आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यंगावर मात करत अध्यापनातून घडवले १७ डॉक्टर, २५ इंजिनिअर, शंभरावर शिक्षक

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आशिष गारकर 

परतूर - चांगले शिक्षण घेऊन नोकरी नाही, काही रोजगाराचे साधन नाही अशा चिंतेत असलेले अनेक तरुण-तरुणी आज नैराश्याच्या गर्तेत सापडलेले आपल्या आजूबाजूला पाहायला मिळतात. सर्वांची ओरड असते, आमच्या शिक्षणाच्या तुलनेत आम्हाला रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नाहीत. सरतेशेवटी अनेक तरुण जीवनाचा शेवट करण्याइतपत टोकाचा निर्णय घेतात. मात्र निसर्गाने दिव्यांगत्व दिलेले लिंबाजी आढेसारखे काही धेयवेडे लोक समोर आलेल्या संकटावर हिमतीने मात तर करतातच शिवाय आपल्या कार्यातून इतरांसमोर एक नवा आदर्श निर्माण करतात. तेव्हा त्यांच्या आत्मविश्वासाला आणि चिकाटीला सलाम करावा वाटतो. दोन्ही पायांनी दिव्यांग असणारे परतूर येथील शिक्षक लिंबाजी आढे यांनीही कडवा संघर्ष करुन अध्यापनातून १७ डॉक्टर, २५ इंजिनिअर, १०० पेक्षा जास्त शिक्षक घडविले आहेत. 

घरची आर्थिक परिस्थिती जेमतेम, आठ भावंडे, यात भर म्हणून की काय दोन्ही पायांना आलेले दिव्यांगत्व अशा परिस्थितीत दिव्यांग मुलाचा भार कोण उचलणार हा प्रश्न होता. जन्मापासून चार-पाच वर्षांपर्यंत आई-वडिलांनी सांभाळ केला. घरात आणखी परवड नको म्हणून आईने शिक्षणासाठी मामाकडे पाठविले. दहावीपर्यंतचे शिक्षण मामांकडेच पूर्ण केले. ११ वीला परतूरच्या लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात प्रवेश घेतला. ११ वी पासूनच शिकवणी घेण्यास सुरुवात केली. भाड्याने घेतलेली रूम आणि महाविद्यालय या शिवाय कुठेच जायला वाव नव्हता. जायची इच्छा जरी झाली तरी नाविलाज होता. हळूहळू शिकवणीसाठी विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागली. एक वेळ अशी आली, शिकवणी वर्गासाठी जागा कमी पडू लागली. १९९३ पासून सुरु केलेला हा शिकवणी प्रपंच अाजतागायत चालू आहे. आतापर्यंत त्यांच्या विद्यार्थ्यांपैकी १७ जण वैद्यकीय शिक्षण घेऊन रुग्णसेवेचे कार्य करत आहेत. यातील बहुतांश जण एमडी आहेत. २५ पेक्षा जास्त जण आयआयटीसारख्या नामवंत संस्थांमधून इंजिनिअर झाले असून विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांत कार्यरत आहेत. शंभरच्या वर विद्यार्थी शिक्षक असून ज्ञानदानाचे कार्य करत आहेत. अनेक जण राजकारण, कला क्रीडा तर काही जण व्यापारात आघाडीवर आहेत. माझे हे विद्यार्थी जिथे कुठे मला भेटतात, कधी आवर्जुन भेटायला येतात तेव्हा त्यांच्या मनात आपल्याबद्दल असलेला आदर अनुभवण्यास मिळतो. अशा वेळी आपण जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असल्याची भावना निर्माण होते, असे ते सांगतात. आज घडीला पंचवीस विद्यार्थी त्यांच्या घरी राहून शिक्षण घेतात. त्यांच्या शिकवणी पासून खाण्या-पिण्याची, राहण्याची व्यवस्था ते नाममात्र दरात करतात. स्वतः दिव्यांग असताना, आपल्या आई-वडिलांचा सांभाळ आढे गुरुजी स्वतः करतात. त्यांच्या दोन मुली उच्च शिक्षण घेत असून त्यांना उच्च पदावर पोहोचविण्याचे त्यांचे ध्येय आहे. शरीराने दिव्यांग, मनाने, विचारांनी सक्षम


आपल्यामध्ये असलेल्या या ऊर्जेमागे नेमकी प्रेरणा कोणाची, कोणत्या जोरावर तुम्ही हा सगळा भार पेलता, असा प्रश्न जेव्हा आढे गुरुजींना विचारला असता त्यांनी “मी शरीराने दिव्यांग असलो तरी मनाने आणि विचारांनी सक्षम आहे. शरीराच्या व्यंगावर मनाच्या आणि विचारांच्या कणखरपणाने मात करता येते, असे लिंबाजी आढे यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले.
 

बातम्या आणखी आहेत...