आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उस्मानाबाद-अपवाद उद्घाटन अध्यक्षांच्या उपस्थितीत, समारोपाला अध्यक्षांची अनुपस्थिती प्रथमच

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला १४० हून अधिक वर्षांची परंपरा आहे. सुरुवातीच्या ग्रंथकार संमेलनांपासून ते आजच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन या संज्ञेपर्यंतचा संमेलनांचा इतिहास अध्यक्षीय भाषणाने सुरुवात आणि अध्यक्षीय समारोपाने सांगता, हा संकेत जपणारा होता. त्या परंपरेला उस्मानाबाद येथील साहित्य संमेलनाने अपवाद निर्माण केला. मराठी साहित्य संमेलनाच्या इतिहासात एकच संमेलन अध्यक्षांविना पार पडले, ते महाबळेश्वर येथे डॉ. आनंद यादव यांच्या निमित्ताने आणि यंदा उस्मानाबादेत प्रकृती अस्वास्थ्यामुळे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या अनुपस्थितीत संमेलनाचा समारोप प्रथमच झाला.

उस्मानाबाद येथे ९३ वे मराठी साहित्य संमेलन १० ते १२ जानेवारीदरम्यान पार पडले. फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची या संमेलनाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. १० जानेवारीला फादर दिब्रेटो यांनी अध्यक्षीय भाषण केले खरे, मात्र संमेलनाच्या मंडपातील व्यासपीठावर ते आले तेच व्हीलचेअरवर बसून. सायटिकासदृश व्याधीने त्यांच्या शरीराचा डावा भाग संवेदनाहीन बनला होता. त्यांना वेदनाही होत होत्या. पण त्यांनी ते सहन करत अध्यक्षीय भाषण करून आपल्या विचारांची मांडणी केली. मात्र भाषणादरम्यान त्यांनी स्वत:च त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्याचा उल्लेख करून, वैद्यकीय सल्ल्यावरून मी मुंबईला परतत असल्याचे सांगितले होते. शनिवारी त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात विविध तपासण्या आणि उपचार करण्यात आले. मात्र पुन्हा संमेलनस्थळी येऊन समारोप प्रसंग साजरा करणे त्यांच्या प्रकृतीसाठी योग्य ठरणार नाही, असा सल्ला मिळाल्याने समारोपासाठी अनुपस्थित राहण्याचा निर्णय त्यांना घ्यावा लागला.

अनुपस्थितीचा साइड इफेक्ट असा

साहित्य महामंडळाची बैठक समारोपाच्या आदल्या दिवशी पार पडली. खुल्या अधिवेशनात मांडण्यात येणाऱ्या ठरावांची मान्यता या बैठकीत होते. त्यानुसार विविध ठराव बैठकीत मांडण्यात आले. त्यामध्ये विद्यार्थ्यांवरील हल्ल्याचा निषेध,नागरिकत्व कायदा तसेच सावरकरांविषयीच्या अनुचित उल्लेखांचा विरोध करणारे ठरावही मांडले गेले होते. फादर उपस्थित असते, तर हे ठराव संमत होण्याची शक्यता होती. पण अध्यक्ष अनुपस्थित नसल्याने साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी हे ठराव फेटाळून लावले, अशी चर्चा साहित्य वर्तुळात होती.

मंत्री समोर आणि अधिकारी व्यासपीठावर

साहित्य संमेलनाचे व्यासपीठ साहित्यिकांचे असावे, राजकारणी मंडळींनी हे व्यासपीठ शक्यतो टाळावे, असे म्हटले जाते. अर्थात त्याचे पालन फारसे झालेले नाही. संमेलने जशी खर्चिक होत गेली, तशी राजकीय मंडळींची उपस्थिती वाढत गेली. उस्मानाबादच्या संमेलनात मात्र वेगळे दृश्य दिसले. उद्घाटन समारंभातही मंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक ही मंडळी प्रेक्षकांत बसली होती आणि त्यांचे आदेश शिरोधार्य मानून काम करणारी प्रशासकीय सेवेतील मंडळी व्यासपीठावर होती. त्यामुळे या दृश्याची चर्चाही मंडपात रंगली होती.

ज्ञानपीठप्राप्तांचा सन्मान नाही, पण साहित्य अकादमीप्राप्तांचा सत्कार

साहित्य क्षेत्रात ज्ञानपीठ सन्मान हा सर्वोच्च समजली जातो. आजवर वि. स. खांडेकर, कुसुमाग्रज, विंदा करंदीकर आणि भालचंद्र नेमाडे अशा चार लेखकांना ज्ञानपीठ सन्मान प्राप्त झाला आहे. मात्र साहित्य संमेलन आयोजित करणाऱ्या साहित्य महामंडळाने या ज्ञानपीठप्राप्त साहित्यिकांचा कधी संमेलनात सत्कार केलेला नाही. या पार्श्वभूमीवर साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या सौभाग्यवतींना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार उस्मानाबादच्या संमेलनात करण्यात आला.

कविसंमेलनात कवितांचा पाऊस ...आत्ता मात्र माणसं सारी, विचारानेही फाटलेली

'...एक काळ होता, माणसं होती झपाटलेली

आत्ता मात्र माणसं सारी, विचाराने सुद्धा फाटली…
सगळीकडं इकडं तिकडं, पुतळ्यांचीच झाली गर्दी..!
'महापुरुषांचे पुतळे उभे करून त्यांच्या विचारांकडे जे सोयीस्करपणे डोळेझाक करतात त्यांना खडे बोल सुनावणारी ही कविता सादर केली कवी संदीपान पवार यांनी. सेतू माधवराव पगडी साहित्य मंचावर ज्येष्ठ कविवर्य श्रीकातं देशमुख यांच्या अध्यक्षतेत रंगलेल्या कविसंमेलनात एकाहून एक सरस अन् प्रासंगिक कवितांचा पाऊस पडला.

टिळक आजोबा तुमचा मोबाईल, वेळेच्या लयच बाहेर आहे....

देश स्वतंत्र झाल्यानंतर मात्र काहीच बदल झाला नाही. ब्रिटीशांनीही अत्याचार केले, अन् आताही तेच सुरू असल्याची उत्कट भावना या कवितेतून प्रकट करण्यात आली. सावरकरांना आदर्श माणण्याऐवजी आत्ताचे चालू नेते लालूंना आदर्श मानते. याचे शल्य सांंगणारी ही कविता व्यंकटेश कुलकर्णी यांनी सादर केली. त्याला काव्यरसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. सूत्रसंचालन ऋषिकेश देशमुख यांनी केलं. देविदास पाठक यांनी आभार मानले

यांच्याही कवितांना उत्स्फुर्त दाद 

सदाशिव सूर्यवंशी, विनायक पवार, डि.के शेख यांच्या कवितांना तर वन्स मोर मिळाला. राजेंद्र अत्रे, संकेत म्हात्रे, प्रभा सोनवणे, वसुधा वैद्य ,वैशाली मोहिते, तनुजा ढेरे, दमयंती भोईर, दीपक स्वामी, उज्वल बारंगे, महेश पारकर, अनिल निगुडकर, विलास वैद्य, पुरूषोत्तम सदाफुले, बाबासाहेब सौदागर, वैशाली भागवत आदींनी अतिशय चांगल्या आणि प्रासंगिक रचना सादर केल्या.