आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवा चष्मा मिळाला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
1993 ची घटना. उस्मानाबाद येथील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील नियुक्तिपत्र मला प्राप्त झाले. बीडहून उस्मानाबादला खूप गाड्या असल्याचे समजल्यावरून बीडच्या बसमध्ये बसलो. बसमध्ये जेमतेम 10-12 माणसे होती. मधल्या सीटवर माझी जागा होती. मी ज्या सीटवर बसलो होतो त्यापुढील सीटवर एक जोडपे बसलेले होते. त्यांची सुटकेस माझ्या डोक्यावरील रॅकमध्ये होती. बस वेगाने पुढे जात असताना तासाभराने अचानक ती सुटकेस माझ्या डोक्यात पडली. डोळ्यावर असलेला चष्मा खाली पडला आणि तो तुटला. काचा मात्र शाबूत होत्या. ते जोडपे माझ्याजवळ आले. त्यांनी मला दुखापत वगैरे झाली का? अशी विचारपूस केली. मी नाही म्हटले. पण माझ्यासमोर वेगळीच विवंचना उभी राहिली होती.
नव्या कार्यालयात अधिका-यांनी मला काही कागदपत्रे दिली तर मी चष्म्याशिवाय वाचणार कसा? तो तरुण म्हणाला, ‘काका, आमच्यामुळे तुम्हाला त्रास झाला.’ मी हसून म्हटले, ‘अरे बाबांनो! ती सुटकेस माझी असती आणि डोक्यात पडली असती तर मी काय केलं असतं? मला लागलेलं नाही; पण चष्मा फुटल्याचे दु:ख आहे. मी एका सरकारी कामासाठी जात आहे. तेथे चष्म्याशिवाय काम कसे करणार, असा प्रश्न सतावतो आहे इतकेच! त्या नवरा-बायकोत काही तरी बोलणे झाले असावे. तितक्यात बीड येताच गाडी बसस्थानकात थांबली. बहुतेक त्यांची बदली झालेली असावी. मला खाली उतरल्यानंतर त्यांच्यासोबत चालण्याची विनंती केली. तो तरुण म्हणाला, ‘काका, माझ्या लहान भावाचे चष्म्याचे दुकान बसस्थानकापासून फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर आहे.’ मी त्यांच्यासोबत गेलो. ‘या काकांना त्यांच्या पसंतीची फ्रेम पाहून चष्मा बनवून दे,’ असे त्यांनी त्यांच्या भावास सांगितले. माझ्या चष्म्याचे पैसेही न घेता मला परत बसस्थानकावर आणून सोडले. माणुसकीची भावना काही लोकांमध्ये जागृत असते म्हणूनच अशा लोकांची प्रगती होते. त्या ऑप्टिकल्सचे नाव बीडमध्ये आजही प्रसिद्ध आहे.