उद्धव यांचा इशारा / सत्तेसाठी इतरही पर्याय, तशी वेळ येऊ देऊ नका!

एकत्र लढलो, सत्ताही तशीच असावी

दिव्य मराठी वेब टीम

Oct 27,2019 08:25:47 AM IST

मुंबई : विधानसभा निवडणुकीत भाजपची पीछेहाट झाल्याने शिवसेनेने आक्रमक पवित्रा अवलंबला आहे. सत्तेमध्ये समान वाटा व अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद मिळावे, अशी मागणी शिवसेना आमदारांनी मातोश्री'वर उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या सेनेच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत शनिवारी लावून धरली. खुद्द उद्धव ठाकरेंनी 'सत्ता स्थापनेसाठी सेनेसमोर इतर पर्याय आहेत. मात्र भाजप-शिवसेनेने एकत्र निवडणूक लढवली आहे, सत्तासुद्धा तशीच असावी. इतर पर्याय चोखाळण्याची वेळ आमच्यावर येऊ नये,' असा इशारा दिला. दुसरीकडे, मुंबईत भाजपच्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात भाजपच सर्वात मोठा पक्ष असून शिवसेना-भाजप युती स्थिर सरकार देईल; दिवाळीनंतर सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू होतील, असे सांगितले.


तत्पूर्वी, शिवसेनेच्या बैठकीत मुख्यमंत्रिपद अन् सत्तेत समान वाटा याची लेखी हमी मिळेपर्यंत भाजपशी चर्चा करू नका, असा आग्रह आमदारांनी धरल्याचे प्रताप सरनाईक यांनी सांगितले. उद्धव यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी अमित शहा, देवेंद्र फडणवीस व आपल्यात काय वाटाघाटी झाल्या, याची आमदारांना माहिती दिली. बैठकीत आमदारांनी निर्णयाचे सर्वाधिकार उद्धव यांना बहाल केले.


समान वाट्याची भाजपकडून लेखी हमी घ्या : सेना आमदार


भाजप वचनाला, शब्दाला जागेल अशी आशा : उद्धव...

उद्धव यांनी आमदारांना सांगितले, लोकसभा जागावाटपासाेबतच विधानसभेचे जागावाटप आणि सत्तेतील वाट्याचा करार झाला होता. विधानसभेत शिवसेनेने कमी जागा घेऊन तडजोड केली. भाजपने विनंती केल्यामुळे मला एक पाऊल मागे यावे लागले. भाजप आपल्या वचनाला, शब्दाला जागेल अशी आपण आशा करूया, अन्यथा आपणास इतर पर्याय खुले आहेत, असे उद्धव यांनी ठणकावले.


सोबत आलात तर पाच वर्षे सीएमपद मिळेल : वडेट्टीवार...

जनतेचा कौल हा भाजपला सत्तेतून बाहेर ठेवायला हवे असा आहे. आता वेगळे सत्ता समीकरण बनवण्यासाठी शिवसेनेने पुढे यायला हवे. सेना आमच्याबरोबर आली तर ५ वर्षांचे मुख्यमंत्रिपद मिळेल. पण अडीच वर्षे की ५ वर्षे हा सेनेने निर्णय घ्यायचा आहे, असे सूचक उद्गार मावळते विरोधी पक्षनेते व काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केले.


रावसाहेब दानवे : शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देण्याचे ठरलेले नाही...

शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देण्याबाबत काहीही ठरलेले नाही, असे भाजप नेते अाणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत ते म्हणाले, जी काही चर्चा पक्षाध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात झाली त्यानुसारच महाराष्ट्रात सत्ता स्थापन होईल. दुसरीकडे, भाजपच्या महाराष्ट्र प्रभारी सरोज पांडे यांनीही राज्यात भाजपचाच मुख्यमंत्री होईल, असा दावा केला आहे.


सीएमपदाची पहिली टर्म शिवसेनेची : सत्तार...

सिल्लोडचे शिवसेना आमदार अब्दुल सत्तार म्हणाले, भाजपसोबत गेल्यास अडीच वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री होणारच ही काळ्या दगडावरची रेघ आहे. मुख्यमंत्रिपदाची पहिली अडीच वर्षे सेनेला मिळतील. तसेच निम्मी मंत्रिपदे मिळतील. हा फॉर्म्युला मान्य नसेल तर शिवसेनेसमोर सत्ता स्थापनेचे सगळे पर्याय खुले आहेत. आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हावे. अनुभवाचा मुद्दा आड येत असेल तर उद्धवजींनी हे पद स्वीकारायला हवे, असेही सत्तार म्हणाले.


निवडून आलेल्यांना मंत्री करा...

जनतेतून निवडून आलेल्यांनाच मंत्री करा, अशी मागणी काही आमदारांनी बैठकीत मागणी केली. त्यावर कधी-कधी बिकट परिस्थितीत काही निर्णय घ्यावे लागतात. कोणालाही कमीजास्त जवळ करण्याचा प्रश्न नसतो. यापुढे अन्याय होणार नाही असा शब्द देतो, असे उद्धव म्हणाले.

X
COMMENT