आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोबाइलचा अतिरेक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोबाइल हे एक अतिशय प्रभावी संपर्क माध्यम आहे आणि आजच्या गतिमान युगात तर ती गरजेची बाब आहे. आपले घर ते नोकरीचे ठिकाण यातील अंतर, मार्केटिंग, सेल्स विभागात काम करणा-या मंडळींची सतत चालू असलेली फिरती अशांसाठी मोबाइल म्हणजे महत्त्वाचा घटक आहे. मात्र आजकाल युवा पिढी याचा उपयोग करमणुकीचे, वेळ घालवण्याचे साधन म्हणून करत असल्याचे दिसते. घरात असताना तर हे कर्णपिशाच सतत कानाशी हितगुज करत असतेच, पण घरातून बाहेर पडले तरी रस्त्यावरून चालताना, रिक्षात, बसमध्ये, बसस्टॉपवर यांचा मोबाइल कानाची मिठी जोडायला तयार नसतो. सध्याच्या काळात तरुणांमध्ये देवभक्ती-अध्यात्मप्रेम वाढीस लागले असून असाच एक अनुभव आला. एक तरुणी मारुतीला प्रदक्षिणा घालत होती. अगदी संकल्पित प्रदक्षिणा पूर्ण होईपर्यंत तिचे संभाषण सुरू होते.

इतकेच नव्हे तर पुजा-याकडून तीर्थप्रसाद घेऊन तिने आपले बोलणे चालू ठेवले होते. ही तरुणी मोबाइलवर बोलत मंदिराबाहेर आली. खांदा आणि मान यांच्यामध्ये मोबाइल ठेवून तिने आपली दुचाकी चालू ठेवली आणि संभाषण सुरू ठेवतच ती मार्गक्रमण करू लागली. एका बाजूस झुकल्यामुळे पुढच्या वळणावर तोल जाऊन ती रस्त्यावर पडली. सुदैवाने मागून किंवा पुढून वाहन येत नसल्यामुळे गंभीर दुर्घटना घडली नाही. रस्त्यावरील लोकांनी तिला आणि तिच्या गाडीला सावरले आणि रस्त्याच्या कडेला आणून उभे केले. दरम्यान, रस्त्यावर पडलेला आणि अजूनही चालू असलेला मोबाइल तिने चपळाईने उचलला आणि ‘मी तुला नंतर फोन करते’, असे सांगून मगच मदत करणा-या मंडळींचे आभार तिने मानले. केवढी ही निष्ठा! तुम्हीच विचार करा मोबाइल हे काम करण्याचे साधन आहे की काम नाही म्हणून वेळ काढण्याचे? मोबाइलचा वापर किती, कसा व कशाकरिता करावा याकडे गांभीर्याने पाहण्याची वेळ आली आहे.