आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिउत्साही नेतृत्वाला लगाम, संयमींना दाद; कायम लढण्याची जिद्द बाळगणारे शरद पवार, संयमी बाळासाहेब थाेरात, प्रकाश आंबेडकर, ओवेसी, राज ठाकरे यांच्या कामगिरीचा लेखाजाेखा...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी व विराेधी पक्षातील प्रमुख नेत्यांची चांगलीच कसाेटी लागली. जिंकण्याच्या आविर्भावात असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सत्तेसाठी तडजाेड करणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, कायम लढण्याची जिद्द बाळगणारे शरद पवार, संयमी बाळासाहेब थाेरात, प्रकाश आंबेडकर, ओवेसी, राज ठाकरे यांच्या कामगिरीचा लेखाजाेखा...

भाजपने सत्ता राखली, पण मतदारांनी जागा दाखवली

भाजप : फडणवीस - एकहाती नेतृत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न फसला 
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात ‘मी पुन्हा येणार’असा दावा करत महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून राज्यभर फिरणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अतिआत्मविश्वासातील हवा मतदारांनी काढून टाकली. युतीत २२० जागा मिळवण्याचा दावा करणाऱ्या भाजप नेत्यांनाही जनतेने ‘आम्हाला गृहीत धरू नका’ असे मतपेटीतून ठणकावून सांगितल्याचे या निवडणुकीत दिसून आले. शिवसेनेशी युतीचा ‘शहा’णपणा लाेकसभेतच दाखवल्यामुळे का हाेईना भाजपचे या निवडणुकीत माेठे नुकसान टळले, असा निष्कर्ष विधानसभा निवडणुकीच्या निकालातून काढता येईल.

5 कारणे 
1 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महाजनादेश यात्रेतून केलेल्या वातावरणनिर्मितीचा लाभ
2 मात्र भाजपत व राज्यात एकहाती नेतृत्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न फसला. 
3 माेदी, अमित शहांच्या सभा हाेऊनही काही भागात अपयश, बंडखाेरांमुळेही फटका
4 माेठ्या प्रमाणावर आयाराम नेत्यांमुळे निष्ठावंतांमधील नाराजीमुळे जागांत घट
5 शिवसेनेच्या नेतृत्वाशी सुसंवाद असला तरी स्थानिक पातळीवरील दुही कायम.

भाजपशी युती करूनही शिवसेनेच्या जागा घटल्या

शिवसेना : ठाकरे - तडजाेडीत लहान भावाची भूमिका, आता ‘दादु’गिरी
२०१४ च्या निवडणुकीत स्वबळावर लढून शिवसेनेने ६३ आमदार निवडून आणत उद्धव ठाकरेंनी आपले नेतृत्व सिद्ध केले हाेते. मात्र, २०१९ मध्ये भाजपशी पुन्हा युती करून शंभरावर जागा मिळवण्याच्या त्यांच्या स्वप्नांना मतदारांनी सुरुंग लावला. भाजपची साथ मिळाल्याने जागा वाढण्याएेवजी शिवसेनेचे संख्याबळ घटले. असे असले तरी भाजपसाेबत त्यांना सत्तेत संधी मिळणार आहेच. मात्र, आता भाजपला शिवसेनेची जास्त गरज असल्याने गेल्या ५ वर्षांत मिळालेल्या दुय्यम वागणूकीचा ‘बदला’ घेण्याचे व सत्तेत स्वत:चे महत्त्व वाढवून घेण्याचे सेनेचे प्रयत्न असतील.

5 कारणे 
1 भाजपशी युतीचा निर्णय, सत्तेत असतानाही विरोधी पक्षाची भूमिका बजावणे पथ्यावर
2 दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना पक्षीय मदत, पीकविम्यासाठी आग्रहाचा लाभ
3 जनआशीर्वाद यात्रेतून आदित्य यांनी, तर सभांमधून उद्धव यांचा प्रचार फायदेशीर
4 अनेक पक्षांतील नेते आेढून घेतले, मात्र सर्वांनाच निवडून आणण्यात अपयश.
5 बंडखाेरांमुळे मुंबईसह अनेक भागात फटका बसल्याने जागांचे प्रमाण घटले.

सक्षम विराेधी पक्षाची पाेकळी भरून काढली

राष्ट्रवादी : पवार - एकहाती नेतृत्व सिद्ध केले;  आघाडीतही थाेरलेपणाची भूमिक
२०१४ च्या निवडणुकीनंतर सक्षम विराेधी पक्षाची महाराष्ट्रात पाेकळी निर्माण झाल्याने सत्ताधारी भाजप- शिवसेनेचा आत्मविश्वास वाढला हाेता. त्यामुळे २०१९ च्या निवडणुकात सहज यश मिळेल, असा दावा सत्ताधारी करत हाेते. त्यातच अनेक दिग्गज नेते भाजप- सेनेत गेल्याने राष्ट्रवादी पक्षात मरगळ आली हाेती. मात्र, या काळात खचून न जाता ७९ वर्षीय पक्षाध्यक्ष शरद पवारांनी एकहाती किल्ला लढवत खऱ्या अर्थाने विराेधी पक्षांची जागा सत्ताधाऱ्यांना दाखवून दिली. त्यामुळे गयाराम नेत्यांनाही चपराक बसली व पक्षाला ऊर्जितावस्था मिळाली.

5 कारणे 
1 २०१४ मध्ये ४१ आमदार हाेते, आता ५५ जागा मिळवून काँग्रेस माेठा पक्ष ठरला.
2 दिग्गज नेते पक्ष साेडून गेले तरी शरद पवार यांनी एकहाती प्रचार यंत्रणा सांभाळली.
3 शेतकरी, बेराेजगारांचे, महिलांचे प्रश्न प्रचारात मांडल्याने लाेकांना अपील झाले.
4 सरकारच्या मागे पूर्णपणे गेलेला मराठा, धनगर समाज आपल्याकडे खेचण्यात यश.
5 आघाडीच्या तिकीट वाटपात सामंजस्य, काँग्रेसशी कुरघाेडीच्या राजकारणाला फाटा.

‘संकटा’चे साेने करण्याची जिद्द ठेवून मिळवले यश

काँग्रेस : थाेरात - नेतृत्वहीन पक्ष असूनही पारंपरिक मतदारांनी वाचवले
लाेकसभा निवडणुकीत राज्यात अवघी एक जागा मिळाल्याने गलितगात्र झालेल्या काँग्रेस पक्षाला विधानसभा निवडणुकीतूनही फार आशा नव्हत्या. त्याच अशाेक चव्हाण यांच्या जागी प्रदेशाध्यक्षपदाची धुरा बाळासाहेब थाेरात या ‘शांत’ नेत्याच्या हाती आल्याने कार्यकर्त्यांचेही अवसान गळाले हाेते. मात्र, सत्ताधाऱ्यांनी काँग्रेसच्या दिग्गजांना आपापल्याच मतदारसंघात अडकून ठेवल्याच्या संकटाला संधी समजून पक्षाच्या धुरिणांनी आपले बालेकिल्ले मजबूत केले. त्यामुळेच पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यात जागा वाढवणे काँग्रेसला शक्य झाले.

5 कारणे 
1 २०१४ मध्ये पूर्ण ताकद लावूनही ४२ जागा, आता सक्षम नेतृत्व नसतानाही ४४ जागा. 
2 बाळासाहेब थाेरात यांचे प्रदेशाध्यक्ष म्हणून नेतृत्व सिद्ध. अंतर्गत वादाकडे संयमी दुर्लक्ष
3 राहुल गांधींच्या माेजक्या सभा, साेनियांची पाठ, तरीही अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी.
4 पक्षांतर वाढल्याने कार्यकर्ते गलितगात्र, मात्र राष्ट्रवादीशी मैत्रीचा फायदा उचलला.
5 दलित- मुस्लिम मते खेचण्यात अपयश, मात्र पवारांना माेठेपणा दिल्याचा फायदा.

मनसे : एकहाती नेतृत्वाच्या पदरी एकच जागा
लाेकसभा निवडणुकीला पाठ दाखवणाऱ्या राज ठाकरेंची मनसे विधानसभा लढवण्याबाबत द्विधा मन:स्थितीत हाेती. एेनवेळी मैदानात उतरल्यामुळे तयारी फारशी नव्हतीच. एकट‌्या राज ठाकरेंनी प्रचाराचे मैदान गाजवले, मात्र या वेळी सक्षम विराेधी पक्षाची सत्ता देण्याची मागणी केली. मतदारांनी मात्र त्यासाठी पात्र समजले नाही. लाेकसभेला ज्यांचा अप्रत्यक्ष प्रचार केला त्यांनाच स्पर्धक बनू पाहून वारंवार भूमिका बदलणाऱ्या राजना मतदारांनी केवळ एकच जागा दिली.

वंचित : नव्या प्रयाेगात पुन्हा ‘अपयशी’
प्रत्येक निवडणुकीत वेगळा, पण अपयशी प्रयाेग करणाऱ्या अॅड. प्रकाश आंबेडकरांची वंचित आघाडी विधानसभेतही फारसा प्रभाव टाकू शकली नाही. राज्यभरात नुसतीच चर्चा झाली, मात्र एकही जागा निवडून आणणे या आघाडीला शक्य झाले नाही. अॅड. आंबेडकर यांच्या एककल्ली कारभारामुळे अनेक नेते पक्ष साेडून गेले, एमआयएमशीही युती तुटली. त्याचा फटका बसला.दलित, मुस्लिम बौद्ध मतांवर या वेळी ‘वंचित’ची मात्रा चालली नाही.

एमआयएण : ओवेसींचे प्रयत्न अपयशी
लाेकसभेला आैरंगाबादेत एक खासदार निवडून आणल्यामुळे विधानसभेला एमआयएमचीही चांगलीच चर्चा राहिली. २०१४ मध्ये या पक्षाचे दाेन आमदार हाेते, ती संख्या वेळी कायम राखली, मात्र मतदारसंघ बदलले. आैरंगाबादेत पक्षाध्यक्ष आेवेसींनी तीन दिवस मुक्काम ठाेकला, प्रदेशाध्यक्षपद स्थानिक असूनही या जिल्ह्यात एकही जागा मिळू शकली नाही. वंचितसाेबत आघाडी नसल्याने या पक्षाला दलित मतांचा या वेळी लाभ मिळू शकला नाही.

बातम्या आणखी आहेत...