आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमचे सिंहासन चहावाल्याने पळवले, काँग्रेसला प्रश्न : मोदी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबिकापूर/ शहडोल -  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी छत्तीसगड राज्यातील अंबिकापूर येथे निवडणूक प्रचारसभा घेतली. या सभेत मोदींनी वेगळीच चुणूक दाखवली. सभेच्या सुरुवातीलाच त्यांनी सरगुजाचे पारंपरिक वाद्य मांदर सुमारे २० सेकंद वाजवले. ते म्हणाले, आमच्या घराण्याची गादी या चहावाल्याने पळवलीच कशी? या एकाच विचाराने काँग्रेस पक्षाची झोप उडाली आहे. मात्र, त्यांनी गांधी परिवारातील कोणाचे नाव घेतले नाही.

 

त्यांनी पहिल्या टप्प्यात झालेल्या मतदानावरून बस्तरवासीयांचे कौतुकही केले.  पहिल्या टप्प्यात १८ जागांवर ७६.२८ टक्के मतदान झाले होते. ते गेल्या निवडणुकीच्या तुलनेत ०.३५ टक्के जास्त आहे. २०१३ मध्ये ७५.९३% मतदान झाले होते.  


मोदी यांनी मध्य प्रदेशातील शहडोल येथे शुक्रवारी सभा घेतली. या सभेत बोलताना ते म्हणाले, “२०२२ पर्यंत हिंदुस्तानातील एकही कुटुंब बेघर राहणार नाही.  प्रत्येक कुटुंबाचे आपले स्वत:चे घर असेल.  मलाही एक-एक पैशाचा हिशेब द्यायचा आहे ना? एकाच कुटुंबातील चार पिढ्यांनी या देशाला काय दिले व एका चहावाल्याने चार वर्षांत काय दिले? हे सर्वांना कळले पाहिजे!’

 
मी पंतप्रधान होण्याचे श्रेय जनतेला:  मोदी म्हणाले, “काँग्रेसला वाटते, पंडित नेहरूंमुळे एक चहावाला पंतप्रधान झाला. मग एक काम करा, पाच वर्षासाठी काँग्रेसने एका कुटुंबाबाहेरच्या  काँग्रेसीला  अध्यक्षपद द्या, मग मीसुद्धा ते मान्य करेन की, नेहरूजींमुळे एक आम काँग्रेसीसुद्धा पक्षाचा अध्यक्ष होऊ शकतो. काही दिवसांपूर्वी शशी थरूर म्हणाले होते, नेहरूच्या धोरणामुळेच चहावाला पंतप्रधान होऊ शकला. यामुळेच काँग्रेस १२५ कोटी जनतेला श्रेय देण्यास तयार नाही. ही त्यांची हुकूमशाही मानसिकता आहे. जर लोकशाहीवर श्रद्धा असेल तर चहावाल्यास पंतप्रधान करण्याचे श्रेय ना मोदीला जाते ना भाजपला. याचे सर्व यश देशातील जनतेला जाते.’ 


काँग्रेस बाबासारखी बोलते  
मोदी म्हणाले, “काँग्रेसची संस्कृती समजून घ्या. बोलायला काय जाते? निवडून तर येणार नाही. तुम्ही टीव्हीवर एका बाबाला पाहिले असेल. ते म्हणत असत, पकोडे खाल्ले का? पकोडे खा, तुमच्यावर कृपा होईल. तुम्ही काय केले? दूध पिले हाेते का? दूध पिणे सुरू करा. कृपा होईल. काँग्रेसची आश्वासने अशीच असतात.’

बातम्या आणखी आहेत...