होते. म्हणूनच या स्थित्यंतराच्या काळात हे साहित्य घटिताला एका सर्जनशील पद्धतीने शब्दबद्ध करणारे, दस्तऐवजीकरणच होते.


या सदराच्या माध्यमातून मला आपल्याकडच्या प्रादेशिक साहित्याच्या संदर्भातील काही गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या. भारतीय प्रादेशिक साहित्य हे जसे, त्याच्या भूसांस्कृतिक परिवेशानुसार जसे ‘कस्टमाइज' आढळून येते आहे, अगदी तसेच त्यात काही समान दुवेसुद्धा आढळून येताहेत. या साहित्याच्या निर्मिती प्रेरणा ही थेट मानवी भावभावनांशी, त्याच्या आशा-अपेक्षांशी जोडलेली आढळत राहिली आहे. हे साहित्य बंडखोरीचा स्वर आळवणारं होतं. इथल्या जुलमी व्यवस्थेला आव्हान देणारं होतं. भेदाभेद नाकारणारं होतं. मानवी मूल्य अधोरेखित करणारं होतं. दुय्यमत्व लादू पाहणारी व्यवस्था नाकारू पाहणारं होतं. आणि म्हणूनच ते त्यांच्या प्रदेशाची वा भाषेची सीमा ओलांडून आपलं वाटावं इतकं महत्वाचं होतं. 


या साहित्यात मला व्यथा वेदनांनी व्याकूळ झालेली माणसं दिसून आली. त्यांचं नाकारलेपण, त्यांच्या स्वप्नांची झालेली वाताहत आढळून आली. आपल्या हाकेच्या अंतरावर अक्षरश: चोळामोळा झालेल्या या लाखमोलाच्या माणसांच्या असाहाय्यतेला अक्षरामरत्व देऊ पाहणारे हे विचारविश्व अनुभवता आले. त्याचा दाह, त्यातील विदारकता समजून घेता आली. हे साहित्य थेट आपल्या आजच्या प्रश्नांनाच भिडत होते. आजच्या काळाचा एक भकास चेहरा या साहित्याने वाचकांसमोर उभा केलेला आहे.


या सदरातील ‘खासी' किंवा ‘हलबी'सारख्या भाषेत  लिहिणाऱ्या लेखकाचा वाचकवर्ग कदाचित मर्यादित असेल. कदाचित त्यांची हजारोंच्या संख्येने प्रती छापल्याही जात नसतील किंवा त्यांना लाखोंच्या संख्येत वाचकवर्गही नसेल. नि तरीही हे साहित्यिक मोठ्या प्रमाणात दखलपात्र आहेत. किंबहुना, त्यांची प्रभावक्षमता ही सेलिब्रिटी लेखकापेक्षा ही कैक पटीने अधिक आहे. व्यवस्थेला त्यांच्या जिवावर उठावे वाटते, किंवा ती त्यांच्यावर बंधने टाकू पाहतेय. कारण हे लोकं बाजाराला आव्हान देताहेत. रीडरशिप नि रॉयल्टीचा दबाव झुगारून त्यांना हवी ती गोष्ट मांडू पाहताहेत. त्यासाठी भोगाव्या लागणाऱ्या साऱ्या परिणामांना ते तयार आहेत. साहित्य हे त्यांच्यासाठी हस्तक्षेप करू देणारं सर्जनशील माध्यम आहे. मला वाटते, हीच वृत्ती कदाचित येणाऱ्या काळात भारतीय प्रादेशिक भाषेत कालातीत कलाकृती घडण्याची अधिक शक्यता निर्माण करते आहे.


यातील बहुतांश लेखक एक भलामोठा वास्तवपट आपल्यासमोर उभे करणारे होते. हे साहित्य वाचकाला अस्वस्थ करणारे होते. आसामधील कर्फ्यूची रात्र असेल किंवा काश्मीरमधील भयांकित जगणे. आदिवासी, शेतकरी किंवा एखाद्या शहरात राबराब राबणारा कामगार असेल. त्यांच्या जगण्यातील दाह नि वेदना हे वाचकांपर्यंत घेऊन येत होते. हे साहित्य कदाचित मध्यमवर्गीय पांढरपेशा लोकांच्या करमणुकीसाठी निश्चितच नाहीये. ते आवाज नसलेल्यांचा आवाज बनू पाहतंय. बेदखल केले जाणाऱ्यांची दखल घेऊ पाहतंय. त्याच्या निर्मितीच्या मुळाशी सोलवटून निघालेला, घाबरलेला नि काही तरी करू पाहणारा एक संवेदनशील माणूस आढळून येतोय. मग या घटनांना प्रतिसाद देण्याच्या प्रक्रियेतूनच या साहित्याची निर्मिती होताना दिसतेय.


या सदरासाठी प्रादेशिक साहित्याचा विचार करत असताना, प्रामुख्याने लक्षात आले की बऱ्याच साहित्याचा नि साहित्यिकांचं अस्सल प्रादेशिक असणं हेच त्यांना अधिकाधिक वैश्विक करत आहे. म्हणजे विवेक शानभाग, के. आर. मीरा किंवा रहमान अब्बास हे कन्नड किंवा मल्याळम किंवा उर्दू साहित्याच्या सीमा ओलांडून आजमितीस राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्वाचे बनलेले लेखक आहेत. जागतिक स्तरावर त्यांच्या साहित्याचा गौरव होतो आहे. थोडक्यात काय तर या जागतिक स्तरावरच्या त्याच्या मान्यतेच्या बहुतांश मुळाशी त्यांच्या साहित्याचं अस्सल देशी असणे किंवा ‘ओरिजनली रिजनल' असणे हेच आहे.


भारतीय प्रादेशिक साहित्य निव्वळ रुपवादाच्या मर्यादा ओलांडून केव्हाच आशयकेंद्री झालेलं आहे. त्यात नैसर्गिक, सामाजिक नि सांस्कृतिक स्तरावर घडणाऱ्या माणूसकेंद्री रचिताचा फार मोठा भाग आहे. हे साहित्य निर्मितीच्या वेगवेगळ्या आयामांसह साहित्याचा मुख्य प्रवाह अधिकाधिक मानवसन्मुखी बनवत आहे. हे जाब विचारू पाहणारे साहित्य परिवेशाच्या वाताहतीला व्यवस्थेला जबादार धरणारे आहे. ते आक्रमक आहे. बंडखोर आहे. पण प्रचारकी नाहीये. ‘पर्सनल इज पॉलिटिक्स' असं ठोकळेबाज न बोलता सर्जनशील पद्धतीने साहित्यातून होणाऱ्या राजकारणाला सौंदर्य प्राप्त करून देत आहे. खरं तर मागील काही दशकात साहित्यातून ‘अस्थेटिसायझेशन ऑफ पॉलिटिक्स' झालेलं प्रामुख्याने दिसून येईल. साहित्याच्या एकंदरीतच निर्मितीसाठीची ही फार मौलिक गोष्ट आहे असे मला वाटते.


आर्थिक उदारीकरणानंतर पावलापावलावर वेगवेगळं जग निर्माण झालंय. विसविशीत नि अधिक स्फोटक. बहुतांश लोकांचं जगणं अधिक कठीण बनत चाललंय. दुबळी किंवा दयनीय माणसं इथल्या एका विशिष्ट वर्गासाठी समृद्धीची साधने बनताहेत. त्यात जातीय, धार्मिक ध्रुवीकरणाचे राजकारण अधिकच भर टाकू पाहतंय. जनावरांमध्ये देव शोधू पाहणाऱ्यांमधील हिंसक जनावरे रस्त्यावर मोकाट झालीत. ती झुंडीने हत्या करू शकतात. झुंडीनेच बोलणाऱ्याला गप्प करू शकतात. या विद्वेषी शक्तींना आपण काहीही करू शकतो, असे वाटत राहणे फारच भयानक आहे. कदाचित आपण माणूस म्हणून अधिक व्हल्नरेबल बनत चाललोय. अशावेळी लिहिलेला शब्दाला प्रामाणिक राहण्याचं आव्हान लेखकांसमोर आहेय. नि त्याची जबरी किंमतही त्यांना भोगावी लागतेय. विवेकाने लिहिणाऱ्या लेखकांना एकाच वेळी अनेक पातळ्यांवर लढावे लागण्याचा हा काळ आहे .


या अशा  स्थित्यंतराच्या काळातच  लेखक मात्र शब्दांवर अधिक विश्वास ठेऊन लिहीत असतो. तो नेटाने आपली लढाई लढत असतो. अंगावर येणाऱ्या प्रश्नांची, समस्यांची उत्तरे कदाचित त्याच्याकडे नसतातही, किंबहुना नसतातच. पण तो अशा वेळी डोळ्यावर कातडी ओढून आंधळा बनू शकत नाही. त्याला बहिरा किंवा मुका बनण्याची मुभा त्याचा अंतरात्मा देत नाही. तो अस्वस्थ असतो. कदाचित ही अस्वस्थताच शाप म्हणून त्याच्या माथ्यावर उतरत असावी. त्यातूनच तो  व्यवस्थेच्या मुळाशी जाऊ पाहतो. तिला आव्हान देऊ पाहतो. नि त्यातूनच निर्माण होणारे साहित्य हे मानवकेंद्री असतं. मानवतेचा विचार करणारं असतं. कोणत्याही काळात जेव्हा आपल्यावर गप्प बसण्याची सक्ती केली जाते. तेव्हा माणूस म्हणून आपण विनाशाच्या उंबरठ्यावर आलेलोच असतो. वर्षानुवर्षांपासून जोपासलेली विविधतेला आव्हान दिले जाते. आम्ही म्हणू तेच अंतिम आणि श्रेष्ठ अशा वल्गना केल्या जातात, तेव्हा वेगवेगळ्या भाषा, प्रदेश संस्कृतीचे वा परंपरेचे प्रतिनिधित्व करणारे नि त्यातल्या मानवी एकजिनसीपणाचा पुरस्कार करणारे हे ‘देशीकार लेणी' हेच त्यांच्यासाठी चपखल उत्तर असते.

लेखकाचा संपर्क - shinde.sushilkumar10@gmail.com

बातम्या आणखी आहेत...