आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंधार फार झाला... झाडे जपून ठेवा! ‘आरे’मधील १८०० झाडांची रातोरात कत्तल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- आरे येथील मेट्रो कारशेडच्या कामासाठी वृक्ष तोडण्याच्या निर्णयाविरोधात दाखल याचिका उच्च न्यायालयाने शुक्रवारी रद्दबातल करत हे वृक्ष तोडण्याचा  मार्ग मोकळा केला. त्यानंतर लगेच रात्रीतून आरेतील वृक्ष कापण्यास सुरुवात झाली. यानंतर आरेत शुक्रवारी रात्री सुरू झालेली वृक्षतोड थांबवावी, अशी मागणी पर्यावरणवाद्यांनी उच्च न्यायालयात एका याचिकेद्वारे केली. मात्र शनिवारी विशेष न्यायालयाच्या खंडपीठाने वृक्षतोड तातडीने थांबवणे आता शक्य नाही, असे स्पष्टीकरण देत आदेशाला स्थगिती देण्यास नकार दिला. तसेच यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचे निर्देशही खंडपीठाने दिले.दरम्यान, वृक्षतोडीची माहिती मिळताच शेकडो पर्यावरणप्रेमी नागरिक आरे कॉलनीत जमा झाले. त्यांनी वृक्षतोडीस विरोध केला, परंतु कामात अडथळा येऊ नये म्हणून पोलिसांनी लगेच जमावबंदी लागू केली व वृक्ष कापण्याचे काम सुरू केले. शनिवार संध्याकाळपर्यंत १८०० च्या आसपास झाडे कापली गेल्याची माहिती अाहे. विरोधात अांदोलन करणाऱ्या २९ जणांना पोलिसांनी अटक केली.  या वृक्षतोडीविरोधात अनेक कलाकार पुढे आले अाहेत.

प्रशासन म्हणते...

मुंबई मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी टि‌्वटरवर सांगितले, ‘कोर्टाच्या परवानगीनंतर झाडे तोडण्यासाठी १५ दिवसांची नोटीस द्यावी लागते, अशी चुकीची माहिती पसरवली जात आहे. याला काहीही कायदेशीर आधार नाही. वन प्राधिकरणाने वृक्षतोडीची परवानगी १३ सप्टेंबरला दिली होती. २८ सप्टेंबरला १५ दिवसांची मुदत पूर्ण झाली, पण हायकोर्टाचा निकाल येईपर्यंत कारवाई थांबवण्यात आली होती.’

शिवसेनेचे “आरे’ला “कारे’

आदित्य ठाकरे यांनी झाडांची कत्तल करणाऱ्यांना “पीओके’मध्ये पाठवा, असे ट्विट केले, तर झाडांची हत्या करणाऱ्यांना सत्ता आल्यानंतर बघू, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली. आरेसाठी रस्त्यावर उतरलेल्या माजी महापौर शुभा राऊळ, प्रियंका चतुर्वेदी  यांनी “आरे बचाव’चा मुद्दा तापवायला सुरुवात केली आहे. संजय राऊत यांनीही ट्विट्वरवर एक फोटो शेअर करत मुख्यमंत्री या फोटोत न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी बांधत असल्याचे दाखवले असून त्यावर आरे हे जंगल नाही, असे नमूद केले होते. दरम्यान, अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, सुमीत राघवन, सुनील शेट्टी आदींनी मेट्रोच्या आरेमधील कारशेडला पाठिंबा दिला आहे.काय आहे प्रकरण?

मेट्रो तीन प्रकल्पांसाठी आरेमध्ये कारशेड उभारण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला होता. यासाठी २७०० च्या आसपास वृक्ष तोडावे लागणार आहेत. मुंबई वृक्ष प्राधिकरणानेही याची परवानगी दिली होती. शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई मनपानेही झाडे तोडण्यास परवानगी दिली होती. त्यामुळे शिवसेनेवर टीका झाल्यानंतर आदित्य व उद्धव ठाकरे यांनी वृक्ष तोडू देणार नाही, असे म्हटले होते. तसेच सामाजिक कार्यकर्ते झोरू भथेना आणि पर्यावरणप्रेमींनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. ... आता जंगलासाठी मगरीचे अश्रू बंद करा 


‘ज्या मुंबईकरांनी शिवसेना आणि भाजपला मत देण्याचा निर्णय घेतला आहे त्यांनी आरेसाठी मगरीचे अश्रू ढाळणे बंद करावे, अशी नम्र विनंती आहे. आरेतील वृक्षतोडीला विरोध करणारे ट्विट करणे तसेच आंदोलन करत असल्याचे नाटक करणे बंद करा. जे बोलता ते करून दाखवा,’ असे टि‌्वट काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते झा यांनी केले.प्रत्येक झाड तुमचे आमदार पाडेल

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, ‘आरेमध्ये कापण्यात येणारे प्रत्येक झाड आपला आमदार पाडेल याची जाणीव सरकारला व्हायला हवी. ती जाणीव झाल्यानंतर त्यांची झाडे पाडण्याची हिंमत होणार नाही. काही महिन्यांपूर्वी काही जण आरेला कारे करत होते, परंतु आता सर्वजण ‘झोपा रे’ करत आहेत. ते सर्व आहेत कुठे?’‘चिपको’ची आठवण 

‘मुंबईकरांनी आता चिपको मोहीम सुरू करण्याची आवश्यकता आहे. आता “करो या मरो’सारखी स्थिती आहे,’ असे ट्विट करत आपच्या प्रीती शर्मा-मेनननी ७० च्या दशकातील चिपको आंदोलनाची आठवण करून दिली.

पक्ष्यांच्या ७६ प्रजातींचा अधिवास
आरे जंगल वाचवण्यासाठी लढणाऱ्या निराली वैद्य यांनी सांगितले की, या जंगलात ४ लाख विविध प्रकारचे वृक्ष आहेत. काही वृक्ष तर केवळ याच जंगलात आढळतात. याशिवाय पक्ष्यांच्या ७६ जातींचा हे जंगल म्हणजे अधिवास आहे. चिमण्यांच्या ८० जाती आणि १६ सस्तन प्राणी येथे आढळतात. एवढेच नव्हे, बिबट्याच्या ९ जातींसह ३८ सरपटणाऱ्या प्राण्यांच्या जाती येथे आहेत.

प्रत्यक्षदर्शी निकित सांगतात...
शुक्रवारी रात्री आम्ही आरे परिसरातील जंगलात वृक्षतोड सुरू झाली असल्याचे कळताच या भागात असलेल्या  बिरसा मुंडा चौकात पोहोचलो. तेव्हा अगोदरच या परिसरात मोठ्या संख्येने पोलिस व्हॅन आण फौजफाटा उभा होता. एवढ्या वेळेत ४०० हून अधिक वृक्ष कापण्यात आले होते. विरोध करणाऱ्या लोकांची संख्या वाढू लागली तसा पोलिसांनी बॅरिकेड्स लावून मज्जाव केला. आक्रमक आंदोलनकांना पोलिसांनी पकडून ठाण्यात नेले. यात मुलींना रात्री ठाण्यात नेऊ नका, अशी विनंती आम्ही पोलिसांना केली. मात्र, पोलिस ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. यामुळे तणाव निर्माण झाला. 


१९९० ला मेट्रो लाइनची योजना तयार : १९९० मध्ये कुलाबा-बांद्रा मेट्रो-३ची योजना तयार झाली. जून २०१० मध्ये याचा विस्तार करून मेट्रो लाइन अंधेरीपर्यंत आणण्याचा प्रस्ताव देण्यात आला. मार्च २०१४ मध्ये कृषी विभागाने सुमारे ३० एकर जमीन यासाठी देण्यास मंजुरी दिली. मॉर्निंग वॉकसाठी येणारे नागरिक आणि काही अादिवासींना वृक्षतोडीच्या विविध झाडांवर लावलेल्या नोटिसा दिसल्या आणि तेव्हापासून विरोध सुरू झाला. शुक्रवारी हा विरोध अधिकच तीव्र झाला.

बातम्या आणखी आहेत...