Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | Other state devotees effected due to Maratha movement

मराठा आंदोलनाचा परप्रांतीय साईभक्तांना बसला फटका

प्रतिनिधी | Update - Aug 10, 2018, 07:15 AM IST

सकल मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी गुरुवारी पुकारलेल्या आंदोलनाला शिर्डीत शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. वाहतूक सेवा

 • Other state devotees effected due to Maratha movement

  शिर्डी- सकल मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी गुरुवारी पुकारलेल्या आंदोलनाला शिर्डीत शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. वाहतूक सेवा पूर्णपणे ठप्प होती, तर छोट्या -मोठ्या व्यावसायिकांपासून हॉटेल व लॉजिंग दिवसभर बंद असल्याने महाराष्ट्र तसेच परराज्यातून बुधवारी शिर्डीत आलेल्या भाविकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागला. आजच्या बंदमुळे नेहमी रात्रंदिवस गर्दीने फुलून जाणाऱ्या शिर्डीत शुकशुकाट दिसत होता.


  आंदोलनामुळे एसटी महामंडळाच्या बसेस व खासगी बसेसची वाहतूक पूर्णपणे ठप्प होती. शिर्डी शहरातून जाणाऱ्या नगर- मनमाड मार्गावर दिवसभर एकही वाहन फिरताना दिसत नव्हते. मात्र, साईभक्त निवास ते मंदिर व प्रसादालय या ठिकाणी जाण्यासाठी शहरात साईसंस्थानची बससेवा सुरळीत सुरू होती. राज्य व परराज्यातून शिर्डीत येणारी बससेवा पूर्णपणे ठप्प होती.


  साईबाबांच्या दर्शनासाठी दररोज लाखो भाविक शिर्डीत येतात. साईभक्तांच्या गर्दीने संपूर्ण शिर्डी रात्रंदिवस गर्दीने फुलून गेलेली असते. सरासरी दिवसभरात लाखभर भाविक साईंचे दर्शन घेतात. मात्र, आजच्या पुकारलेल्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर साईमंदिर परिसर व व्हीआयपी काउंटरवर दिवसभर शुकशुकाटच होता. दर गुरुवारी साईभक्तांची संख्या शिर्डीत अधिक असते. आज गुरुवार असूनही दिवसभरात अवघ्या ३० हजार ६०० साईभक्तांना साईदर्शनाचा लाभ घेता आला. बुधवारी रात्री शिर्डीत दाखल झालेल्या साईभक्तांना दर्शनानंतर आज परतीचा मार्ग बंद झाल्याने दिवसभर शिर्डीत थांबावे लागले.


  प्रसादालयामुळे भाविकांना दिलासा
  साई संस्थानची भोजन व्यवस्था नियमित सुरू असल्याने त्याची खाण्यापिण्याची गैरसोय झाली नाही. पण, भाविकांना परतीच्या प्रवासासाठी विमान, बस, लक्झरी बस व रेल्वे प्रवासाचे आरक्षण रद्द करावे लागल्याने अडचणींचा सामना करावा लागला. गुरुवारी दिवसभर अवघ्या ८४९ व्हीआयपी भाविकांनी साईदर्शनाचा लाभ घेतला. इतर वेळी ही संख्या पंचवीस हजारांच्या घरात असते. साई संस्थानच्या प्रसादालयात ३६ हजार भाविकांनी भोजनाचा आस्वाद घेतला.

Trending