आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुगल प्ले स्टोअरवर महिला सुरक्षेसाठी 200 पेक्षा जास्त अॅप, केवळ 20%उपयोगी

2 वर्षांपूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : हैदराबादमधील अत्याचाराच्या घटनेनंतर चर्चा झाली की, पीडितेने आधी पोलिसांना फोन करायचा होता की घरी. तेलंगणच्या गृहमंत्र्यांनी सांगितले की, पीडितेने पोलिसांना फोन करायला हवा होता. स्मार्टफोनच्या काळात कोणत्याही व्यक्तीला वेगवेगळे अॅप वापरणे खूप सोपे आहे. महिला सुरक्षेच्या दृष्टीने तयार केलेल्या अॅपबाबत दिव्य मराठीने पडताळणी केली. गुगल प्ले स्टोअरवर महिला सुरक्षेचे २०० पेक्षा जास्त अॅप्लिकेशन्स उपलब्ध आहेत. मात्र, यातील २० टक्के अॅप असे आहेत जे खूप उपयुक्त आहेत. केंद्राच्या इंटेलिजन्ससारख्या अनेक संस्थांना सायबर क्राइमचे प्रशिक्षण दिलेले आणि ओपन सिक्युरिटी अलायन्सचे संस्थापक मुंबईतील दिनेश ओबेरजा यांनी सांगितले की, महिला सुरक्षेशी संबंधित गुगल प्ले स्टोअरवर दोन प्रकारचे अॅप अाहेत. एकात आपत्काळात सरळ पोलिसांना माहिती मिळते. दुसऱ्या प्रकारच्या अॅपमध्ये कुटुंबीयांना माहिती मिळते. आम्ही गुगल प्ले स्टोअरच्या अॅपचे विश्लेषण केले असता सुमारे २० टक्के असे आहेत ज्यात सरळ पोलिसांना सूचना मिळते. जवळपास एवढेच अॅपचे दुसरे फीचर्स महिलांसाठी जास्त उपयुक्त आहेत. महिला सुरक्षेशी संबंधित तीन प्रकारचे अॅप्स गुगल प्ले स्टोअरवर आहेत. पहिल्या अॅपमध्ये मित्रांचा क्रमांक अॅड होतो. आपत्काळात अॅपच्या माध्यमातून त्यांना सूचना मिळते. यातील बहुतांश अॅप खासगी डेव्हलपरचे असतात. दुसऱ्या प्रकारात जीपीएस ट्रॅकरसोबत एसओएस क्रमांक ११२ किंवा १०० आपोआप डायल होतो. यात पीडिता स्थानिक पोलिसांशी संपर्क करते. तिसरे अॅप बनावट असतात. जे फक्त वापरकर्त्याचा डाटा घेतात आणि तो कंपन्यांना विकतात. अशा अॅपची संख्या २० ते ३० टक्क्यांपर्यंत आहे.

विविध राज्यांतील पोलिसांच्या अॅप्सची स्थिती

राजस्थान : एक लाख लोक वापरताहेत अॅप

येथे महिला सुरक्षेसाठी राजकॉप नावाचे अॅप आहे. हे सुमारे एक लाख लोकांनी डाऊनलोड केले आहे. अॅपवर दरमहा सुमारे २०० तक्रारी येतात. यात एसओएस बटण असते. बटण दाबल्यावर लोकेशन आणि संबंधित ठाण्याची माहिती कंट्रोल रूमकडे जाते. कंट्रोल रूममधून केवळ एका मिनिटापेक्षाही कमी वेळेत रिप्लाय कॉल येतो.

महाराष्ट्र : प्रतिसाद अॅपवर १४ हजार तक्रारी, मात्र कोणतेच रेकॉर्ड नाही

महाराष्ट्र पोलिसांचे प्रतिसाद अॅप आहे. मात्र, त्याला केवळ १० हजार लोकांनी डाऊनलोड केले आहे. यावर आतापर्यंत सुमारे १४ हजार तक्रारी आल्या आहेत, त्यातील सुमारे ४५०० तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे. महाराष्ट्र पोलिसातील संगणक विभागाचे उपनिरीक्षक अनिल कोथरुडकर यांनी सांगितले की, या अॅपवर घरातील भांडणाच्याही तक्रारी येतात. आता याचा आम्हाला जास्त प्रचार करायचा आहे. अॅप बनवणारे शशांक देशपांडे यांनी सांगितले की, हे अॅप प्रत्येक पोलिस कर्मचाऱ्याला आपल्या मोबाइलवर डाऊनलोड करणे सक्तीचे आहे. जेव्हा अॅप लाँच झाले तेव्हा ६० हजार पोलिस कर्मचाऱ्यांनी हे अॅप डाऊनलोड केले होते. मात्र, आता ५०० कर्मचाऱ्यांकडेही हे अॅप नाही.

उत्तर प्रदेश : एक डझन अॅप सुरू झाले, सर्व बंद

यूपीत महिलांसंदर्भातील गुन्हे रोखण्यासाठी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर हेल्पलाइन आणि अॅप बनवण्यात आले. मात्र, कोणतेच अॅप यशस्वी झाले नाही. सुमारे डझनपेक्षा जास्त मोबाइल अॅप केवळ चाचणीपर्यंतच सुरू झाले आणि नंतर बंद झाले. महिलांसाठी हेल्पलाइन क्रमांक १०९० कार्यान्वित आहे.

महिला सुरक्षेशी संबंधित उत्पादनांची विक्री पाचपट वाढली

महिलांचे पेपर स्प्रे, स्टन गनसारखी अनेक उत्पादने बनवणारी कंपनी एक्सबूम युटिलिटीच्या बिझनेस डेव्हलपर स्नेहा जैन यांनी सांगितले की,१० महिन्यांपर्यंत दरमहा दोन हजार उत्पादने विकत होतो. मात्र, गेल्या दोन आठवड्यांतच १५ हजार उत्पादने विकली. कोलकातातील मार्क सेफ्टी प्रॉडक्ट्स कंपनीच्या संस्थापक पारुल राउतेला यांनी सांगितले की, दरमहा सरासरी ३०० उत्पादने विकली जातात. मात्र, आता दीड आठवड्यातच ४५० उत्पादने विकली गेली. दिल्लीत बख्शी अॅरोसोल पेपर स्प्रे मॅन्युफॅक्चरचे काम करतात. कंपनीचे सदस्य गुरदीप सिंग यांनी सांगितले की, आधी दरमहा १५ हजार पेपर स्प्रे बाटल्यांची ऑर्डर यायची. मात्र,आता ऑर्डर पाचपट वाढली.

दिल्ली: दोन अॅप सुरू, ६० हजार युजर्स

दिल्लीत महिला सुरक्षेचे दोन अॅप आहेत. हिंमत प्लस आणि तत्पर. हिंमत प्लसमध्ये अडचणीच्या वेळी मोबाइल जोरात हलवून किंवा अॅपमध्ये दिलेले बटण दाबताच पोलिस नियंत्रण कक्षात माहिती मिळते. तत्पर अॅपची सुरुवात उपराज्यपाल अनिल बैजल यांनी केली होती. अॅपच्या माध्यमातून ५० पेक्षा जास्त सुविधांचा लाभ घेतला जाऊ शकताे. दोघांचे ६० हजारांपेक्षा जास्त युजर्स आहेत.

बिहार : महिला सुरक्षेसाठी कोणतेही अॅप नाही

पाटण्यासह बिहारमधील महिला व विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी कोणतेही अॅप नाही. महिला सुरक्षेसाठी वुमेन सेफ्टी अॅप सुरू करण्याचा प्रयत्न पाटणा सेंट्रल रेंजचे तत्कालीन डीआयजी राजेशकुमार यांनी केली. मात्र, झाले नाही. पाटण्यात महिला हेल्पलाइन आहे. त्यावर रोज फोनद्वारे ८ ते १० तक्रारी येतात. तर, दरमहा सुमारे ६० लेखी तक्रारी येतात.

गुजरात : पुराव्यासाठी आवाजही रेकॉर्ड करते

गुजरातमध्ये ग्रेनस नावाचे अॅप सुरू आहे. हे प्रायव्हेट अॅप आहे. मात्र, पोलिसांसोबत त्याचा वापर केला जात आहे. हे अॅप ५० हजारांपेक्षा जास्त वेळा डाऊनलाेड करण्यात आले आहे. नातेवाइकांना मेसेज पाठवण्याबरोबरच हे अॅप संकटकाळात एक क्लिक करताच घटनास्थळापासून ५०० मीटरच्या वर्तुळात इतर ग्रेनस अॅपधारकांना अलर्ट पाठवते.

पंजाब : दोन अॅप ठरले महिलांसाठी वरदान

पंजाब पोलिसांचे दोन अॅप महिला सुरक्षेसाठी वरदान ठरत आहेत. यात शक्ती आणि पीपी सांझ अॅपचा समावेश आहे. शक्ती अॅप सुरू झाले तेव्हापासून १३, ९७२ लाेकांनी ते फोनवर डाऊनलोड केले आहे आणि गरज भासल्यास त्याचा वापर करत आहेत. पोलिसांना अॅपवर वार्षिक २१०३ तक्रारी मिळत आहेत.