आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नात्यातला जिव्हाळा!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परीक्षा संपली आणि मुले ओरडतच घरी आली, शाळेला सुटी लागली. परीक्षेच्या ताणानंतर हा आनंद होणे स्वाभाविकच आहे. मग पिढी नवी असो की जुनी! आधुनिक रंगीत झगमगाटातून मन नकळत पूर्वीच्या काळ्या-पांढर्‍या विश्वात गेले. त्या वेळची सुटी आणि आजची सुटी! दिवाळी साजरी झाल्यानंतर सुटीच्या काळात फराळ, उरलेले फटाके उडवणे, धमाल खेळात जात असत. मामा-काकाच्या गावाला जाणे व्हायचे! साध्यासुध्या गावातील घरात, गल्लीत उत्सुकतेने आम्ही येत असल्याची वर्दी सगळ्यांना पोहोचत असे. तेथेही लोक आम्ही येण्याची उत्सुकतेने वाट पाहत. पत्रातून आम्ही येणार असल्याचा दिवस कळवला जात होता. स्टेशनवरून टांग्याने घरी पोहोचल्यावर भाकरीच्या तुकड्याने ओवाळून स्वागत होत होते. मोठ्या माणसांच्या गप्पा सुरू होत, त्या रात्री उशिरापर्यंत संपत नसत. अनेक दिवस मनाच्या कप्प्यात साठवलेल्या आठवणी मोकळ्या होत असत. पूर्वी मोबाइल नसल्याने आताप्रमाणे दिवसातून दोन-तीन वेळा संपर्क होत नव्हता. त्यामुळे बर्‍याच दिवसांची उत्सुकता आणि वाट पाहण्याची हुरहूर असा तो मंत्राने भारावल्यासारखा काळ होता. मुले दारात पोहोचताच खेळण्यासाठी पसार होत असत. खेळ, गप्पा, छोट्या सहलीचे प्लॅन आखले जात होते. लपाछपी, गोट्या, पतंग उडवणे, एक ना दोन अनेक मैदानी खेळ खेळत होतो. मुली सागरगोटे, चंपलपाणी, भातुकली वगैरे खेळत. परिस्थिती सर्वसाधारण असली तरी आहे त्यात आनंद मानण्याची वृत्ती होती. महागाईचा तो काळ नव्हता. दूरदर्शनचा अँटेना एखाद्या घरावरच दिसून येत होता. शनिवार, रविवारी तुफान गर्दीत हिंदी-मराठी चित्रपट पाहिले जात होते. गावातील थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहणे म्हणजे मोठी चैनीची गोष्ट असायची. दिवाळीची सुटी संपताच निघण्याची तयारी व्हायची. मुले खिन्न तर मोठ्यांच्या डोळ्यात पाणी दाटून यायचे. असा आठवणीचा प्रवास आणि जिव्हाळा, आपुलकी आता कोठे आहे?