आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नांदेड - एमआयएमशी युती व्हावी असे मलाही वाटत होते. असदुद्दीन ओवेसी चांगला माणूस आहे, परंतु एक निवडून आलेला खासदार व त्याचे सोबती त्यांचा वापर करून घेत आहेत, असा गंभीर आरोप वंचित आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी नामोल्लेख न करता खासदार इम्तियाज जलील
यांच्यावर केला.
शनिवारी दुपारी येथील देगलूर नाक्यावर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार फारुख अहमद व मुकुंद चावरे यांच्या प्रचारासाठी आयोजित जाहीर सभेत अॅड. आंबेडकर बोलत होते. औरंगाबादमध्ये ज्या सेक्युलर विचाराने लोकसभेत एमआयएमला लोकांनी मते दिली त्याच खासदाराने विधान परिषद निवडणुकीत भाजप-सेना युतीला मते द्यायला सांगितले. याचा जाब मुस्लिम समाज विचारणार आहे की नाही, असेही आंबेडकर म्हणाले. अॅड. आंबेडकर यांची सभा मुस्लिमबहुल विभागात होती. त्याचा फायदा घेत अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी आपले संपूर्ण भाषण मुस्लिम समाजावर केंद्रित केले. आंबेडकरांनी या वेळी मुस्लिम समाजाची चांगलीच कानउघाडणी केली. आम्ही २८ मुस्लिम उमेदवारांना उमेदवारी दिली. सध्या मुस्लिम समाजात एक सूर
उमटत आहे.
जेथून कोठून होईल तेथून मुस्लिम उमेदवार निवडून आणायचे. पक्ष कोणताही असो, परंतु मुस्लिम उमेदवार आला पाहिजे, असा विचार मुस्लिम समाजात सुरू आहे. हा संधिसाधूपणा आहे. यात एक वेळ तुम्हाला यश येईल, परंतु तुम्ही तुमचे मित्र गमावून बसाल. तुम्ही दोन्ही हाताने जेवून आपलेच पोट भरण्याचा विचार करता, परंतु पुढच्या वेळी तुम्हाला वाढणाराच राहणार नाही. शेवटी विचाराची लढाई आहे. ती विचारानेच लढली पाहिजे, असेही आंबेडकर म्हणाले. मोदींच्या विरोधात या देशातील हिंदूही उभा राहिला. त्यामुळेच औरंगाबादची जागा निवडून आली. अनेक मुस्लिम मला येऊन सांगतात की, काँग्रेस-राष्ट्रवादीने विरोध केला असता तर तिहेरी तलाकचे विधेयक राज्यसभेत आले नसते. काँग्रेस-राष्ट्रवादीमुळेच मोदी सरकार आमच्या शरियतमध्ये हस्तक्षेप करू शकले. जेव्हा मुस्लिम समाज काँग्रेससोबत होता तेव्हा त्यांची तोंडे उघडण्याची ताकद नव्हती. परंतु आम्ही त्यांना निर्णय प्रक्रियेत आणण्याचा प्रयत्न करीत आहोत, तर ते आम्हालाच उलट जबाब विचारत आहेत, असेही त्यांनी सांगितले.
आता निर्णय मुस्लिम समाजाने घ्यायचाय
ओबीसी समाज आमच्यावर अवलंबून आहे, असे मुस्लिम समाजाला वाटते. ते चुकीचे आहे. ओबीसी ३० टक्के आहेत, तुम्ही १२ टक्के आहात. उद्या ओबीसी आणि दलित एकत्र झाले तर ४४ टक्के होतील. स्वबळावर सत्ता आणण्याची आमची ताकद आहे. परंतु या देशातील संविधानाने सर्वांना जगण्याचा समान हक्क दिला आहे. तो हक्क मुस्लिम समाजालाही मिळाला पाहिजे असे आम्हाला वाटते. म्हणून आम्ही मुस्लिम आमच्यासोबत असावेत असा प्रयत्न करीत आहोत. आता निर्णय मुस्लिम समाजाने घ्यायचा आहे असेही ते म्हणाले. आंबेडकर यांनी शनिवारी किनवट व भोकर येथेही प्रचार सभा घेतल्या.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.