आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहशतवादाचा मार्ग सोडून 50 तरुण आले मुख्य प्रवाहात

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर : काश्मीरमधील लष्कराच्या पंधरा‌व्या तुकडीने या वर्षी हाती घेतलेल्या 'आई' मोहिमेला यश मिळाले असून जवळपास ५० काश्मिरी युवक दहशतवादी संघटना सोडून आपापल्या कुटुंबात परतले आहेत आणि आता ते सामान्य जीवन जगत आहेत. लेफ्टनंट जनरल कंवलजितसिंग धिल्लों यांनी वृत्तसंस्थेला ही माहिती दिली.


काश्मीर खोऱ्यात दहशतवादाला तोंड देणे आणि नियंत्रण रेषेवर पाकिस्तानच्या कारवायांना चोख प्रत्युत्तर देण्याची जबाबदारी लष्कराच्या १५ कॉर्प्सकडे आहे. तिला चिनार कॉर्प्स असेही म्हटले जाते. लेफ्टनंट जनरल कंवलजितसिंह धिल्लों हे या चिनार कॉर्प्सचे जनरल ऑफिसर कमांडिंग (जीओसी) आहेत. त्यांच्या निर्देशावरूनच ही मोहीम हाती घेण्यात आली होती.
धिल्लों यांनी सांगितले की, 'चांगले काम करा आणि आईची सेवा करा, नंतर वडिलांची सेवा करा, या शब्दांत कुराणात आईचे महत्त्व विशद करण्यात आले आहे. या संदेशानेच मला या चुकीच्या मार्गाने गेलेल्या युवकांना पुन्हा त्यांच्या कुटुंबात परत घेऊन येण्याचा मार्ग दाखवला. जवळपास ५० युवक दहशतवादी संघटना सोडून देऊन आपापल्या कुटुंबात परतून सामान्य जीवन जगत आहेत. त्यांच्या पालकांनी लष्कराला मेसेज पाठवले आहेत. ही खोऱ्यातील लोकांसाठी 'अमूल्य भेट' आहे, असे त्यात नमूद करण्यात आले आहे. सुरक्षा कारणास्तव या पालकांची नावे गोपनीय ठेवण्यात आली आहेत.


धिल्लों यांनी या मोहिमेची माहिती देताना सांगितले की, एखाद्या चकमकीत स्थानिक दहशतवादी अडकलेला आहे अशी माहिती मिळाल्यावर आम्ही ती चकमक थांबवत होतो आणि त्याच्या आईची माहिती घेऊन त्या दोघांना बोलण्याची परवानगी देत होतो. त्या वेळी या माता आपल्या मुलाला दहशतवादाचा मार्ग सोडून देण्याचे आवाहन करत असत. काही चकमकींचा शेवट माता-पुत्राच्या अशा भेटींनी झाला. तरुण काश्मिरी युवकांचे प्राण वाचवण्याच्या लष्कराच्या प्रयत्नांना असे यश मिळाले आहे. त्याबद्दल आम्हाला समाधान वाटते.


कुटुंबात परतलेल्या युवकांची माहिती उघड करता येणार नाही, असे सांगताना धिल्लों म्हणाले की, सीमेपलीकडे काही गिधाडे बसलेली आहेत. त्यांना या युवकांना लक्ष्य करायचे आहे. आम्ही या युवकांची ओळख लपवण्यात यशस्वी झालो आहोत. त्यापैकी काही जण महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत, तर काही जण रोजगार करून आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाला हातभारही लावत आहेत.

दहशतवादी संघटनेत सहभागी झाल्यावर वर्षातच खात्मा
दहशतवादाला तोंड देण्याच्या लष्कराच्या मोहिमेची माहिती देताना लेफ्टनंट जनरल धिल्लों म्हणाले की, दहशतवादी संघटनांत सहभागी होऊन शस्त्रे हाती घेतलेले ७ टक्के युवक पहिल्या १० दिवसांत, ९ टक्के युवक एक महिन्यात, १७ टक्के युवक तीन महिन्यांत, ३६ टक्के युवक ६ महिन्यांत तर इतर युवक एका वर्षात ठार झाले. एकूणच शस्त्रे हाती घेणाऱ्या युवकांचे आयुष्य एक वर्ष एवढेच असते. आपल्या मुलाच्या शवपेटीला खांदा देणे कोणत्याही वडिलांना आवडणार नाही. त्यामुळेच खोऱ्यातील मातांशी बोलून आम्ही त्यांना आपल्या मुलांना दहशतवाद सोडून परत येण्याचे आवाहन करण्यास सांगितले आणि या मोहिमेला यशही मिळाले.